मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर भाजपाबरोबर जात शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. पण, शिवसेनेत ( ठाकरे गट ) असलेल्या आमदारांच्या पाठीमागे आता लाललुचपत प्रतिबंधक विभागाचा ( एसीबी ) सरोमिरा लागला आहे. आमदार राजन साळवी, वैभव नाईक आणि नितीन देशमुख यांची एसीबीमार्फत चौकशी सुरु आहे. अशातच एसीबी चौकशीवरून राजन साळवींनी गंभीर आरोप केले आहेत.

“गेल्या तीन महिन्यांपासून एसीबीकडून माझ्या मालमत्तेची चौकशी सुरु आहे. चौकशीला संपूर्ण सहकार्य करत आहे. पण, पत्नी, मुलं, भाऊ आणि स्वीय सहाय्यकालाही एसीबीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आलं. २००९ ते २०२२ पर्यंत जिल्हा नियोजन समितीतून मिळालेल्या निधीचीही चौकशी करण्यात येणार आहे,” असं राजन साळवींनी सांगितलं.

हेही वाचा : बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिल्याची चर्चा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “त्यांचा आणखी राजकीय…”

“मात्र, आम्ही फक्त जिल्हाधिकाऱ्यांना कामांबाबत शिफारस करत असतो. जिल्हाधिकारी त्यास मंजुरी देतात. मग त्याचं कंत्राट निघत आणि ठेकेदार आपली काम चालू करतात. याच्याशी आमचा काही संबंध नाही. परंतु, आमच्याबद्दल माहिती गोळा करण्याच्या अनुषंगाने एसीबीने जिल्हा नियोजन समितीला पत्र देत उत्तर मागितली आहेत,” असं राजन साळवींनी सांगितलं.

“बँका, पतपेढी, एसआयसी, पोस्ट येथेही एसबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. माझ्या मालमत्ता जिथे आहेत, तिथे जाऊन माहिती घेतली जात आहे. अशा पद्धतीने त्रास देण्याचं काम सुरु आहे. चौकशी कशासाठी करता. दोषी असेल तर गुन्हा दाखल करून अटक करा; जेलमध्ये टाका कशालाही घाबरत नाही. पण, माझ्यामुळे शासकीय यंत्रणांना त्रास देऊ नये,” असं आवाहन राजन साळवींनी केलं आहे.

हेही वाचा : नारायण राणे महाराष्ट्राचे राज्यपाल झाले तर? प्रश्न विचारताच संजय राऊतांनी आधी दिलं स्पष्टीकरण आणि शेवटी म्हणाले, “मजा येईल!”

“उदय बने यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचं समजलं आहे. माझ्या मालमत्तेशी त्यांचा काही संबंध नाही. भविष्यात रत्नागिरी मतदारसंघातून उदय बने हे विधानसभेचे उमेदवार असू शकतात. त्यामुळे त्यांचे पाय छाटून अडकवायचं, अशी भूमिका सरकारची आहे,” अशी टीका राजन साळवींनी केली आहे.