‘लोकसत्ता ठाणे’च्या वृत्तानंतर साफसफाईस सुरुवात; तलावातील कचरा, गाळ हटवण्याची युद्धपातळीवर मोहीम

कचरा, घाणीमुळे दरुगधीच्या गाळात सापडलेल्या मासुंदा तलावाच्या सफाईचे काम अखेर महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. कडक उन्हामुळे ठाणे शहरातील जवळपास सर्वच तलावांच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने गाळ काठावर स्थिरावू लागला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलावालाही कचऱ्याने घेरले असून येथे येणाऱ्या पर्यटकांना दरुगधीचा सामना करावा लागत आहे. यासंबंधीचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ने प्रसिद्ध करताच तलावाच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे.

ठाणे शहराचे मुख्य पर्यटन स्थळ अशी ओळख असलेल्या तलावपाळी अर्थात मासुंदा तलावातील कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणामुळे पाणी प्रदूषित होऊन तलावाला दरुगधीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे तलावपाळीचे नैसर्गिक जलस्रोतही धोक्यात येण्याची शक्यता पर्यावरण प्रेमींमधून व्यक्त होत होती. येथे येणाऱ्या पर्यटकांनी टाकलेले खाद्यपदार्थ, निर्माल्याचा कचरा, मातीच्या मडक्यांमधून टाकलेली घाण, दारूच्या बाटल्या, नारळाच्या करवंटय़ा आणि प्लास्टिक अशा कचऱ्याचे ढीग मासुंदा तलावाच्या चारही बाजूंना दिसून येत होते. कचऱ्याच्या प्रदूषणामुळे मासुंदा तलावातील माशांचाही मृत्यू होत असून मृत माशांच्या सडक्या वासाने परिसरातून चालणेही शक्य होत नव्हते. या संबंधीचे वृत्त लोकसत्ता ठाणेमधून शनिवारी प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेत सोमवारी सकाळपासून मासुंदा तलावाच्या स्वच्छतेची मोहीम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल्याचे समोर आले आहे.

‘नागरिकही जबाबदार’

‘ठाणे शहराचे मध्यवर्ती ठिकाण, सांस्कृतिक केंद्र, मनोरंजनाचे आणि विरंगुळ्याचे हक्काचे व्यासपीठ, तरुणांपासून आबालवृद्धांच्या सकाळ-संध्याकाळच्या फिरण्याच्या या ठिकाणाला पुरेशा स्वच्छते अभावी प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. मात्र या प्रदूषणाला महापालिके इतकेच नागरिकही जबाबदार आहेत. तलावपाळीच्या कट्टय़ावर बसून खाद्यपदार्थाचा कचरा पाण्यात टाकून दिला जातो. त्यामुळे तलावामध्ये मोठय़ा प्रमाणात कचरा जमा होतो. अशावेळी एक सुजाण नागरिक म्हणून या गोष्टींना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे,’ अशी प्रतिक्रिया जिज्ञासा ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिली.