निवडणूक काळात मतदार यादीतील घोळ नेहमीच गाजतो. मात्र याच मतदार यादीच्या मदतीमुळे नवी मुंबई पोलिसांना एका गुन्ह्य़ाची उकल करण्यात यश आले आहे. दीड महिन्यापूर्वी एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या खूनप्रकरणी दोन जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्या महिलेवर अतिप्रसंग करताना तिने केलेल्या आरडाओरडय़ाने घाबरलेल्या आरोपींनी तिचा खून केला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दीड महिन्यापूर्वी बेलापूर परिसरात एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या हातावर सुरेखा भीम अतंगले असे गोंदलेले होते. या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले होते. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे त्याच दिवशी पामबीच मार्गावर आढळून आलेली ३ वर्षांची मुलगी ही त्या मृत महिलेची असल्याचे स्पष्ट झाले होते. या महिलेच्या हातावर गोंदलेल्या नावामुळे पोलिसांना तिची ओळख पटली होती. मात्र या नावाने मिसिंगची तक्रार कोणत्याच पोलीस ठाण्यात नसल्याने त्यांच्या घरच्यांना शोधायचे कसे हा मोठा प्रश्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू रेडकर आणि त्यांच्या पथकासमोर होता.
यावेळी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप आणि साहाय्यक पोलीस आयुक्त विवेक मसाळ यांनी ऑनलाइन मतदार यादी तपासण्याची सूचना तपास पथकाला केली होती. यानुसार मतदार यादी तपासली असता, अकोला येथे अतंगले नावाचे काही मतदार आढळून आले. पोलिसांनी अकोला येथे जाऊन अधिक चौकशी केली असता, मृत महिलेशी ओळख नसल्याचे समोर आल्याने पोलीस यंत्रणा काहीशी हताश झाली होती. मात्र नाव नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चुकांवर पोलिसांचे यश असल्याने या आडनावाशी साधम्र्य असलेल्या आडनावांचा पोलिसांनी शोध घेतला असता, चेंबूर येथील अणुशक्ती विधानसभा मतदारसंघात कुसुम अतंगले अशा नावाच्या मतदारांची नोंद पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली. मात्र हे कुटुंब काही दिवसांपूर्वी येथून निघून गेल्याचे तेथील शेजाऱ्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी हार न मानता मृत महिलेचे आणि त्या मुलीचे छायाचित्र दाखवत परिसरात चौकशी करीत असताना जनाबाई ससाणे या वृद्ध महिलेने ती मुलगी त्यांची नात असल्याचे सांगितले.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेच्या पतीशी पोलिसांनी संपर्क साधला. तसेच मृत महिलेच्या मोबाइल कॉलच्या रेकॉर्डवरून त्याच परिसरातील द्वारकानाथ गुप्ता आणि बेलापूर येथील स्वामीनाथ गुप्ता यांची नावे पोलिसांसमोर आली. यातील गुप्ता याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गुप्ता याच्याकडे चौकशी केली असता, त्याने या खुनाची कबुली देत त्याचा मित्र द्वारकाप्रसाद हादेखील यात सहभागी असल्याचे सांगितले. या घटनेनंतर उत्तर प्रदेश येथे पळ काढलेल्या द्वारकाप्रसाद यालादेखील पोलिसांनी अटक केली.
द्वारकाप्रसाद हा रिक्षाचालक असून मृत सुरेखा राहत असलेल्या परिसरात त्यांची ओळख होती. द्वारकाप्रसाद आणि स्वामीनाथ हे दोघे मित्र. खुनाच्या दिवशी मृत सुरेखा ही तिच्या मुली घेऊन द्वारकाप्रसाद याच्या रिक्षाने बेलापूर येथील स्वामीनाथ याच्या घरी आली होती. दरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सुरेखा हिच्यावर या दोघांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास विरोध करीत तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने ते दोघे घाबरले. आपण पकडले जाऊ या भीतीने त्यांनी गळा आवळून तिला ठार मारले.
यानंतर द्वारकानाथ हा घरी परत येत असताना रिक्षात झोपलेल्या मृत सुरेखा हिच्या तीन वर्षांच्या मुलीला त्याने पामबीच मार्गावर सोडून पळ काढला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू रेडकर यांनी दिली आहे.