पुण्यातील कसबा आणि पिंपरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून सध्या राजकारण तापू लागलं आहे. भाजपानं पिंपरी आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर पुण्यातील ब्राह्मण समाजामध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी यासंदर्भात जाहीर इशाराच भाजपाला दिला असून या निवडणुकीत त्याचा कसा परिणाम होतोय हे दिसेल, अशा आशयाचं विधान आनंद दवे यांनी केलं आहे. यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघात मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेल्या उमेदवारीचाही दाखला आनंद दवेंकडून देण्यात येत आहे.

नेमकं काय घडलंय?

भाजपानं पिंपरी आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये पिंपरीमधून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या जागी त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याऐवजी माजी नगरसेवक नगरसेवक हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कसब्यातील ब्राह्मण समाजामध्ये नाराजी पसरल्याचं बोललं जात आहे. आनंद दवे यांनी यावर प्रतिक्रिया देताना या चर्चेला दुजोरा दिला आहे.

काय म्हणाले आनंद दवे?

आनंद दवेंनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. “ब्राह्मण समाजाचाच उमेदवार असावा असा अट्टाहास आमचा कधीच नव्हता. कोथरूडलाही नव्हता, ना इथे आहे. पण लक्ष्मण जगतापांच्या घरात जसा न्याय दिला, तसाच न्याय टिळकांच्या घरातही करायला हवा होता. हिंदू महासंघाची भूमिका आहे की प्रत्येक जातीला विधानसभेत, लोकसभेत प्रतिनिधित्व मिळायला हवं. त्यामुळे ब्राह्मण समाजाने भाजपाच्या पडत्या काळात सर्वाधिक काम केलं, भाजपा जेव्हा ओळखलाही जात नव्हता, पायावर उभा राहात होता तेव्हा ब्राह्मण समाजाने सर्वाधिक काम केलं आहे. मग आता पक्षाला चांगले दिवस आल्यानंतर त्या ब्राह्मण समाजाला का डावललं गेलं?” असा सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे.

“संघटनेसाठी काम करणाऱ्या समाजाला प्रतिनिधित्व मिळायला हवं”

“स्वत: शैलेश टिळक यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आजपर्यंतची जी परंपरा होती, ती का तोडली जात आहे? सुरक्षित मतदारसंघ आणि हक्काचा मतदार समजून तुम्ही गृहित धरून कुणाला उमेदवारी देत असाल, तर ते चुकीचं आहे. पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघ आहेत.प्रत्येक जातीधर्माचा नेता आहे, तो असलाच पाहिजे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाला विरोध करतो. एखादा मतदारसंघ एखाद्या जातीला मिळावा अशी आमची मागणी अजिबात नसणार. पण जो समाज संघटनेच्या कामात राहतो, त्या समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळायला हवं”, असंही आनंद दवे यांनी नमूद केलं आहे.

पुणे: “कुलकर्णी, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा?”, पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील बॅनर्स चर्चेत!

“गेल्या वेळी मेधा कुलकर्णी कोथरूडमधून बाद झाल्या आहेत. आता टिळक बाद झालेत. त्यामुळे २१ आमदारांपैकी एकही आमदार असा नाही जो ब्राह्मण समाजाची बाजू घेतो. ब्राह्मण समाजावर जेव्हा आरोप होतात, त्याचं उत्तर ठापपणे देणारा प्रतिनिधी त्या भागात असला पाहिजे असं आमचं मत आहे. उद्या वेगळ्या समाजावर अन्याय झाला असता, तरी आमची हीच भूमिका असती. चिंचवडला न्याय लावला गेला, तोच न्याय टिळक घराण्याला लावला जायला हवा होता”, अशा शब्दांत आनंद दवेंनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदू महासंघ स्वत:चा उमेदवार उभा करणार?

“ब्राह्मण समाजात खदखद आहे. भाजपाचे लोक सोशल मीडियावरही जाहीरपणे लिहीत आहेत की हे कुठेतरी चुकतंय. त्याची नाराजी मतदारसंघात कशी दिसेल, याचं चित्र भाजपाच्या लोकांना २-३ तारखेला दिसेल. आज उमेदवार बदलण्याची वेळ गेली आहे. हिंदू समाज कुणालाही पाठिंबा किंवा विरोध करणार नाही. आम्ही एक तर स्वत: उमेदवार उभा करू किंवा तटस्थ राहू”, असं आनंद दवेंनी म्हटल्यामुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.