पीटीआय, इस्लामाबाद : भारतात जाण्याच्या उद्देशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला समाधानकारक कारण न दिल्याचे सांगून, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सिंध प्रांतात राहणाऱ्या १९० हिंदूंना भारतात जाण्यापासून रोखले असल्याचे वृत्त एका माध्यमाने दिले आहे. सिंधच्या अंतर्गत भागातील मुले व महिलांसह निरनिराळी हिंदू कुटुंबे धार्मिक तीर्थयात्रेसाठी दिलेल्या व्हिसावर भारतात जाण्यासाठी मंगळवारी वाघा सीमेवर पोहोचली.
मात्र, आपण भारतात का जाऊ इच्छितो याचे योग्य कारण ते देऊ न शकल्यामुळे पाकिस्तानच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना पुढे जाऊ देण्यास मनाई केली, असे ‘दि एक्स्प्रेस ट्रिब्यून’च्या वृत्तात म्हटले आहे. हिंदू कुटुंबे बहुतेक वेळा धार्मिक तीर्थाटनासाठी व्हिसा घेतात, मात्र नंतर ते दीर्घ काळासाठी भारतात थांबतात, असे सूत्रांच्या हवाल्याने या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. सध्या मोठय़ा संख्येत पाकिस्तानी हिंदू राजस्थान व दिल्ली या राज्यांमध्ये भटके म्हणून राहात आहेत, असेही वृत्तात म्हटले आहे.
‘सेंटर फॉर पीस अँड जस्टिस पाकिस्तान’ या संस्थेच्या अहवालानुसार, पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू समुदायाचे २२ लाख १० हजार ५६६ लोक राहात असून, देशाच्या १८,९८,९०,६०१ इतक्या नोंदणीकृत लोकसंख्येपैकी हे प्रमाण केवळ १.१८ टक्के आहे. पाकिस्तानातील हिंदूंसह अल्पसंख्याक लोकसंख्या गरीब असून देशाच्या विधिमंडळ यंत्रणेत त्यांचे नगण्य प्रतिनिधित्व आहे. पाकिस्तानच्या हिंदू लोकसंख्येपैकी बहुतांश सिंध प्रांतात स्थायिक आहे.