प्रा. मंजिरी घरत
जिवाणू, विषाणू, बुरशी आदी सूक्ष्म जीवांमुळे माणसाला आजार होतात, हेच मुळी १८७० पर्यंत माहीत नव्हते. पण ही माहिती झाल्यावर काळजी घेतली जाऊ लागली.. ती आता आपणही घेतोच आहोत; पण एखाद्या विषाणूचा प्रभाव ओसरला म्हणून सूक्ष्म जीवांशी आपली लढाई संपणार थोडीच?
वास्तविक या पंधरवडय़ासाठी ‘आरोग्यनामा’त लिहायच्या लेखाचा विषय वेगळा योजून ठेवला होता; पण करोनामुळे वातावरण इतके भारलेले आहे की दुसऱ्या कशाचाही विचार करवत नाही. भविष्यात जगाचा अंत हा अणुयुद्धाने वगैरे नसून जंतुयुद्धाने होऊ शकतो.. सूक्ष्म जीव हे आपल्याला पुरून उरणार आहेत की काय असे वाटावे इतपत दहशत आज करोना विषाणूने आपल्याला बसवली आहे. करोनामुळे चीननंतर इटलीसारख्या देशात इतका हाहाकार माजला आहे की वैद्यकीय व्यवस्था अपुरी पडते आहे आणि आजारी रुग्णांपैकी कुणाला उपचार द्यायचे आणि कुणाला दैवाच्या हवाल्यावर सोडायचे हे वैद्यकीय पथकांना ठरवावे लागत आहे. या विषाणूने जी विषण्णता निर्माण केली आहे त्यास तोड नाही. आपल्या महाकाय देशातही अक्षरश: प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यावर काही ना काही, प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परिणाम होत आहे आणि हे अभूतपूर्व आहे.
इतर काही देशांपेक्षा आपल्या केंद्र आणि राज्य शासनाने कोविड-१९ चा धोका ओळखून अतिशय जलद, विचारपूर्वक आणि कल्पकतेने पावले उचलली आहेत, यासाठी शासनाचे आभार आणि अभिनंदनही! त्यांच्या प्रयत्नास साथ देण्यासाठी आपणही गांभीर्याने सर्व काळजी घेतली पाहिजे. या करोनायुद्धात झटणाऱ्या साऱ्या वैद्यक व्यावसायिक, फार्मासिस्ट्स, आरोग्यसेवक आणि यंत्रणेतील राबणाऱ्या सर्वाना मनापासून प्रणाम!
साथीच्या आजारांचा इतिहास खूप जुना आहे, पण आज वाचताना आश्चर्य वाटेल की, सूक्ष्म जीवांमुळे असे काही आजार होतात हे एकोणिसाव्या शतकापर्यंत मान्य झाले नव्हते. त्यामुळे त्यावर उपायही नव्हते. विषारी हवेमुळे, देवाच्या कोपामुळे प्लेग, यलो फीव्हर अशी रोगराई होत असल्याचे समज त्या काळात सर्रास होते. लुई पाश्चर (१८२२-१८९५) या फ्रेंच वैज्ञानिकाने १८६० च्या सुमारास सूक्ष्म जीव हे अनेक रोगांचे मूळ आहे हे अँथ्रॅक्स या आजाराचा अभ्यास करत निर्वविाद सिद्ध केले आणि ‘जर्म थिअरी’ प्रस्थापित झाली. उपद्रवी सूक्ष्म जीवांना (अनेक सूक्ष्म जीव उपयुक्तही असतात.) जंतूंमुळे होणारी लागण व त्यातून होणाऱ्या आजारांना जंतुप्रादुर्भाव म्हणजे इन्फेक्शन्स असे म्हटले जाऊ लागले. त्यानंतर मुख्यत: जिवाणू (बॅक्टेरिया) विषाणू (व्हायरस), बुरशी (फंगी) यांवरील संशोधनाला दिशा मिळाली. ही सारी जंतुजन्य ‘इन्फेक्शन्स’ एकाकडून दुसऱ्याकडे संक्रमित होणाऱ्या म्हणजे संसर्गजन्य (कम्युनिकेबल) आजारांचे कारण ठरतात. उदाहरणार्थ क्षयरोग (टीबी), एड्स, कांजिण्या, स्वाइन फ्लू, हिवताप (मलेरिया), विषमज्वर (टायफॉईड) अशी शेकडो इन्फेक्शन्स आहेत. हवेतून, निकटच्या संपर्काने, पाण्यातून, अन्नातून, कीटकांमार्फत, काही प्राण्यांमार्फत, असुरक्षित लैंगिक संबंधातून जंतू संक्रमित होतात. वेगवेगळ्या जंतुप्रादुर्भावांची संक्रमित होण्याची पद्धत वेगळी. मात्र या सर्व जंतूंना एकाकडून दुसऱ्याकडे संक्रमित होण्यासाठी काही ना काही माध्यम लागते. काही उदाहरणे बघू. मलेरियाचे प्लास्मोडिया हे जंतू डासांना वाहन बनवतात, तर पोटातील इन्फेक्शनचे जिवाणू दूषित अन्न-पाणी, अस्वच्छ हात, घरमाश्या यांतून आपल्या शरीरात प्रवेशतात. श्वसनमार्गाची इन्फेक्शन्स बहुतेकदा रुग्णाच्या खोकण्यातून, शिंकण्यातून जे तुषार उडतात त्यातून होतात, कारण या तुषारांतील जंतू हवेमार्फत नजीक असलेल्या व्यक्तीच्या श्वसनमार्गात प्रवेशतात, हवेत काही काळ तरंगत राहतात किंवा हे तुषार भोवतालच्या वस्तूंवर पडून जंतू त्या वस्तूंवर काही काळ राहतात आणि त्या वस्तूंना हात लावून जर चेहऱ्यास हात लावला गेला तर संक्रमित होतात.
इन्फेक्शन्सपासून बचाव करायचा म्हणजे वैयक्तिक पातळीवर आपण काय करू शकतो? रोगप्रतिकारक शक्तीची ढाल उत्तम ठेवायला हवीच, त्यासाठी उत्तम आहारविहार हवा ही अगदी मूलभूत बाब. त्याचबरोबर वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयी आणि जाण हवी. इन्फेक्शन्सना खीळ घालण्यासाठी त्यांच्या संक्रमणाची साखळी तोडणे अत्यंत महत्त्वाचे असते. टीबी, डायरिया, न्यूमोनिया अशी अनेक इन्फेक्शन्स आपल्याकडे कायम असतात आणि त्यासाठी एक महत्त्वाचा प्रतिबंध म्हणून आरोग्याच्या चांगल्या सवयी कायम प्रत्येकाला असायला हव्यात.. केवळ एखाद्या साथीपुरते नव्हे. हे आपल्याला माहीत नाही असे नाहीच. पण करोनामुळे ‘हात धुणे’ आणि ‘खोकतानाची काळजी’ या प्राथमिक बाबींकडे आपले नव्याने लक्ष वेधले गेले आहे.
आपल्यापैकी बरेच जण कसे हात धुतो? लावला साबण, धुतले हात, कदाचित १० सेकंदांहून कमी वेळचा मामला. हॅप्पी बर्थडे किंवा ट्विंकल ट्विंकल या धून माहीत आहेत ना? किती वेळ लागतो म्हणायला? साधारण २० सेकंद. तर ही २० सेकंद लक्षात ठेवायची. तितका वेळ स्वच्छ हात धुण्यासाठी द्यायचा. अर्थात पाण्याचा अपव्यय नाही करायचा, पण हाताच्या कानाकोपऱ्यात पोहोचून साबणाची डिटर्जन्ट क्रिया होण्यासाठी वेळ द्यायचा.
जागतिक आरोग्य संघटनेतर्फे हॅन्डवॉशिंगच्या सूचना अशा आहेत:
– प्रथम हातावर पाणी घेऊन हात ओले करणे. साबण लावून फेस आणणे. हातावर हात चोळणे. हाताची मागची बाजू चोळणे. बोटे एकमेकांत गुंफणे, बोटांचा कप करणे, अंगठे चोळून स्वच्छ करणे. परत तळवे एकमेकांवर चोळणे आणि पाण्याने साबण धुणे.
– करोनामुळे आपण सध्या वारंवार हात धुवत आहोत, पण करोनानंतर काही ठरावीक वेळा हात धुतले तरी चालू शकेल. बाथरूम/संडासला जाऊन आल्यावर, काही खाण्यापूर्वी/वाढण्यापूर्वी, स्वैपाक करण्यापूर्वी, बाहेरून घरी/ऑफिसात आल्यावर हात स्वच्छ धुतलेच पाहिजेत
– खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल किंवा टिश्यू धरला पाहिजे; ते नसल्यास हात मुडपून मुडपलेल्या हातात खोकले पाहिजे, जेणेकरून तुषार इतस्तत: उडणार नाहीत. खरे तर हाताच्या तळव्यात कधीही खोकू-िशकू नये. तसे केल्यास हजारो तुषार हातावर पडतात आणि जंतू हातावर राहतात, इन्फेक्शन्स वाढतात.
अस्वच्छ हातांमुळे पोटातील इन्फेक्शन्स, डोळ्यांची आणि श्वसनमार्गाची करोनासारखी काही इन्फेक्शन्स होतात. हात स्वच्छ धुण्याची जाणीव आणि सवय आपल्याकडे फार कमी प्रमाणात आहे असे अनेक अभ्यासकांना आढळले आहे. नुसते ‘हात स्वच्छ धुणे’ इतके केले तरी ५० टक्क्यांहून जास्त पोटाची इन्फेक्शन्स कमी होतील, असा तज्ज्ञांचा अदमास आहे. याविषयी जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १५ ऑक्टोबरला ‘ग्लोबल हॅण्डवॉशिंग डे’ असतो. यावरून हात धुणे या फारच किरकोळ वाटणाऱ्या दैनंदिन क्रियेचे महत्त्व लक्षात यावे.
खोकताना काळजी घेतल्यास, श्वसनमार्गाच्या इन्फेक्शन्सचा प्रसार कमी करण्यासाठी आपण आपल्या परीने हातभार लावू शकू. टीबीसाठी तर खूप जनजागरण मोहीम आपल्याकडे कायम असते. करोनाने जगभरात साडेआठ हजार बळी घेतले अशा बातम्या आहेत. प्रत्येक मृत्यू ही एक दु:खद घटना आहे. दरवर्षी आपल्या देशात टीबीमुळे तब्बल चार-साडेचार लाख मृत्यू पावतात. जगातील एकचतुर्थाशहून अधिक (२५ टक्क्यांपेक्षा जास्त) टीबीचे रुग्ण आपल्या देशात आहेत. फुप्फुसाचा (खोकल्याचा) टीबी श्वसनमार्गातील वास्तव्य करणाऱ्या जंतूंमुळे हवेमार्फत पसरतो. रोगनिदान न झालेला फुप्फुसाचा एक क्षयरोगी खोकून खोकून नजीकच्या १० ते १५ व्यक्तींना वर्षभरात हे इन्फेक्शन सहज देतो. वर्षभरात २० लाखांहून अधिक लोक भारतात टीबीग्रस्त होतात. सर्वाधिक मृत्यूंना कारण असा एकमेव जंतू हा किताब जागतिक आरोग्य संघटनेने टीबीच्या जिवाणूला- मायकोबॅक्ट्रियम टय़ुबरक्युलॉसिसला दिला आहे. हे सारे भयानक वास्तव आहे. आज करोनामुळे जनजागृती उत्तम झाली आहे. करोना परदेशी पाहुणा.. आज आहे, उद्या नसेल अशीच आशा आहे. आज करोनाने आपल्याला ‘हेल्दी हॅबिट्स’चे महत्त्व प्रकर्षांने जाणवून दिले आहे. हात स्वच्छ धुणे, खोकतानाची काळजी या प्राथमिक आणि आपण सहजपणे करू शकतो अशा बाबी आहेत. हा वर्तणूक बदल (बिहेवियरल चेंज) घडवणे आणि कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. आपण स्वत: काळजी घ्यायची आणि सभ्यपणाचे नियम पाळून इतरांनाही घ्यायला लावायची.
सारांश अगदी साधा आहे आणि तो सर्वाना कळला आहेच, तरीही हिंदीत सर्वाना सांगू : करोना के साथ भी, करोना के बाद भी, आप इतना जरूर ‘करो ना’!
वारंवार आयबुप्रोफेन?
आयबुप्रोफेन हे वेदना, सूज, ताप यांवरील ‘शेडय़ूल एच’ – म्हणजे प्रिस्क्रिप्शनशिवाय न मिळणारे औषध. आयबुप्रोफेन सिंगल किंवा पॅरासिटामोलसह अशी याची अनेक उत्पादने मार्केटमध्ये आहेत. ज्या व्यक्ती वारंवार आयबुप्रोफेन घेतात, त्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक अशी माहिती येत आहे; परंतु आयबुप्रोफेनचे करोनाशी नक्की नाते काय हे निर्णायकरीत्या सिद्ध होण्यास वेळ लागेल. त्याबद्दल खात्रीने आज लिहिताच येणार नाही. त्यामुळे ताप आल्यास पॅरासिटामोल (ओटीसी औषध) घ्यायचे आणि त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्यायचा हे करणे योग्य राहील.
लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
ईमेल : symghar@yahoo.com