काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर बुधवारी रात्री कसबे धावंडा गावात एका अनोळखी व्यक्तीने हल्ला केला. नशेत तुल्ल असलेल्या या व्यक्तीने गावात मार्गदर्शन करत असताना आमदार सातव यांना मागे ओढून चापट मारली. या घटनेनंतर विरोधकांकडून शिंदे सरकारला लक्ष करण्यात येत आहे. सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आहे. दरम्यान, या याबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
“काल प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. पक्षाच्यावतीने आम्ही याच तीव्र शब्दात निषेध करतो. पण या निमित्ताने महिला सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहेत. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांबद्दल अशा पद्धतीने कायम असुरक्षितेचं वातावरण निर्माण होत असेल तर असंघटीत क्षेत्रातील महिला असतील, गावगाड्यावरील किंवा शेतीच्या बांधावर काम करणाऱ्या महिला महिलांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतो, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली. तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करावी”, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रज्ञा सातव यांच्यावर कसबे धावंडा येथे हल्ला
दरम्यान, काल आमदार सातव या कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे गेल्या होत्या. रात्री त्या गावात पोहोचल्या तेव्हा कारमधून उतरत असतांना एक व्यक्ती त्यांच्या वाहनाच्या दरवाजा जवळच येऊन उभा राहिला. त्यानंतर गावकरी आल्यानंतर त्या वाहनाच्या खाली उतरल्या अन त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर गावकऱ्यांना मार्गदर्शन करीत असताना एक व्यक्ती त्यांच्या पाठीमागून आला अन अचानक त्यांना बाजूला ओढून चापट मारली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे आमदार डॉ. सातव तसेच इतर गावकरीही गोंधळून गेले. डॉ. सातव यांनी तातडीने वाहनात बसून थेट कळमनुरीत दाखल झाल्या. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली.