रस्त्यालगतच्या सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी जागोजागी पालिकेच्या ठेकेदारांनी खड्डे खणून ठेवले आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीच्या अनेक भागात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सिमेंट रस्त्यांची कामे सुरू करण्यापूर्वी या रस्त्यांच्या कडेला असलेल्या सेवा वाहिन्यांच्या स्थलांतराची कामे पहिल्या टप्प्यात सुरू करण्यास पालिका प्रशासनाने चालढकलपणा केला. आता जाग आलेल्या पालिकेच्या प्रकल्प विभागाने सीमेंट रस्त्यांची कामे ज्या ठिकाणी करण्यात येणार आहेत. त्या रस्त्यांच्या मध्यभागी, चौकात सेवा वाहिन्या स्थलांतरासाठी जागोजागी खणून ठेवले आहे. वाहतूक कोंडीबरोबर नागरिकांना चालणे अवघड झाले आहे.
डोंबिवली पूर्व भागातील मदन ठाकरे चौकात गेल्या काही दिवसांपासून सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी रस्ता खणून ठेवला आहे. वर्दळीच्या या रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडी होते.
पालिकेच्या कार्यालयाजवळ असेच खणून ठेवण्यात आले होते. डोंबिवली पश्चिमेत ‘ह’ प्रभाग कार्यालयाजवळ गेल्या दोन महिन्यांपासून रस्ता खणून ठेवण्यात आला आहे. अतिशय गुंतागुंतीच्या सेवा वाहिन्या याठिकाणी दिसत आहेत. त्या कशा हलवायच्या या विवंचनेत पालिका अधिकारी, ठेकेदार आहेत.
 हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. या रस्त्यावरून पुढे महाराष्ट्रनगरकडे रिक्षा जातात. शहराच्या अनेक भागांत अशा प्रकारे सेवा वाहिन्या हलवण्याची कामे रेंगाळत पडली आहेत.
का रखडली कामे..
पालिकेचे प्रकल्प अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी समंत्रकाच्या मार्गदर्शनाखाली सिमेंट रस्त्यांचे आराखडे तयार केले. त्याच वेळी सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्याची कामे प्रस्तावित करणे आवश्यक होते; पण सिमेंट रस्त्यांमध्ये ‘मलई’ दिसत असल्याने तत्कालीन अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सिमेंट रस्ते कामाच्या निविदा उघडल्या. ही कामे सुरूही झाली. त्यानंतर सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्याचा प्रश्न ठेकेदाराला भेडसाऊ लागला. त्यानंतर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी सेवा वाहिन्या स्थलांतराचे आराखडे तयार केले. आता या कामासाठी शासनाकडे ५६ कोटींचा निधी मागण्यात आला आहे. सिमेंट रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. जोपर्यंत सेवा वाहिन्या स्थलांतरित केल्या जात नाहीत, तोपर्यंत सिमेंट रस्त्यांची कामे गती घेत नाहीत. अशी परिस्थिती आहे.