शनिवार पेठेत सहा दुचाकी आणि दोन मोटारी जाळाल्या; आठवडाभरात सतरा घटनांची नोंद

शहरात आठवडाभरापूर्वी सुरू झालेले वाहने पेटवण्याचे सत्र कायम आहे. आठवडाभरात एकापाठोपाठ घडलेल्या घटनांमध्ये अज्ञातांनी चार ट्रक, चार मोटारी, नऊ दुचाकी अशी वाहने पेटवून दिली. वाहने पेटवणारे आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. वाहने पेटवून देण्याच्या घटनांमुळे नागारिकदेखील भयभीत झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी पहाटे शनिवार पेठेतील वर्तक बागेनजीक एका गॅरेजचालकाने रस्त्याच्या कडेला लावलेल्या जुन्या सहा दुचाकी आणि दोन मोटारी जळाल्याची घटना घडली.

वर्तक बागेनजीक मारणे यांचे गॅरेज आहे. तेथे असलेल्या आगाशे बंगल्यानजीक मारणे यांनी सहा दुचाकी आणि दोन मोटारी लावल्या होत्या. तेथे मोठय़ा प्रमाणावर पालापाचोळा पडलेला आहे. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास पालापाचोळा पेटला. त्यानंतर त्याची झळ दुचाकी आणि मोटारीला बसली. आगीत सहा दुचाकी आणि दोन मोटारी जळाल्या. मोठय़ा प्रमाणावर धूर झाल्याने नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. विश्रामबाग पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. या भागात पहाटे कचरावेचक येतात. सिगारेटचे जळते थोटूक तेथे टाकल्याने पाचोळा पेटला. त्यानंतर शेजारी लावलेल्या दुचाकींनी पेट घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहने पेटवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वैमनस्यातून वाहने पेटवली जातात. काही ठिकाणी वर्चस्वाच्या वादातून गुंडांनी वाहनांची मोडतोड केल्याच्या घटना घडल्या आहेत. सिंहगड रस्त्यावर २८ जून २०१५ रोजी मध्यरात्री एका माथेफिरूने दुचाकी आणि चारचाकी वाहने पेटवून दिली होती. या घटनेत ९२ वाहने जळाली होती. जळालेल्या वाहनांमध्ये ७७ दुचाकी, आठ मोटारी आणि सायकली होत्या. पोलिसांकडून या प्रक रणी अमन अब्दुल शेख (वय ३३, रा. धायरी) याला अटक करण्यात आली होती. त्याला २००६ मध्ये खडकी भागात दुचाकी जाळल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी शहरातील कात्रज, उत्तमनगर, एरंडवणे भागांत सोसायटीच्या आवारात लावलेल्या दुचाकी पेटवल्याच्या घटना घडल्या आहेत.

वैमनस्यातून दुचाकी जाळण्याच्या घटना

शहरात यापूर्वी घडलेल्या काही घटनांमध्ये पोलिसांकडून दुचाकी पेटवल्याप्रक रणी आरोपींना अटक करण्यात आली होती. हडपसर भागात एका सोसायटीच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. त्या वेळी त्याने सोसायटीच्या वादातून हे कृत्य केल्याची कबुली दिली होती. गुंड टोळय़ांमधील वर्चस्वाच्या वादातून नागरिकांची वाहने पेटवून देण्याच्या घटना घडल्या आहेत.

आठवडाभरात घडलेल्या जाळपोळीच्या घटना

१५ मार्च- खडकवासला गावात ग्रामपंचायत सदस्याचे चार ट्रक पेटवले

१८ मार्च- मार्केट यार्डजवळील संदेश सोसायटीत बंगल्याच्या आवारातील दोन मोटारी पेटवल्या

१९ मार्च- बिबवेवाडी भागात बंगल्याच्या समोर लावलेल्या तीन दुचाकी जाळल्या

२१ मार्च- शनिवार पेठेत गॅरेजचालकाने लावलेल्या सहा दुचाकी आणि दोन मोटारी जळाल्या