अर्थव्यवस्थेत अनेक गुंते निर्माण झाले आहेत आणि त्याचा ताण आपल्या जगण्यावर येतो आहे. खरे तर याची जाणीव आपल्याला व्हायला हवी, मात्र घडामोडींचा आपल्याला थांगपत्ताही नसतो. कारण आपल्याकडे आर्थिक जाणिवांचा अभाव आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. आपल्याकडे अर्थव्यवहार हा निवडणुकांचा मुद्दा होत नाही, मात्र जात, वंश, भाषा, आरक्षण, अशा मुद्दय़ांवर निवडणुका लढविल्या जातात, असेही कुबेर यावेळी म्हणाले. नागरिकांचे प्रबोधन करण्याच्या हेतूने तसेच अर्थकारणविषयक जाणिवा विकसित करण्याच्या उद्देशाने ठाण्यातील अथर्व अ‍ॅकफिन सव्‍‌र्हिसेस या संस्थेच्या वतीने ‘अर्थकारण आणि राजकारण’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कुबेर बोलत होते.  यावेळी नागरी सहकारी बॅंका आणि पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्स अ‍ॅण्ड क्रेडिट सोसायटी (नॅफकॅब)च्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल विद्याधर वैशंपायन यांचा सत्कार कुबेर यांच्या हस्ते करण्यात आला.
ठाण्यातील आर्य क्रीडामंडळ सभागृहात नुकताच हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ठाणे जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन, अथर्वचे संस्थापक संचालक अनिरुद्ध केळकर आणि मकरंद मुळे व्यासपीठावर उपस्थित होते. गिरीश कुबेर यांनी आपल्या भाषणामध्ये राजकारण आणि अर्थकारणाचा संबंध उलगडून सांगितला. सगळ्या बॅंका मोठय़ा प्रमाणात व्यवसाय करत आहेत, परंतु या देशातील सुमारे एक लाख ९२ हजार कोटी रुपयांची कर्जे बुडालेली आहेत. अशा वेळी या बॅंकांचे ग्राहक असलेल्या देशातील नागरिकांना झोप कशी लागू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गेल्या काही दिवसांमधील कर्ज व्यवहार पाहिला तर असे दिसेल की, दोन ते चार हप्ते थकवल्यानंतर बॅंका सामान्य ग्राहकांच्या मागे आपला ससेमिरा सुरू करतात. असे असले तरी सात हजार कोटी रुपये बुडवणाऱ्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. अशी व्यक्ती आयपीएलच्या खेळाडूंना १४ कोटी रुपये देते आणि फोटो कॅलेंडरसाठी कोटय़वधी रुपये खर्च करते. कर्मचाऱ्यांकडे देण्यासाठी मात्र त्यांच्याकडे पैसे नसतात. बॅंकाची कर्जे असा माणूस बुडवतो. ७८० कोटी रुपयांच्या घरात केवळ पेट्रोल पंपाचे बिल चुकलेय. अशा प्रकाराकडे लक्षच नसल्याचे कुबेर म्हणाले.
आपल्याकडे गरिबीचे गोडवे गायले जातात हा अत्यंत भंपकपणा असून, संपत्ती निर्मिती करणारे मात्र त्यामुळे दुर्लक्षिले जातात.
सामाजिक कार्याचा उदोउदो करताना आर्थिक गोष्टी मात्र पूर्णपणे झाकोळल्या जातात. आपणास फुकट द्यायची आणि घ्यायची सवय असते. प्रत्यक्ष देण्याच्या प्रसंगी अनेक वेळा त्याच्या दुप्पट ते तिप्पट रक्कम आपल्याच खिशातून अप्रत्यक्षपणे काढलेली असते. आपण व्यक्तिपूजक असलो, तरी संपत्ती निर्माण करणाऱ्या उद्योजकांना मात्र आपण कमी लेखतो.
एखादी व्यक्ती चांगले कमवत असेल तर लगेच त्याच्या व्यवसायाविषयी शंका घेतली जाते. या बाबतीत आपण खूपच दांभिक असून पैसे कमवणे हे पाप आहे असेच चित्र आपण तयार करतो, असे कुबेर यांनी आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले.
इतर देशांच्या व्यवस्था मोठय़ा का होतात याचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे. तेथील अर्थव्यवस्थेला असलेल्या महत्त्वामुळेच हे घडते. म्हणून अर्थव्यवस्थेचे महत्त्व कळणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या इतिहासामध्येदेखील अर्थ जाणिवा होत्या. मात्र परकीय आक्रमणांच्या काळात त्या कमी झाल्या असाव्यात, असे त्यांनी सांगितले. अर्थसाक्षरतेच्या अज्ञानामुळे आपली अर्थव्यवस्था भीषण आणि लाजीरवाणी अशीच झाली आहे, असे ते म्हणाले.