ठाणे येथील साकेत भागातील पोलीस कवायत मैदानात आयोजित करण्यात आलेली गृहरक्षक (होमगार्ड) जवानांची आयत्या वेळी रद्द करण्यात आल्यामुळे संतप्त उमेदवारांनी या परिसरात ‘रस्ता रोको’ केला. ठाणे ग्रामीण पोलिसांनी आयोजित केलेल्या या भरतीसाठी राज्यभरातून अनेक तरुण ठाण्यात आले होते. मात्र, भरती प्रक्रिया रद्द केल्याचे समजताच त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. विशेष म्हणजे, पावसामुळे साकेत मैदानात चिखल झाल्यामुळे ही भरती रद्द करण्यात आल्याचे दोन दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

राज्याच्या गृहरक्षक महासमादेशकांनी लोकसंख्येनुसार महिला आणि पुरुष गृहरक्षक सदस्य नोंदणी आणि निवड प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गृहरक्षकचे जिल्हा समादेशक तसेच ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील यांनी २० व २१ जून रोजी सकाळी ७ ते ११ या कालावधीत भरती प्रक्रियेचे आयोजन केले होते. या भरती प्रक्रियेची जाहिरात समाजमाध्यमांतूनही मोठय़ा प्रमाणात प्रसारीत झाल्याने राज्यभरातून अनेक तरुण भरतीसाठी दाखल केले. मात्र, तेथे पोहोचल्यानंतर भरती रद्द करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे हे उमेदवार संतप्त झाले व त्यांनी साकेत भागातील रस्ता अडवून धरला.

ऐन सकाळच्या वेळेत हा प्रकार घडल्याने या मार्गासह आसपासच्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन त्यात नोकरदार वर्गाची वाहने अडकून पडली. या घटनेबाबत माहिती मिळताच ठाणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या तरुणांची समजूत काढून त्यांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले. त्याचवेळेत वाहतूक पोलिसांनी कळव्याहून येणारी वाहने कोर्टनाका, कॅसलमिल मार्गे तर साकेत मार्गावरून येणारी वाहने माजिवाडा येथील महामार्गावरून वळविली. अखेर त्या तरुणांनी आंदोलन मागे घेतले.

पावसामुळे भरती रद्द

गृहरक्षक सदस्य नोंदणी आणि निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. मात्र, मोठय़ा प्रमाणात झालेल्या पावसामुळे मैदानात चिखल झाला आहे. या चिखलात गोळाफेक, धावणे अशा दोन चाचण्या घेणे शक्य नव्हते. या कारणास्तव दोन दिवसांपूर्वीच ही भरती प्रक्रिया रद्द केली होती. त्यासंबंधीची माहिती संकेतस्थळासह समाजमाध्यमांवरून प्रसारित केली होती, असा दावा ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी केला.