पुणे : हडपसरमधील एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलीने प्रियकरासह विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना खडकवासला धरण परिसरात घडली. कुटुंबीयांचा प्रेमसंबंधास विरोध असल्यााने दोघांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील झाडीमध्ये मुलगी आणि तरुण मृतावस्थेत सापडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलिसांना दिली. ‘पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा घटनास्थळी विषारी ओैषधाची रिकामी बाटली सापडली,’ अशी माहिती उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम खंदारे यांनी दिली.
१६ वर्षीय मुलगी हडपसरमधील मांजरी भागात राहायला होती. ती वानवडी भागातील एका खासगी शिकवणी वर्गात जायची. गुरुवारी (१० जुलै) ती शिकवणीतून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतली नाही. तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर तिच्या मोठ्या बहिणीने गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलिसांनी कुटुंबीयांची चैाकशी केली. तेव्हा फारशी मिळाली नाही. चौकशीत शाळकरी मुलीचे एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारी दुपारी दोघांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी दोघांची ओळख पटविली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले, असे पोलीस निरीक्षक खंदारे यांनी सांगितते.
‘प्राथमिक तपासात मुलीचे एका २३ वर्षांच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधांना कुटुंबीयांचा विरोध होता. तरुण खासगी ठिकाणी नोकरी करत होता,’ असे वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने यांनी सांगितले.