लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेत नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया म्हणजे काय हे प्रथमच अनुभवणाऱ्या नवमतदारांना मतदानाद्वारे आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. लोकशाहीने व्यवस्था सुधारण्याची दिलेली संधी या दृष्टिकोनातून ते मतदानाकडे पाहतात. काहींना पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावता आला याचा आनंद आहे तर काहींना
आपल्या मित्रांपैकी काहींना मतदान करता आले नाही याची खंत होती. मतदान करताना कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावे याचा पूर्वाभ्यास नवमतदारांनी केला असल्याचे दिसून आले. अशा काही निवडक
मतदारांशी साधलेला साधलेला संवाद त्यांच्याच शब्दात.
आपला हक्क बजावला..
आजवर अनेकदा हक्क आणि कर्तव्य यावर आपण तावातावाने बोललो आहोत. मात्र आज केलेल्या मतदानाद्वारे आपणास आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. सुरुवातीला आपण करतो ते योग्य आहे की नाही, याचे दडपण आले होते. पण केंद्र अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया शांततेत पूर्ण केली. एकदम हलके वाटले. लोकशाहीने दिलेला हा बहुमूल्य हक्क यापुढे कायमस्वरूपी बजाविण्याचे निश्चित केले आहे.
– कल्याणी जोशी (गंगापूर रोड)
नीतिभ्रष्ट राजकारण्यांना धडा शिकवायचा
आज पहिल्यांदा मतदान केल्यामुळे समाधान वाटत आहे. मागील वर्षी महाविद्यालयात मतदार नोंदणी अभियानात नाव नोंदवले होते. तसेच विशेष मोहिमेतही नाव नोंदविल्याने माझे नाव दोन ठिकाणी यादीत छापून आले. आई-वडील कित्येक वर्षांपासून मतदान करत आहेत. त्यांच्या नावासमोर ‘डिलीट’चा शिक्का मारला गेला. यामुळे त्यांना मतदान करता आले नाही याचे वाईट वाटते. वाढता भ्रष्टाचार व महागाई, महिलांची सुरक्षितता, शिक्षणातील गैरव्यवहार आदींचा विचार करता परिवर्तनाची खरच गरज आहे. परिवर्तनात माझ्या मतदानामुळे खारीचा का होईना वाटा उचलला जाईल याचे अधिक समाधान वाटते. नीतिभ्रष्ट राजकारण्यांना धडा शिकविण्याची संधी यामुळे आपणास मिळाली याचा आनंद आहे. व्यवस्था, राजकारण्यांविषयी असणारी चीड कुठलाही आरडाओरड न करता शांततेने मतदानाद्वारे व्यक्त करता आली हे माझ्यासाठी महत्त्वाचे.
– सुप्रिया कुलकर्णी (भोसला परिसर)
शब्दात व्यक्त न होणारे समाधान
मी सुशिक्षित उच्च पदवीधर आहे. मागील विधानसभा व महापालिका निवडणुकीवेळी अर्ज क्रमांक ६ न भरल्याने मतदान करू शकलो नाही. यामुळे जानेवारी महिन्यात जेव्हा मतदार नोंदणी अभियान राबविले गेले, त्या वेळी मित्रांसोबत जाऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. आज मतदार यादीतील नाव, मतदार ओळखपत्र आणि प्रत्यक्ष मतदान यामुळे माझी नागरिक म्हणून स्वतंत्र ओळख आहे याची जाणीव झाली. राजकारण्यांच्या नावे बोटे मोडण्यापेक्षा आपण मतदान करताना तो कुठल्या पक्षाचा आहे, त्यापेक्षा त्याचे शिक्षण, त्याने आजवर केलेली कामे, नागरिकांशी असणारा जनसंपर्क याचा विचार केला.
– सुशांत कदम (पवननगर)
व्यवस्था सुधारण्याची संधी
गप्पांच्या ओघात आजवर नेहमीच आपला देश विकासाच्या मार्गावर असल्याची चर्चा झडते. पण देशाला विकासाकडे नेण्यासाठी आपण काय केले, या प्रश्नाचे उत्तर म्हणून मतदानाकडे आपण पाहिले. देशाची व्यवस्था सुधारण्याची संधी मला या माध्यमातून मिळाली. त्यासाठी वेगवेगळ्या उमेदवारांच्या माध्यमातून आपल्यासमोर निवडक पर्याय होते. यापैकी मला योग्य वाटलेल्या अशा उमेदवारावर आपण शिक्कामोर्तब करून मतदानाचा हक्त बजावला. यामुळे जागरूक नागरिक असल्याची जाणीवही झाली.
– प्रियंका जोशी (गंगापूर रोड)
मतदानाने जबाबदारीचे भान आले
प्रथमच मतदान केले म्हणजे काही तरी वेगळे केले असे मुळीच वाटले नाही. देशाचे भविष्य बदलावे, प्रगती व्हावी आणि सुरक्षित हाती तो राहावा, यासाठी एक छोटा प्रयत्न केला इतकेच. आतापर्यंत मोठय़ा माणसांबरोबर राजकारण्यांवर अगदी नकळत्या वयापासून ताशेरे ओढले आहे. मात्र हे लोक तिथपर्यंत जाण्यासाठी आपण जबाबदार आहोत, हे आज कळले. यामुळे योग्य माणसांची निवड प्रतिनिधी
म्हणून करून द्यायची हे भान मतदानामुळे आले आहे. भारताचा सुजाण नागरिक म्हणून माझ्या जबाबदाऱ्या ‘बीप’चे बटण दाबताना एका क्षणात समजल्या. या सगळ्या प्रक्रियेचा भाग राहिलो याचा आनंद आहे. पण, काही मित्र या आनंदापासून मुकले याचा खेद आहे. आपल्याकडे मतदानाच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत मतदान करता यावे यासाठी काही तरी स्वतंत्र यंत्रणा राबबावी असे वाटते.
– अनुज गोयंका (कॅनडा कॉर्नर)