ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. संजय राऊतांच्या या विधानावरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. भाजपाच्या काही सदस्यांनी संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी विधानसभेत भाषण करताना थेट संजय राऊतांना धमकी दिली.

संजय राऊतांचं संरक्षण दहा मिनिटांसाठी हटवलं, तर ते पुन्हा दिसणार नाहीत, अशी धमकी नितेश राणे यांनी दिली. संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी टीकास्त्र सोडलं. नितेश राणेंच्या या धमकीवर संजय राऊत यांनी टोलेबाजी केली आहे.

हेही वाचा- “पाच खून केलेले लोक…”, ठाण्यातील राजकारणावर जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

कोल्हापुरात एका सभेला संबोधित करताना संजय राऊत म्हणाले, “नारायण राणे यांचं टिल्लू पोरगं मला विधानसभेत धमकी देतंय. काय तर म्हणे, माझं संरक्षण काढा. अरे तुझं सरकार आहे ना… मग संरक्षण काढ ना… सरकार कुणाचं आहे? संरक्षण काढ… जेव्हा कोकणात शिवसैनिक गेले होते, तेव्हा त्याने स्वत:ला कोंडून घेतलं होतं. तो बाहेर पडायलाही तयार नव्हता. त्याच्या १०० बोगस कंपन्या आहेत.”

हेही वाचा- “नवाब मलिकांना देशद्रोही म्हणालो”, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर संजय राऊतांचा टोला, म्हणाले…

“ते आधी शिवसेना मग काँग्रेस आणि आता थेट भाजपात गेले आहेत. तेच आम्हाला निष्ठेच्या आणि शिवसेनेच्या गोष्टी शिकवतायत. त्यांना शिवसेनेनंच मुख्यमंत्री केलं. त्यांना शिवसेनेनंच ओळख दिली. हे डरपोक लोक आहेत, आमच्याशी काय लढणार…” अशी टीका संजय राऊत यांनी केली.