सन १९५२ ते २०१६ या तब्बल ६४ वर्षांच्या राजकीय वाटचालीनंतर भक्कम बहुमतानिशी सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सुरुवातीच्या वाटचालीच्या मोजक्या साक्षीदारांपैकी बलराज मधोक नावाचा एक दुवा निखळला. आणीबाणीनंतर ‘भारतीय जनता पार्टी’ नावाचे नवे रूप धारण केल्यानंतरही जनसंघाची पणती आपल्या खांद्यावर घेऊन एकाकीपणे राजकारणात वावरणाऱ्या मधोक यांच्या निधनानंतर त्यांचे दीर्घकालीन साथीदार लालकृष्ण अडवाणी यांची प्रतिक्रिया पाहता, पक्षातील संघर्षपर्वाचा पट अडवाणी यांच्या नजरेसमोररून सरकत असणार, यात शंका नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळातील सहा दशकांच्या चळवळीचा इतिहास असलेल्या काँग्रेसला राजकीय पर्याय उभा करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जनसंघाची स्थापना करून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपविले, पण केवळ उत्तर भारतापुरता विस्तार असलेला पक्ष काँग्रेसला पर्याय ठरू शकत नाही, हे ओळखून देशभरात पक्षाचे जाळे विणण्यासाठी बलराज मधोक यांनी त्या काळी जे संघटनात्मक कौशल्य दाखविले, त्याला तोड नाही. स्थापनेनंतर जेमतेम पंधरा वर्षांतच, १९६७ मध्ये संसदेत जनसंघाचे ३५ खासदार दाखल झाले होते, हे या कौशल्याचे फळ होते. १९७५ मधील आणीबाणीनंतर जनसंघाचा इतिहासच बदलला, आणि जनता पार्टीतून बाहेर पडलेला जनसंघ भारतीय जनता पक्ष या नावाने राजकारणात आक्रमक झाला, तेव्हा बलराज मधोक नावाचा हा संघटक नेता एकाकीपणे जनसंघाचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारणात टिकण्याची धडपड करीत होता.

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
latur lok sabha marathi news, shivraj patil chakurkar latur latest news in marathi
शिवराज पाटील यांच्या ‘देवघरा’ बाहेरील गर्दी वाढली
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या निधनानंतर पक्षात सुरू झालेल्या व्यक्तिगत हेव्यादाव्यांनी १९७३ च्या दरम्यान टोक गाठले आणि मधोक एकाकी पडले. संघाचे कडवे प्रचारक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक, ‘ऑर्गनायझर’ या संघाच्या मुखपत्राचे संपादक आणि देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्थितीचे गाढे अभ्यासक अशी अनेक रूपे असलेल्या मधोक यांच्या कर्तृत्वाची झळाळी वाजपेयी-अडवाणी यांच्या नेतृत्वगुणांच्या कौतुकात बुडालेल्या संघ परिवारालाही जाणवलीच नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांचे टोकाचे मतभेद होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या गूढ निधनानंतर वाजपेयी यांच्या भूमिकेवर ते नाराज होते, आणि ही नाराजी त्यांनी सरसंघचालक गोळवलकर यांच्याकडे व्यक्तही केली होती. पण जनसंघाचे नेतृत्व वाजपेयी यांच्याकडेच असेल, असा ठाम संदेश त्यांना संघाचे तत्कालीन सरकार्यवाह माधवराव मुळ्ये यांच्यामार्फत दिला गेला, आणि त्यानंतर विकोपाला गेलेल्या मतभेदाचे मधोक हेच बळी ठरले. वाजपेयी-अडवाणींच्या जनसंघातून हकालपट्टी झाल्यानंतर, आपण एका कटाचे बळी ठरलो, ही खंत ते जाहीरपणे बोलून दाखवत असत. बुजुर्गाना एकाकी पाडण्याच्या राजकारणाचा दुसरा अंक सुरू असतानाच, पहिल्या अंकावर मधोक यांच्या निधनामुळे पडदा पडला आहे.