उत्तर प्रदेशातील मेरठ कॅन्ट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ या ठिकाणी शुक्रवारी रात्री एका मद्यधुंद व्यक्तीने कारने प्रवेश करत थरार निर्माण केला. संबंधित तरुणाने अल्टो कार थेट प्लॅटफॉर्मवर आणली आणि धोकादायकरीत्या ट्रेनजवळ नेली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आणि अनेक प्रवासी सुरक्षिततेसाठी धावताना दिसले.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अल्टो कार ट्रेनच्या अगदी जवळ गेली आणि गाडी तेथे पोहोचताना प्लॅटफॉर्मवरील काही आसनांचे नुकसान झाले. उपस्थितांनी प्रसंगावधान राखत चालकाला वेळेवर रोखले. त्यांनी त्याला मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
रेल्वे पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची गाडी जप्त करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
तपासादरम्यान, आरोपीने स्वतःची ओळख ‘संदीप’ अशी दिली असून, त्याने लष्करी जवान असल्याचा दावा केला आहे. तो बागपतचा रहिवासी असल्याचे समजते; मात्र या दुर्घटनेतील आरोपीने वापरलेली कारची झारखंडमध्ये नोंदणी केली असल्याचे आढळले आहे.
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. जीआरपी मुरादाबादच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी करीत सांगितले की, संबंधित तरुणाला अटक करण्यात आली असून. आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुरू आहे.
इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.