महाराष्ट्र क्रिकेट संघातील खेळाडूंमध्ये भारतीय संघात स्थान मिळविण्याची क्षमता नाही, अशी नेहमीच टीका केली जात असते. मात्र महाराष्ट्राच्या हृषीकेश कानिटकर याने १९८८ मध्ये ढाका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकार मारून भारतास विजेतेपद मिळवून दिले होते. त्याची ही कामगिरी टीकाकारांकडून नेहमीच विसरली जाते. केदार जाधव याच्याबाबत असेच दिसून आले. ज्या वेळी इंग्लंडविरुद्ध रविवारी पुण्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात केदारला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले त्या वेळी अनेक क्रिकेटपंडितांनी भुवया उंचावल्या होत्या. त्याच्यापेक्षा अमित मिश्रा किंवा अजिंक्य रहाणे याला संधी द्यायला पाहिजे होती, अशी टिप्पणी लगेचच समाजमाध्यमांवर उमटली होती. मात्र केदारने अद्वितीय शतकी खेळी करत आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

केदारने यापूर्वी झिम्बाब्वेमधील दौऱ्यात एकदिवसीय सामन्यात शतक झळकाविले होते. त्या वेळीदेखील त्याच्या शतकाचे कौतुक न करता अनेक क्रिकेटपंडितांनी झिम्बाब्वे हा काय लिंबूटिंबू संघ आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शतक करायलाच पाहिजे अशीही टिप्पणी झाली होती. मात्र झिम्बाब्वेनेही अनेक वरिष्ठ खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघावर काही वेळा मात केली आहे हे लोक सोयीस्कररीत्या विसरतात. ही सर्व पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर केदारचे शतक ही अतिशय श्रेष्ठच खेळी म्हटली पाहिजे. आक्रमक खेळाबाबत ख्यातनाम असलेले युवराज सिंग व महेंद्रसिंग धोनी यांच्यासह हुकमी चार फलंदाज बाद झाले त्या वेळी भारताच्या खात्यावर जेमतेम ६२ धावा होत्या. भारताला विजयासाठी आणखी जवळजवळ तीनशे धावांची आवश्यकता होती. केदार याने केवळ कर्णधार विराट कोहली याला चांगली साथ दिली, एवढेच नव्हे तर त्याने त्याच्यापेक्षाही काकणभर जास्त सरस फलंदाजी करीत भारताला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. विराटचे शतक ही भारतासाठी सवयीची गोष्ट झाली आहे. मात्र संघास विजयासाठी आणखी तीनशे धावा करण्याची क्षमता त्याच्या एकटय़ाकडे नव्हती. विशेषत: शेवटच्या फळीत भक्कम साथ देण्याची क्षमता असलेला खात्रीलायक फलंदाज नाही. त्यामुळेच कोहलीच्या शतकापेक्षाही केदारचे शतक खूपच महत्त्वाचे ठरले. शतकाला दोन धावा कमी असताना त्याच्या पायात गोळा आला होता. एकेरी व दुहेरी धावा काढणेही त्याला शक्य नव्हते. त्याने खणखणीत चौकार मारूनच शतक पूर्ण केले. एवढय़ावरच तो थांबला नाही तर त्याने आणखी वीस धावा करीत संघास विजयाच्या समीप नेले. कोहली हा अनेक वेळा आपल्या सहकाऱ्यांना धावबाद करण्याबाबत ख्यातनाम आहे. मात्र केदार याने त्याला साथ देताना दाखविलेली संयमी व शांत वृत्ती, एकमेकांमधील सामंजस्य, खेळाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व आत्मविश्वास हे सर्वच गुण केदारच्या शतकी खेळीत दिसून आले. घरच्या मैदानावर खेळताना अनेक वेळा मानसिक दडपणच असते, कारण जर आपण अपयशी झालो तर चाहत्यांच्या मनातून लगेचच आपले स्थान खराब होण्याची भीती असते. तसे कोणतेही दडपण न घेता केदारने आपल्याकडेही शैलीदार फलंदाजीद्वारे सामनाजिंकून देण्याची क्षमता आहे हे सिद्ध केले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील शतक हे केदार हा एक फलंदाज म्हणून परिपक्व होत चालल्याचे द्योतक आहे. त्याची आत्तापर्यंतची ही सर्वोत्तम खेळी असावी.  ज्या पद्धतीने तो जिद्दीने परिस्थितीला सामोरा गेला आणि कोहलीच्या तोडीस तोड फलंदाजी करत होता, ते नेत्रदीपक असेच होते. कोहली जेव्हा खेळतो तेव्हा फक्त त्याची एकटय़ाचीच खेळ बहुतांशी वेळा लक्षात राहते; पण या वेळी तसे झाले नाही. या खेळीदरम्यान केदारचा आत्मविश्वास दुणावलेला वाटला. केदार चांगला फलंदाज असला तरी त्याने फार कमी वेळा संघाला विजय मिळवून दिला आहे, असे त्याच्याबद्दल बोलले जायचे; पण ही खेळी त्याला नक्कीच अपवाद ठरली. या खेळीमुळे केदारची संघातील अस्थिरता कायम होईल, अशी आशा आहे.