नवी मुंबई महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची पुणे महापालिकेच्या परिवहन मंडळाच्या (पीएमपीएमएल) व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी आज पदभार स्वीकारला. त्यांनी पदाची सूत्रे स्वीकाराताच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची पूर्वीची साडेदहा ते साडेपाच या वेळेत बदल करून पावणेदहा ते पावणेसहा अशी वेळ केली. तर कर्मचाऱ्यांनी टी-शर्ट आणि जीन्स वापरू नये, अशी ताकीद दिली. या आदेशाने ‘मुंढे मास्तरां’नी पहिल्याच दिवशी येऊन कार्यालयीन वेळ बदलल्याची चर्चा अधिकारी आणि कर्मचारी वर्गामध्ये सुरू होती.

[jwplayer 32CLGKop-1o30kmL6]

अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या पहिल्याच बैठकीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे आधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. कोणत्याही कर्मचाऱ्याने इतर कार्यालयांत कामाशिवाय जाऊ नये. त्यात प्रामुख्याने चहा घेण्यासाठी इमारतीच्या बाहेर न जाता कॅन्टीनमध्येच जावे. धूम्रपान करता कामा नये. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. पुणे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात. त्यांची संख्या सद्यस्थितीला १२ लाख असून त्यातून दीड कोटी रुपये उत्पन्न मिळत असून ते दोन कोटींवर जाऊ शकते. त्यासाठी प्रत्येक आगारातून बस वेळेवर सोडल्या पाहिजेत. त्याचे योग्य नियोजन करण्याची गरज असून प्रवाशांबरोबर चांगल्या प्रकारे संवाद साधला पाहिजे. त्यामुळे प्रवाशांमध्ये चांगली भावना निर्माण होऊन ते दररोज बसने प्रवास करतील. त्याचबरोबर थांब्यावरच गाडी थांबली पाहिजे. पुढे-मागे गाडी थांबवू नका. ज्येष्ठांना प्राधान्य देण्याची गरज आहे. भविष्यात उत्पन्न न वाढल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्याचबरोबर गाड्यांच्या दुरुस्तीसाठी जे स्पेअर पार्ट लागतात, तितकीच खरेदी करा, अधिकची खरेदी करू नका. त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

[jwplayer wHOhUPHs-1o30kmL6]