मत्स्यखवय्यांच्या खादाडीसाठी खाडीतील काटेरी, चविष्ट मासे
पावसाची सुरुवात होताच खाडीकिनारी येणाऱ्या काटेरी चिवणी माशांची आवक सध्या उरणच्या मासळी बाजारात सुरू झाली आहे. ही काटेरी मासळी अतिशय चविष्ट असते. या माशांच्या अंडय़ांना मोठी मागणी असते. तळून किंवा कालवण करून हे मासे खाल्ले जातात. सध्या आवक कमी असल्याने २५० ते ३०० रुपयांना १० मासे विकले जात आहेत. आवक वाढल्यानंतर हे मासे स्वस्त होतील, असे मासेविक्रेत्यांचे म्हणणे आहे.
खाडीच्या मुखाच्या भागात मासळीचे साठे मोठय़ा प्रमाणात असतात. सध्या खाडीकिनारे प्रदूषित झाल्याने मासळीचे प्रमाण घटलेले आहे. मात्र तरीही पावसात खाडीकिनाऱ्यावर शिंगाली माशांसारखे दिसणारे, मात्र त्यापेक्षा आकारने लहान असणारे तीन काटय़ांचे म्हणजेच चिवणी मासे मिळतात.
हा मासा तेलकट असल्यामुळे तो हातात धरताच सटकतो. त्याचा काटा टोचल्यास इजा होते. खाडीकिनारी हे मासे अंडी घालतात.पावसाळ्याच्या सुरुवातीला हजारोंच्या संख्येने हे मासे किनाऱ्यावर येतात. त्यामुळे मोठय़ा पावसाची वाट येथील स्थानिक मासेमार तसेच खवय्येही पाहत आहेत.
लसूण, तेल, तिखट व कोथिंबीर अशा अगदी मोजक्या साहित्यात शिजविलेले हे मासे अतिशय चविष्ट असतात. मुसळधार पाऊस पडून खाडीतून पाणी वाहू लागले की या माशांचे प्रमाण वाढेल आणि त्यांची किंमतही घटेल.
– पांडुरंग पाटील,स्थानिक मच्छीमार