कामावर घेण्याच्या मागणीसाठी कामगारांनी रिलायन्ससमोर ठिय्या दिला. कंपनीने कामगारांना कामावरून काढले नाही, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेल्या आणि पॉल्सिटरचे उत्पादन करणाऱ्या रिलायन्स कंपनीने ९४ कामगारांना कामावरून काढून टाकल्याने त्यांच्यावर बरोजगाराची कुऱ्हाड  कोसळली आहे. कंपनीत उत्पादनच नसल्याचे कारण सांगून कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले. कामगारांनी कंपनीच्या फाटकावर येऊन कंपनी प्रशासनाला कामावर घेण्याची विनंती केली. तेथील सुरक्षा रक्षकांनी कामगारांना कंपनीत प्रवेश करू दिला नाही. कामगारांची मागणी अमान्य करण्यात आल्याने अनेक कामगार फाटकासमोर ठिय्या मांडून होते.
एवढय़ा दिवसांपासून आम्ही काम करीत असताना आम्हाला कामावरून कमी का केले, याचा जाब त्यांनी रिलायन्स प्रशासनाला विचारला. बरेच दिवस तेथील रिलायन्स प्रशासन आणि कामगारांमध्ये वाद झडत राहिला. त्यापैकी काहींनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली तर काहींनी तडजोड स्वीकारली. त्यासाठी नागपूरचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली आहे. त्या ९४ पैकी ५२ कामगारांनी साडे तीन लाखांवर तडजोड केल्याचे काढून टाकण्यात आलेल्या कामगारांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. आम्हाला नुकसानभरपाई नको तर काम हवे आहे. या वयात आम्ही कोठे काम शोधणार, असा प्रश्न विचारला. या उर्वरित कामगारांनी पैसे न स्वीकारता न्यायालयात जाण्याचे ठरवले असून त्यादृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

५२ कामगारांना भरपाई दिली -पतंगे
याबाबत कंपनीचे व्यवस्थापक ए.के. पतंगे म्हणाले, आम्ही ९४ कामगारांना काढले नसून ते स्वखुशीने नोकरी सोडून गेले आहेत. ते सर्व कंत्राटी कामगार होते. कंपनीचे कर्मचारी नव्हते. कंत्राटदारांच्या सांगण्यावरून आमच्याकडे ते काम करीत होते. गेल्या सप्टेंबरपासून कंपनी बंद असल्याने आमच्याकडील उत्पादन थांबले होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने ९४ पैकी ५२ कामगारांना न्यायालयीन निर्णयाचा आधार घेऊन नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी सुमारे ४ लाख ५० हजार रुपये दिले आहेत. तसेच उपदान आणि इतर रक्कम मिळून पावणे सात लाखापर्यंत भरपाई दिली आहे.