पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या नावाजलेल्या संघांना धूळ चारल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीसारख्या कच्च्या संघाला पराभूत करून विजयी हॅट्ट्रिक मिळवण्यासाठी गतविजेता भारतीय संघ सज्ज झाला आहे. पर्थच्या वेगवान समजल्या जाणाऱ्या खेळपट्टीवर हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले असून दोन्ही संघांतील वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
पाकिस्तानला ७६ धावांनी आणि दक्षिण आफ्रिकेला १३० धावांनी पराभूत केल्यानंतर भारताला यापेक्षा मोठा विजय मिळवण्याची ही नामी संधी असेल. सध्याच्या घडीला भारतीय संघाची कामगिरी अप्रतिम होत असून तिन्ही आघाडय़ांवर त्यांनी बाजी मारली आहे. सलामीवीर शिखर धवनने दोन्ही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे या खेळाडूंनीही आपली चमक दाखवली असली तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांना फलंदाजीमध्ये काहीही करता आलेले नाही. त्यामुळे या तिघांना लयीमध्ये येण्यासाठी हा सामना महत्त्वाचा असेल. गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी, मोहित शर्मा हे दोन्ही मध्यमगती गोलंदाज भेदक मारा करण्यात यशस्वी ठरले आहेत. उमेश यादवकडे वेग असला तरी त्याला सूर गवसलेला नाही. आर. आश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन्ही फिरकीपटूंनी अचूक मारा करीत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला आहे. या संघात अमिरातीविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमिरातीचा संघ हा अननुभवी आहे. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तराचा चांगला अनुभव नाही. संघामध्ये खुर्रम खानसारखा दमदार फलंदाज आहे. गेल्या सामन्यात शैमान अन्वरने तडफदार शतक झळकावले होते. गोलंदाजीमध्ये मोहम्मद नवीद आणि अमजद जावेद यांनी चमक दाखवली आहे.
दोन्ही संघांचा विचार करता भारताचे पारडे निश्चितच अमिरातीपेक्षा जड आहे. पण या विश्वचषकात प्रत्येक लहान संघाने ‘लिंबू-टिंबू’ या प्रतिमेला तडा दिला आहे. त्यामुळे अमिरातीकडूनही चांगला प्रतिकार पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दुखापतग्रस्त शमी मुकणार
विश्वचषकात आतापर्यंत भारतीय गोलंदाजीचे उत्तमपणे सारथ्य करणाऱ्या मोहम्मद शमीच्या गुडघ्याला दुखापत झाली असल्याने तो अमिरातीविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. शमीच्या जागी भुवनेश्वर कुमार किंवा अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी यांच्यापैकी एका खेळाडूला संधी मिळू शकेल. ‘‘दुखापतीमुळे अमिरातीविरुद्धच्या सामन्यात शमीला खेळता येणार नाही. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याला या सामन्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे संघाचे प्रसारमाध्यम व्यवस्थापक आर. एन. बाबा यांनी सांगितले.
सामना क्र. : २१   भारत वि. अरब अमिराती
 स्थळ :  वाका, पर्थ ल्ल वेळ : दुपारी १२.०० वा.पासून
बोलंदाजी
शांतपणे अथक परिश्रमासह आपले काम करीत राहायचे हे माझे तत्त्व आहे. त्यामुळे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर मी बरेच काही शिकलो आहे आणि या प्रवासाचा आनंद लुटला आहे. माझ्या खडतर काळात मी बरेच काही शिकलो आहे. फलंदाजीमध्ये काही बदल केले आणि चांगली कामगिरी व्हायला लागली
– शिखर धवन, भारताचा सलामीवीर

भारतीय संघात दिग्गज खेळाडू आहेत. परंतु त्याचे जास्त दडपण न घेता चांगला खेळ करण्यावर आमचा भर असेल. आम्ही जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार आहोत. बऱ्याच वर्षांनी आमचा त्यांच्याबरोबर सामना होत आहे, या वर्षांत संघातही बदल झाले असल्याने भारतासाठीही हा सामना सोपा नक्कीच नसेल.
मोहम्मद तौकीर, संयुक्त अरब अमिरातीचा कर्णधार

संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/ यष्टीरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहित शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, स्टुअर्ट बिन्नी.
संयुक्त अरब अमिराती : महंमद तौकीर (कर्णधार), खुर्रम खान (उपकर्णधार), स्वप्निल पाटील (यष्टीरक्षक), सकलेन हैदर, अमजद जावेद, मंजुळ गुरुगे, आंद्री बेरेंगर, फहाद अल हाशमी, महंमद नाविद, कामरान शहजाद, कृष्णा के चंद्रन, शैमान अन्वर, अमजद अली, नासिर अझीझ, रोहन मुस्तफा.