महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाला चहापानासाठी निमंत्रण दिलं होतं. पण विरोधी पक्षाने यावर बहिष्कार टाकला. विरोधीपक्षाने चहापानावर बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी यांनी ‘बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं’ असं म्हणत टीका केली होती. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेप घेतला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली.
अजित पवारांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं. एकनाथ शिंदे म्हणाले, मी त्या पत्रकार परिषदेत अजितदादांना देशद्रोही म्हणालो नव्हतो. माझं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार किंवा अंबादास दानवे यांच्याबद्दल नव्हतं. मी जे बोललो ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल बोललो. मलिक यांच्यावर एनआयए, ईडीकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा- “पाच खून केलेले लोक…”, ठाण्यातील राजकारणावर जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान
एकनाथ शिंदे यांच्या स्पष्टीकरणानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. “बरं…, मग आम्हीसुद्धा ४० गद्दार आमदारांना विधिमंडळातले चोरमंडळ म्हणालो.. हे स्पष्ट आहे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ट्वीट करत दिली.
खरं तर, संजय राऊत यांनी अलीकडेच विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी भाजपाच्या काही सदस्यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘देशद्रोही’ म्हटल्याच्या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेत मुख्यमंत्र्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. यावर संजय राऊतांनी मुख्यमंत्र्याला टोला लगावला आहे.