दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने नागपुरात ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान आयोजित राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला विदर्भातील दहा हजारांवर शेतकरी विधवांनी प्रखर विरोध केला आहे. कृषीमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने कोटय़वधी रुपयांचा खर्च करून होत असलेल्या या प्रदर्शनाचा निधी विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना देण्याची मागणी विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या अध्यक्ष बेबी बैस यांनी केली आहे.
वर्धा मार्गावरील पांजरी येथील राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्राच्या आवारात होणाऱ्या या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला देशभरातून येणाऱ्या लाखो शेतकऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी शरद पवार यांनी ४५ कोटी रुपये, तर राज्य सरकारने १० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे विदर्भातील ३० लाख शेतकरी त्रस्त असताना तसेच त्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबिलेला असताना सरकारने शेतक ऱ्यांना मदत न दिल्याने शेतकरी विधवांनी ‘कृषी वसंत’ या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला विरोध केला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कोरडवाहू शेतक ऱ्यांना दिवाळखोरी व आत्महत्येला निमंत्रण देणारे तंत्रज्ञान विकण्याचा गोरखधंदा पवारांनी बंद करावा, प्रदर्शनाच्या आयोजनावर खर्च होणारा कोटय़वधी रुपयांचा निधी विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना द्यावा, अशी मागणी बैस यांनी केली आहे.
विदर्भात ज्या कापूस तंत्रज्ञानामुळे गेल्या दशकात दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते तंत्रज्ञान या प्रदर्शनात दाखविणार काय? असा प्रश्न शेतकरी विधवा अपर्णा मालीकर यांनी उपस्थित केला आहे.  विदेशी कृषी तंत्रज्ञान दाखविण्याच्या प्रयोगाला विदर्भातील शेतकरी विधवांचा नैतिक विरोध आहे. जे सरकार डॉ. स्वामीनाथन समिती व डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या शिफारशी मान्य करूनही उपासमारीला तोंड देत असलेल्या शेतकरी विधवांना अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा व शिक्षण सवलती देऊ शकत नाही, अशा सरकारला उधळपट्टीसाठी ४५ कोटी रुपये कसे उपलब्ध झाले, असा प्रश्नही शेतकरी विधवांनी विचारला आहे.