नांदगाव तालुक्यातील नागापूर, पानेवाडी शिवारात राष्ट्रीय पक्षी मोरांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर वसुंधरा या सामाजिक संस्थेच्या वतीने स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्याने मोरांच्या वास्तव्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्रामीण व पशुवैद्यकांनी पाण्याअभावी उष्माघाताने मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. या घटनेची वसुंधरा या सामाजिक संस्थेच्या मनमाड येथील विभागीय कार्यालयाने दखल घेऊन तत्काळ ज्या ठिकाणी मोर चारा-पाण्याच्या शोधात वावरतात. अशा वास्तव्याच्या ठिकाणांचे शेतकऱ्यांच्या मदतीने सर्वेक्षण केले. मोरांना सहजपणे पाणी पिता यावे म्हणून जमिनीत खड्डे खणून विशिष्ट प्रकारचे भांडे ठेवण्यात आले. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने साठवण भांडय़ांमध्ये पाणी राहील अशी व्यवस्था वसुंधरा संस्थेच्या पर्यावरण विभागातर्फे करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे मुख्य संचालक डॉ. दीपक आहेर यांनी दिली. वसुंधरा संस्था एक दशकापेक्षा अधिक वर्षांपासून पर्यावरण, रोजगार, स्वयंरोजगार, ऊर्जा, सेंद्रिय शेती, प्रदूषण या क्षेत्रात आपले योगदान देत असून वन्य प्राणी आणि देशी जनावरांच्या प्रजाती टिकविण्यासाठी संस्था नवनवीन उपक्रम हाती घेणार आहे. संस्थेच्या उपक्रमांना दिलीप हंडोरे यांचे मार्गदर्शन असून वसुंधरा परिवाराचे सदस्य दत्तात्रय भिलोरे, भूषण पाटील, अरुण पवार, पीयूष गंगिले आदींच्या प्रयत्नांमुळे मोरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.