मेरीलँड विद्यापीठातील एका विद्यार्थ्यांने १९६०च्या सुमारास कृष्णविवरांवर शोधनिबंध सादर केला त्या वेळी स्टीफन हॉकिंग, रॉजर पेनरोझ, जॉन व्हीलर ही या क्षेत्रातील नावे क्षितिजावरही नव्हती. ‘कृष्णविवर’ हा शब्दही नव्हता, पण तीच संकल्पना या शोधनिबंधात स्पष्ट मांडली गेली होती. तो विद्यार्थी भारतीय होता. त्यांचे नाव प्रा. सी. व्ही. विश्वेश्वरा. त्यांची निधनवार्ता मंगळवारी आली.

गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व लायगो उपकरणांच्या माध्यमातून शोधण्यात आले तेव्हा अनेकांना त्यांच्या संशोधनाची आठवण झाली. दोन कृष्णविवरांची टक्कर होऊन त्यातून गुरुत्वीय लहरी बाहेर पडतात हे त्यांनी फार पूर्वीच सांगितले होते. ते त्यांच्या हयातीत खरे ठरले! भारतात कृष्णविवरे व सापेक्षतावादाच्या सिद्धान्तातील तज्ज्ञ वैज्ञानिक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांना विष्णू या नावाने लोक ओळखत होते. गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध झाले तेव्हा आयोजित एका परिषदेत त्यांनी विनोदाने असे सांगितले, की तुम्ही आता मला क्वासीमोडो म्हणा. कारण क्वासी नॉर्मल मोडचा शोध मी प्रथम लावला होता. मेरीलँड विद्यापीठात असताना त्यांनी असे सांगितले होते की, दोन कृष्णविवरांचे मीलन होत असताना त्यातून ज्या लहरी बाहेर पडतात त्यात गुरुत्वीय लहरी असतात. त्यांचे तरंगचित्र त्यांनी त्या वेळी गणनाच्या माध्यमातून काढले होते व २०१५ मध्ये लायगोच्या गुरुत्वीय लहरी संशोधनात खरे ठरले. त्यांच्याच पद्धतीचा वापर करून गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध करण्यात यश आले.

ते व्यंगचित्रेही काढत असत. ती फिजिक्स कॉन्फरन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली होती. जर्मनीच्या ‘स्पेक्ट्रम द वीसेनशाफ्ट’ या लोकप्रिय विज्ञान नियतकालिकातही त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्यात आइनस्टाइनवरच्या चित्रांचाही समावेश होता. विज्ञान विषय सोपा करण्याची त्यांची हातोटी विनोदबुद्धी लाभल्याने विलक्षण होती. १९७९ मध्ये त्यांनी अहमदाबाद येथील फिजिकल रीसर्च लॅबोरेटरीत एक व्याख्यान दिले होते. त्याचा विषयच ब्लॅकहोल्स फॉर बेडटाइम असा होता. विज्ञान, कला, विनोद व अर्कचित्रे यांचा मिलाफ त्यांनी त्यात घडवला होता. बंगळुरूच्या जवाहरलाल नेहरू तारांगणाचे ते संस्थापक संचालक होते. त्यांनी आइनस्टाइन एनिग्मा, ब्लॅकहोल्स इन माय बबल बाथ यांसारखी पुस्तके लिहिली.

विश्वेश्वरा यांना त्यांचे वडील सी. के. व्यंकटरामय्या यांच्याकडून प्रेरणा मिळाली.  भौतिकशास्त्रात रस असल्याने ते पुढील शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात गेले. तेथे रॉबर्ट फुलर हे त्यांचे मार्गदर्शक होते. फुलर यांनी त्यांना सापेक्षतावादात असलेला रस पाहून मेरीलँड विद्यापीठात पाठवले. त्याच विद्यापीठातून ते पीएच.डी. झाले. न्यूयॉर्क विद्यापीठ, बोस्टन विद्यापीठ व पीटसबर्ग विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे काम केले. भारतात परत आल्यानंतर त्यांनी बंगळुरूत संशोधन केले. रामन रीसर्च इन्स्टिटय़ूट व इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या संस्थांत त्यांनी अध्यापन केले. पेनसिल्वानिया, बोस्टन तसेच लंडन विद्यापीठांत ते अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम करीत होते. अवकाश काळाच्या मितींआधारे कृष्णविवरांची रचना सांगणारे ते पहिले वैज्ञानिक होते. गोल न फिरणाऱ्या श्वार्टझचाइल्ड ब्लॅकहोलची स्थिरता त्यांनी सिद्ध केली.  गुरुत्वीय लहरींचा शोध घेण्यासाठी कृष्णविवरांच्या स्पंदनांचा वेध गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रांच्या माध्यमातून घेतला पाहिजे, असे त्यांनी आधीच सांगितले होते. सापेक्षतावाद, खगोल भौतिकी व विश्वरचनाशास्त्र या विषयावर त्यांनी दहा खंडांचे सहसंपादन केले होते. त्यांच्या एका जन्मदिनी ‘ब्लॅक होल्स ग्रॅव्हिटेशनल रेडिएशन अँड युनिव्हर्स – एसेज इन ऑनर ऑफ सी. व्ही. विश्वेश्वरा. बाला अय्यर अँड विप्लब भवाल’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले.

त्यांच्या संशोधनाचे मोल भारतात मात्र फार थोडय़ांना समजले. त्यांना सरकारने कुठलाही पद्म  किंवा विज्ञानातील सर्वोच्च असा भटनागर पुरस्कार देण्याचे सौजन्य दाखवले नाही.