यंदा विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी पुरुषांच्या तुलनेत महिलांना अत्यल्प स्थान दिल्याने त्या बंडाने पेटून उठल्या आहेत. मध्य नागपुरातील अपक्ष उमेदवार आभा पांडे, तिवसा मतदारसंघातील संयोगिता निंबाळकर व अचलपूरमधील वसुधा देशमुख या तिघींनी पुरुषी वर्चस्वाला आव्हान दिले आहे.  
काँग्रेसने यंदा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे २७ महिलांना उमेदवारी दिली आहे. त्या खालोखाल भाजप २१, राष्ट्रवादी काँग्रेस १६ व शिवसेनेच्या केवळ १० महिला उमेदवार रिंगणात आहेत. माजी मंत्री संजय देवतळे यांना डावलून त्यांच्या वहिनी आसावरी देवतळे यांना वरोरा मतदारसंघातून उमेदवारी दिली. अनेक वर्षांपासून तळागाळातल्या महिला कार्यकर्त्यांना संधी दिल्याचा दावा भाजप व काँग्रेस या पक्षांचा आहे.
राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये महिला उमेदवारांमध्येच लढत आहे. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर व भाजपच्या निवेदिता चौधरी, मध्य नागपुरातील आभा पांडे, तिवसा मतदारसंघातील निवेदिता निंबाळकर व अचलपूरच्या वसुधाताई देशमुख या विदर्भातील आहेत. संयोगिता निंबाळकर व अ‍ॅड. यशोमती ठाकूर या दोघी सख्ख्या बहिणी. दोघीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यां. संयोगिताचे पती सत्यजीत यशोमतीचे स्वीय सहायक. काही महिन्यांपूर्वी कंत्राटावरून त्यांचे मतभेद झाले नि दोघी बहिणी राजकीय प्रतिस्पर्धी झाल्या. राजकीयदृष्टय़ा सशक्त समजल्या जाणाऱ्या यशोमतींविरुद्ध निवेदिता यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. यशोमती तसेच भाजपच्या निवेदिता चौधरी यांच्यात लढत होत आहे. काँग्रेसच्या माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांनी अचलपूरमधून बंडखोरी करीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविली. तेथे शिवसेनेच्या सुरेखा ठाकरे यांच्याशी लढत आहे.

हे कुठले राजकारण?
महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाता मारता आणि महिलांना डावलता, हे कुठले राजकारण, असे खडे बोल काँग्रेसच्या शहर महिला अध्यक्ष आणि मध्य नागपुरातील उमेदवार नगरसेविका आभा पांडे यांनी सुनावले आहेत. अनिस अहमद यांना उमेदवारी दिल्याने त्या संतप्त झाल्या. त्यांच्याविरुद्ध बंडखोरी करून अपक्ष म्हणून त्या रिंगणात आहेत. काँग्रेसमध्ये महिला सक्षमीकरण केवळ कागदावरच आहे. पक्षात मूल्ये जपली जात नाहीत. तळागाळातल्या महिला कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष असून महिलांना डावलले जाते. अनिस अहमद केवळ नोटांचे राजकारण करतात. पक्षाने त्यांना उमेदवारी देऊन महिला कार्यकर्त्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप आभा पांडे यांनी केला.