Why Nehru Called America “Not Mature” During His 1954 China Visit: पंडित जवाहरलाल नेहरू १९५४ साली माओ झेडोंग यांना भेटण्यासाठी चीनला गेले होते. पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान तर होतेच परंतु, कम्युनिस्ट नसूनही चीनला भेट देणारे पहिले नेते ठरले. त्यामुळे जगाच्या इतिहासात ही घटना महत्त्वाची म्हणून नोंदवली गेली. पंडित नेहरूंनी या दौर्‍याविषयी त्यावेळेस काय म्हटले होते याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले होते. भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांनी ‘त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची परदेशी मोहीम’ असे चीन दौर्‍याचे वर्णन केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच चीनमधील तिआनजिन शहराला भेट दिली. गेल्या सात वर्षांतील त्यांचा हा पहिला चीन दौरा होता. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे दोन्ही देशांनी आपापसातील संबंध अधिक दृढ करण्यास सुरुवात केल्याचं अनेक निरीक्षकांनी नमूद केलं. हे एकमेव कारण नसलं, तरी हे शेजारील दोन देश एकत्र येत असताना जागतिक स्तरावरील राजकीय संदर्भ दुर्लक्षित करता येणार नाहीत.

अशाच प्रकारची परिस्थिती ७० वर्षांपूर्वी होती. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान प्रथमच चीनला गेले होते. १९४९ साली चीनमध्ये कम्युनिस्ट सत्तेवर आले. शीतयुद्धातील प्रतिस्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारताने १९५० साली चीनला राजनैतिक मान्यता देणारा पहिला कम्युनिस्टेतर देश होण्याचा मान मिळवला. म्हणूनच नेहरूंनी १९५४ साली माओ झेडोंग यांना दिलेली भेट नैसर्गिक असल्याचं मानलं जातं. ते चीनला भेट देणारे पहिले कम्युनिस्टेतर विदेशी नेते ठरले. नेहरू १९ ऑक्टोबर रोजी चीनमध्ये पोहोचले. Nehru’s Bandung या पुस्तकात लेखक अँड्रिया बेनव्हेनुटी यांनी लिहिलं आहे की, इंदिरा गांधी देखील त्यांच्या वडिलांबरोबर या दौर्‍यावर होत्या. “शांतताप्रिय, मैत्रीपूर्ण आणि गतिमान चीनची प्रतिमा सादर करण्याची आंतरिक इच्छा ठेवत, चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी नेहरूंच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरले… जगावर आपली चांगली छाप पाडण्यासाठी नेहरूंचा चीन दौरा हा त्यांच्या मोहिनी रणनीतीचा भाग असल्याचं चिनी नेत्यांना वाटत होतं,” अँड्रिया बेनव्हेनुटी यांनी लिहिलं आहे.

साम्राज्यवाद हे मुळाशी

माओ आणि नेहरू यांच्यात भारतातील ब्रिटिश वसाहतवाद, चीनमधील असमान युरोपीय व्यापार करार व जपानी राजवट त्याचप्रमाणे, आशियाई राजकारण, अमेरिका आणि इतर विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. १९ ऑक्टोबर रोजी त्यांची पहिली भेट बीजिंगमधील झोंगनन्हाय या प्रशासकीय संकुलात झाली. येथे सरकारी कार्यालयं आहेत. या भेटीच्या सुरुवातीला माओ यांनी दोन्ही देशांतील साम्यांकडे लक्ष वेधलं, ते म्हणाले, “पश्चिमी साम्राज्यवादी शक्तींनी चीनला शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ छळलं. तुमच्या देशाला तर याहूनही जास्त, तीनशे वर्षांहून अधिक काळ छळ सहन करावा लागला… आपल्या विचारधारा व सामाजिक प्रणालींमध्ये भिन्नता असली तरी आपल्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं साम्य आहे, ते म्हणजे आपल्या सगळ्यांना साम्राज्यवादाशी सामना करावा लागतो आहे.”

तैवान अजूनही अमेरिकेच्या ताब्यात

माओ यांनी यावेळी काही अर्धवट राहिलेले प्रश्नही अधोरेखित केले, “तैवान अजूनही अमेरिकेच्या ताब्यात आहे” आणि “आपल्या देशाचा औद्योगिक विकासाचा स्तर भारताच्या तुलनेत अजूनही खालचा आहे…”. नेहरू यांनी वसाहतवादाच्या विषयावर सहमती दर्शवली आणि परस्पर सार्वभौमत्वाचा सन्मान व आक्रमकतेचा त्याग या पाच सिद्धांतांवर (पंचशील) आधारित मार्ग अनुसरण्याची गरज पुन्हा अधोरेखित केली. या पंचशील करारावर त्यांच्या भेटीच्या काही महिन्यांआधीच स्वाक्षऱ्या झाल्या होत्या आणि त्याचा उल्लेख अलीकडे तिआनजिनमध्येही करण्यात आला होता.

अमेरिका परिपक्व नाही?

नेहरू यांचा युरोपबाबतचा दृष्टिकोन माओ यांच्या तुलनेत अधिक सकारात्मक होता, परंतु अमेरिके संदर्भातील माओ यांच्या टीकेशी ते सहमत होते. माओ म्हणाले, “अमेरिकेने आपली संरक्षणरेषा दक्षिण कोरिया, तैवान आणि इंडो-चायना पर्यंत विस्तारली आहे, ही सगळी ठिकाणं अमेरिकेपासून दूर असून आमच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे आमची झोप उडाली आहे.” नेहरू म्हणाले, “अमेरिका अद्याप परिपक्व झालेली नाही. तिच्यासाठी हे समजून घेणं फार कठीण आहे की, ज्या गोष्टी तिच्या पसंतीच्या नसतात, त्या तरीही जगात घडत राहतात.”

पुन्हा युद्ध झालं तर?

२३ ऑक्टोबरच्या बैठकीत भविष्यातील जागतिक युद्धांच्या प्रश्नावर मतभेद उघड झाले. माओ यांनी हा विषय कम्युनिस्ट तत्त्वांनुसार मांडला, “जर पुन्हा युद्ध झालं, तर पश्चिम आशिया व आफ्रिकेचा बहुतांश भाग आणि संपूर्ण लॅटिन अमेरिका साम्राज्यवादातून मुक्त होतील.” नेहरू यांनी यावर मत व्यक्त केलं, “कधी कधी युद्धाचे परिणाम सकारात्मक ठरू शकतात, युद्धात लोकांची मुक्तता होते किंवा त्यांच्या सहनशक्तीची कसोटी पाहिली जाते. मात्र, युद्धामुळे माणसं अधिक क्रूर बनू शकतात आणि त्याचं नैतिक अधःपतन घडू शकतं. म्हणून, सर्व बाजूंनी विचार केला तर युद्ध टाळण्यासाठी शक्य त्या सर्व प्रयत्नांची गरज आहे.” शेवटी, माओ म्हणाले, “चीन आणि भारतामध्ये कोणताही तणाव नाही. आपल्या दोन देशांमध्ये मानसिक युद्ध चालू नाही…”

२३ ऑक्टोबरच्या बैठकीला व्ही. व्ही. परांजपेही उपस्थित होते, ते या भेटीदरम्यान दुभाषा म्हणून काम करत होते आणि पुढे जाऊन भारतीय मुत्सद्दी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अनेक वर्षांनंतर त्यांनी या भूमिकेतील अडचणी आठवताना सांगितलं की, चिनी भाषेतील गुंतागुंती आणि माओ यांच्या “अत्यंत तीव्र प्रादेशिक उच्चारांमुळे” अनुवादाचं काम खूप कठीण ठरत होतं.

तुला खरंच चिनी भाषा येते का?

या दौऱ्यादरम्यान शांघायच्या महापौरांनी नेहरू यांच्या सन्मानार्थ एक खास सांगीतिक कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात उद्घोषकांनी सांगितलं की, “एक तरुण आणि हुशार संगीतकार अमेरिकेतून परतला आहे, तो गाणार आहे.” परांजपे यांनी लिहिलं की, उद्घोषकाने चिनी भाषेत “ता” (Ta) हा शब्द वापरला, जो “तो”, “ती” किंवा “ते” कोणालाही दाखवण्यासाठी वापरला जातो (विशिष्ट लिंग सूचक नाही). “मला त्या कलाकाराबद्दल माहिती नव्हती, त्यामुळे मी ‘ता’चा अर्थ ‘तो’ असा घेतला,” परांजपे म्हणाले. “पण थोड्याच वेळात पडदा उघडला आणि एक खूपच सुंदर महिला संगीतकार मंचावर आली. हे पाहून नेहरू चिडले. ते माझ्याकडे वळाले आणि म्हणाले, ‘तू इतका वेळ या कलाकाराला पुरुष म्हणत होतास, पण ती एक महिला आहे! तुला खरंच चिनी भाषा येते का?”

निरोपाचा क्षण

परांजपे यांनी एक महत्त्वाची आठवण सांगितली, या आठवणीत माओ यांनी नेहरूंना निरोप कसा दिला त्या क्षणाचं वर्णन केलं आहे. “आम्ही झोंगनन्हायमध्ये होतो… माओ स्वतः नेहरूंना त्यांच्या गाडीपर्यंत सोडायला आले. हस्तांदोलन करत असताना, माओ यांनी अचानक चिनी काव्यसाहित्यातील प्रसिद्ध कवी क्यू युआन यांच्या दोन ओळी पुटपुटल्या. माओ म्हणाले, ‘जिवंतपणीचा वियोग यापेक्षा मोठं दु:ख नाही आणि पहिल्या भेटीच्या आनंदापेक्षा मोठा आनंदही नाही.’”

सुवर्णकाळ

“नेहरू भारतात परतल्यानंतर या दौऱ्यामुळे चीनबद्दल मैत्रीपूर्ण भावना निर्माण झाली होती… १९५६ साली (चीनचे पंतप्रधान) झोउ एनलाई यांच्या भारत दौऱ्याच्या वेळी त्यांचं प्रचंड उत्साहात स्वागत झालं आणि ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ या सुरेल घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कदाचित हाच भारत-चीन संबंधांचा सुवर्णकाळ होता,” असं त्यांनी लिहिलं.

तो सुवर्णकाळ फार काळ टिकला नाही. तिबेटमध्ये चीनविरोधी उठाव झाला आणि त्यात १४वे दलाई लामा १९५९ साली भारतात आश्रय घेण्यासाठी आले. यामुळे भारत तिबेटमध्ये हस्तक्षेप करत असल्याची चिनी शंका अधिक तीव्र झाली. १९६२ च्या भारत-चीन युद्धाने या संबंधांवर मोठा आघात केला आणि नेहरू यांच्यावर चीनकडून येणाऱ्या धोक्याचा अंदाज न घेण्याबद्दल तीव्र टीका झाली.