सुरगाणा तालुक्यातील महिलेवर दिंडोरी बस स्थानकात झालेल्या सामूहिक बलात्काराचे प्रकरण आता चांगलेच गाजू लागले असले तरी दिंडोरी, वणी यांसारख्या स्थानकांमध्ये याआधी घडलेल्या घटनांमधून बोध घेऊन येथे वेळीच दक्षता घेण्यात आली असती तर असा प्रकार रोखता आला असता अशी प्रतिक्रिया दिंडोरीत उमटत आहे. सायंकाळी सहानंतर राज्य परिवहन महामंडळाचे हे बस स्थानक जणू काही असामाजिक तत्वांच्या हातात जाते.
भावाला भेटण्यासाठी सुरगाणा तालुक्यातील ३५ वर्षीय महिला दिंडोरी येथे आली होती. भावाच्या घरी कुलूप असल्याने रात्री सुरगाण्यास जाण्यासाटी बस नसल्याने ती स्थानकातच झोपली. मद्यधुंद अवस्थेतील पाच जणांनी तिला एकटीला पाहून स्थानकाच्या मागील बाजूस ओढत नेऊन बलात्कार केला. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून काही जण धावून आल्याने तिची सुटका झाली. दिंडोरी पोलिसांनी तातडीने संशयितांना ताब्यात घेतले. यातील दोघे अल्पवयीन आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी परप्रांतातून आलेल्या काही जणांनी स्थानिक युवकांच्या मदतीने हा प्रकार केला. या प्रकाराने परप्रांतियांच्या वास्तव्याचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. तंबूवजा घरात राहणाऱ्या या युवकांकडे ग्रामपालिकेचा रहिवासी दाखला, शिधापत्रिका यांसारख्या शासकीय कागदपत्रांची जंत्री आहे. रात्री-अपरात्री स्थानकावर आलेल्यांना त्रास देणे हा येथील नित्याचा प्रकार झाला आहे. परंतु त्यांना काही स्थानिक युवकांची साथ असल्याने तक्रार करण्यास कोणी धजावत नाही, अशी स्थिती आहे. विद्यार्थिनी स्थानकात आल्यावर ही टारगट मंडळी छेड काढण्याचे प्रकार करतात. भीतीमुळे बहुतेक विद्यार्थिनी पालकांकडे तक्रार करत नाहीत. काही मुले बाहेरगावाहून पायी येणाऱ्या विद्यार्थिनींना त्रास देतात. पोलीसही तक्रारींची त्वरीत दखल घेत नसल्याना विद्यार्थिनींचा अनुभव आहे.
वणी, दिंडोरी येथील बस स्थानकात वीज पुरवठय़ाची फारशी व्यवस्था नाही. सुरक्षारक्षक नाही. राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी रात्री थांबत नाहीत. त्यामुळे रात्री बाहेरगावहून येणाऱ्या गाडय़ा स्थानकात न येता बाहेरून निघून जातात. स्थानकात बसलेल्या प्रवाशांना त्याची कल्पनाही नसते. परिणामी कधी कधी रात्र बस स्थानकातच काढावी लागते. त्यातच असा प्रवासी एकटा असल्यास त्याची लूट होते. कित्येक प्रवाशांना या टोळक्यांचा मार खावा लागतो. वर्षांपूर्वी एका वेडसर महिलेवर वणी बस स्थानकात अत्याचार झाले होते. वारंवार घडणाऱ्या या घटनांनी दिंडोरी, वणी यांसारख्या तीर्थक्षेत्रांची वेगळी प्रतिमा तयार होत असून गावातील राजकीय नेत्यांनी या प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.