मुंबई : गेल्या चार दिवसांपासून शहरातील नागरिकांना पाण्यासाठी अक्षरश: वणवण करावी लागत आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव २४ तासांसाठी खंडित केलेला पाणीपुरवठा अद्यापही सुरळीत न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे ३० जानेवारीला सकाळी १० पासून ते ३१ जानेवारी रोजी सकाळी १० पर्यंत भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रात काही तातडीची कामे हाती घेण्यात आली होती. या कामामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील पाणीपुरवठा २४ तासांसाठी खंडित करण्यात आला होता. मात्र, दुरुस्तीची कामे लांबल्यामुळे आणखी आठ तास पाणी पुरवठा खंडित ठेवण्यात आला होता. मंगळवारी संध्याकाळी टप्प्याटप्प्याने मुंबईतील सर्व ठिकाणचा पाणीपुरवठा सुरू झाल्याचा दावा पालिकेने केला. मात्र, उपनगरांत अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. काही विभागांना थेट ४८ तासांनी बुधवारी पाणी मिळाले. काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा झाला. गोराई, चारकोप, दहिसर यासारख्या भागांत तर गुरुवारीही पाणीपुरवठा झाला. चारकोप, गोराई येथील म्हाडाच्या बैठय़ा वसाहती, दहिसर वैशाली नगर, गोराई गाव येथे पाणीटंचाई कायम होती. निम्म्या मुंबईचा पाणीपुरवठा खंडीत झाल्याने पाण्याच्या टँकरसाठीही जादा पैसे मोजावे लागत होते.

ढिसाळ नियोजन?

४२ वर्षांत प्रथमच २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, ४२ वर्षांत पालिकेच्या कारभारात बदल झालेला नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटल्या. एवढय़ा मोठय़ा कामाचे इतके ढिसाळ नियोजन कसे काय असू शकते, असा प्रश्नही उपस्थित करून नागरिकांनी समाजमाध्यमांवर पालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे.