धारावीच्या नव्वद फूट रोडवरील साई हॉटेलच्या समोरील अशोक मिल कंपाउंडमधील तळमजल्यावरील कपड्यांच्या कारखान्यात बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या गाळ्यातील कपड्यांचा साठा, विद्युत यंत्रणा व उपकरणांमुळे ही आग पसरत गेली. आगीचे वृत्त समजताच मुंबई अग्निशमन दलाच्या पाच मोठ्या गाड्या, पाण्याचे तीन टँकर आणि दोन दुचाकी घटनास्थळी दाखल झाल्या.

हेही वाचा >>>नायर रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी केला मानवी शरीरावर थेट सराव, सरकारी रुग्णालयामध्ये प्रथमच अशी सुविधा

अशोक मिल कम्पाउंडमधील कपड्यांच्या कारखान्यात बुधवारी दुपारी आग लागली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थली धाव घेतली. इमारतीच्या तळमजल्यावरील स्नानगृहात एक महिला अडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत या महिलेची स्नानगृहातून सुटका केली. या महिलेला तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही वेळानंतर या महिलेचा मृत्यू झाला. उषा लोंढे (६२) असे या महिलेचे नाव होते, अशी माहिती शीव रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर यांनी दिली. अग्निशमन दलाच्या जवानांना दुपारी ३.०५ च्या सुमारास आग विझविण्यात यश आले.