प्रा. मंजिरी घरत

हॅण्ड सॅनिटायझर प्यायचे नसते, हे सर्वाना कळतेच; पण विनाकारण फवारण्या करून घेणे थांबलेले नाही! स्वच्छता आणि जंतुनाशन या भिन्न क्रिया असल्याचे लक्षात ठेवून, जंतुनाशके कुठे-कशी वापरावीत, याचे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. ते नसेल, तर नुकसानही संभवते; कारण अखेर गाठ रसायनांशी आहे..

‘जंतुनाशक प्या, करोना बरा करा’ अशा आशयाचे विधान अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांनी केले आणि नेहमीप्रमाणेच हास्यविनोद,चच्रेला उधाण आले. त्यांचा हिशेब साधा होता, जंतुनाशक जर आपण जंतूंना मारायला बाहेर वापरतो, तर मग तोच उपाय शरीरात करायला काय हरकत आहे? नंतर त्यांनी मी गमतीत बोललो, उपरोधाने बोललो वगैरे सारवासारव केली खरी पण ते काही कुणी फारसे मनावर घेतले नाही, ही गोष्ट निराळी!

कोविडमुळे एकंदर स्वच्छता आणि जंतुनाशन याविषयी आपण खूप जागरूक झालो आहोत ही जमेची बाजू. जंतुनाशन (डिसइन्फेक्शन) म्हणजे रोगजंतूंना मारण्याची किंवा त्यांची वाढ थांबण्याची क्रिया जेणेकरून आरोग्यास अपाय होणार नाही. जिवाणू, विषाणू, बुरशी, प्रोटोझोआ असे  सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव या रोगजंतूंत आले. जंतुनाशक म्हणून विविध रसायने किंवा उच्च तापमान, अतिनील (अल्ट्राव्हायोलेट- यूव्ही) सारखे किरण वापरले जातात. त्याचा प्रभाव काही अवधीसाठी राहतो. जंतू सर्वत्रच असतात- पृष्ठभाग (सरफेस), वस्तू, सभोवताल, मानवी आणि प्राण्यांचे शरीर, कुठेही. एकाच प्रकारचे जंतुनाशक घेऊन सगळीकडे वापरू शकतो का? तर तसे शक्य नाही. सुलभीकरण करून सांगायचे तर निर्जीवावर वापरायचे ते ‘डिसइन्फेक्टंट’, सजीव बाह्य़ांगावर वापरायचे ते ‘अ‍ॅण्टिसेप्टिक’ आणि पोटात घ्यायची ती ‘अ‍ॅण्टिबायोटिक्स’. सॅनिटायझर ही संज्ञाही डिसइन्फेक्टंट, अ‍ॅण्टिसेप्टिकसाठी वापरतात. रोगजंतूंना दूर ठेवण्यासाठी आरोग्यक्षेत्र, अन्न-औषध उद्योग, कुक्कुटपालन अशा अनेक उद्योगधंद्यांत डिसइन्फेक्टंट वापरावी लागतात. डिसइन्फेक्शनच्या  पुढची पायरी म्हणजे स्टेरिलायझेशन- पूर्ण निर्जंतुकीकरण- जे फार्मास्युटिकल उद्योगधंद्यात इंजेक्शनसारखी उत्पादने बनवताना, हॉस्पिटल, ऑपरेशन थिएटर  येथे केले जाते.

ईथाइल अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल, क्लोरिनची संयुगे, अ‍ॅसिडस्, बेन्झलकोनिअम क्लोराइड, क्लोरोझलिनॉल, क्लोरहेक्सिडीन, आयोडिन, हायड्रोजन पेरॉक्साइड, हेक्सालोरोफिन अशी असंख्य रसायने जंतुनाशके आहेत. सूक्ष्मजीवांच्या पेशींमधील प्रोटिन्स निकामी करणे, पेशींमध्ये ऑक्सिकरण करणे, पेशीकेंद्रातील ‘डीएनए’ला इजा करणे अशा त्यांच्या वेगवेगळ्या कार्यपद्धती. प्रत्येक जंतुनाशक हे सर्व प्रकारच्या जंतूंविरुद्ध किंवा काही जंतू तयार करत असलेल्या सुरक्षाकवच (स्पोरस) विरुद्ध प्रभावी असतेच असे नाही. काही जंतुनाशक द्रव्ये ब्रॉडस्पेक्ट्रम असतात उदा. अल्कोहोल, क्लोरिन जे अनेक जिवाणू आणि करोनासारख्या विषाणूविरुद्धही प्रभावी आहे. जंतुनाशकाची क्षमता (पॉवर), त्याचा कॉण्टॅक्ट पीरियड म्हणजे जंतुनाशक आणि वस्तू/पृष्ठभाग किंवा त्वचा हे किती वेळ संपर्कात आहेत, हे महत्त्वाचे असते. यावरून लक्षात आले असेल की, अ‍ॅण्टिबायोटिक्सच्या बाबतीत जसे योग्य डोस, योग्य कालावधी महत्त्वाचे असते तसाच प्रकार येथेही असतो; कारण शेवटी गाठ जंतूशी आहे. काही जंतू डिसइन्फेक्टंटना निर्ढावणे (रेझिस्टंट होणे) हेदेखील होऊ शकते, त्यावर अधिक संशोधन चालू आहे. घरगुती वापरात जखमा, इन्फेक्शन्सवर उपचार करण्यासाठी द्रवाची फवारणी (स्प्रे), हॅण्ड/माऊथवॉश, हॅण्ड सॅनिटायझर, पुसण्यासाठी वाईप, काही साबण, टॉयलेट क्लिनर, फ्लोअर क्लिनर अशा उत्पादनांचा आपल्याशी संबंध येतो. ही सारी उत्पादने ९९.९ टक्केपर्यंत जंतूंना मारण्याची ग्वाही देतात, ‘१०० टक्के’चा दावा कुणी करत नाही!

जंतुनाशक निवडताना ते कुठे वापरायचे आहे, तिथे नक्की कोणते जंतू असण्याची शक्यता आहे, जंतुनाशकामुळे तिथे काही अपाय तर होणार नाही ना हे विचारात घ्यावे लागते. सर्वसाधारपणे निर्जीव वस्तू, पृष्ठभाग, परिसर जिथे जंतू प्रचंड असू शकतात, शिवाय दुसरी काही रोगप्रतिकारक यंत्रणा नसते तिथे अधिक तीव्र रसायन, तेही जास्त क्षमतेचे वापरले जाते. पण मानव, प्राणी यांच्या शरीरावर वापरताना मात्र ते सौम्य स्वरूपात वापरावे लागते, अन्यथा ते आरोग्यास घातक ठरते. यातील बरीच रसायने ही अ‍ॅण्टिसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट दोन्ही म्हणून काम करू करतात. पण त्यांची पॉवर/स्ट्रेंग्थ वेगळी वापरली जाते. उदा. हैड्रोजन पेरॉक्साइड आपल्या जखमांवर वापरताना तीन ते सहा टक्केच पॉवर, पण हेच रसायन उद्योगधंद्यांत वापरताना ३० टक्क्यांहून जास्त पॉवरचे वापरतात. बाजारात मिळणारी काही उत्पादने त्वचा तसेच निर्जीव वस्तू अशा दोन्हींसाठी वापरता येतात.  पण ते प्रत्येक उपयोगासाठी किती वापरायचे, किती पाण्यात विरल करायचे हे महत्त्वाचे असते, तशी सूचना लेबलवर असते.

डिसइन्फेक्टंट्सचे नियंत्रण औषध आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, मेडिकल डिव्हाइस नियमाखाली केले जाते. आता रसायने न वापरता यूव्ही लाइट वापरून मोबाइल फोन  किंवा तत्सम वस्तूंना डिसइन्फेक्ट करायला छोटी उपकरणे बनवली जात आहेत. असे अनेक नवीन प्रयोग आणि उत्पादने आपल्याला येत्या काही वर्षांत पाहायला मिळू शकतात. एकंदर डिसइन्फेक्टंट्स हे प्रचंड वेगाने वाढणारे क्षेत्र आहे.

अ‍ॅण्टिसेप्टिक/ डिसइन्फेक्टंट्स आता आपण गेली शेदीडशे वर्षे वापरत आहोत. पण त्यातील हॅण्ड सॅनिटायझर किंवा हॅण्ड रब ही उत्पादने तशी नवीनच. हॉस्पिटलमध्ये इन्फेक्शन नियंत्रणासाठी,  स्टाफच्या हातांच्या स्वच्छतेसाठी प्रभावी, झटपट सोयीचे उपाय हवेत यासाठी प्रयत्न चालू झाले.  १९६०च्या दशकात  हाताला नुसते चोळून जंतुनाशन करणारे, अल्कोहोल मुख्य माध्यम असलेले पहिले सर्जिकल हॅण्ड रब ‘स्टरिलियम’ आले. तेव्हापासून आरोग्यक्षेत्रात अशा हॅण्ड रब वापरले जाऊ लागले. पण जनसामान्यांना मध्ये ते फारसे प्रचलित नव्हते. कालांतराने अमेरिकेत १९९६ अल्कोहोल हॅण्ड रब मार्केटमध्ये शेल्फवर आले, पण ते फारसे लोकप्रिय झाले नव्हते. रोगनियंत्रण केंद्राने (सेंटर फॉर डीसीज कंट्रोल) २००२ मध्ये  अशा हॅण्ड रबना  हातांच्या स्वच्छतेसाठी एक पर्याय म्हणून मान्य केले, जागतिक आरोग्य संघटनेने २००९ मध्ये त्यांच्या हात धुण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांत हॅण्ड रबचा उल्लेख केला. त्याच वर्षी स्वाइन फ्लूची साथ अमेरिकेत आली आणि हॅण्ड रब हे फक्त  हॉस्पिटलपुरते मर्यादित न राहता घराघरांत शिरले. आपल्याकडे  याचा वापर मर्यादित होता. पण आता सर्वाना अल्कोहोलयुक्त हॅण्ड सॅनिटायझर सुपरिचित झाले आहेत. यात ६० टक्के वा अधिक अल्कोहोल असते आणि हात कोरडे होऊ नयेत म्हणून ग्लिसरीनसारखे घटक असतात. अलीकडे काही संशोधकांनी सॅनिटायझरचा अतिवापर करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. हातावरील उपयुक्त जिवाणू मरणे, हात अति कोरडे होणे, त्यामुळे इन्फेक्शन्स होणे अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. अर्थात यावर फारसा अभ्यास अद्याप झालेला नाही.

तात्पर्य :

*  साबण आणि वाहत्या  पाण्याने योग्य तंत्राने हात धुणे, कोरडे करणे हा हातांच्या स्वच्छतेचा राजमार्ग; मात्र जेव्हा साबण/पाणी उपलब्ध नसेल किंवा प्रवासात, सार्वजनिक ठिकाणी पर्याय म्हणून जरूर अल्कोहोलयुक्त हॅण्ड सॅनिटायझर वापरायचा. पण उगाच ऊठसूट नव्हे. आणि त्यात अल्कोहोल (ज्वालाग्राही) असल्याने काळजीपूर्वक वापरायचे.

*   हॅण्ड सॅनिटायझर संपूर्ण हाताला, हाताच्या मागच्या बाजूला नीट लावून हात एकमेकांवर चोळून पूर्ण कोरडे होऊ द्या. त्यानंतर लगेच हात धुवायचे नाहीत.

*   हॅण्ड सॅनिटायझर बाटल्या किंवा त्याचे बसवलेले डिस्पेन्सर इलेक्ट्रिक स्वीच, गॅस, सूर्यप्रकाश यांपासून दूर हवे.

*   डिस्पेन्सरमधून गळती होऊन बऱ्याच प्रमाणात जमिनीवर सांडल्यास पाण्याने विरळ करणे, कोरडी वाळू त्यावर टाकणे

*   त्याचा गैरवापर होत नाही ना (अल्कोहोल असल्याने) यावर नजर ठेवणे

*  घरात जखमांसाठी, फरशी, टॉयलेटसाठी जंतुनाशक उत्पादने वापरताना त्यावरील लेबल वाचून त्याप्रमाणेच वापरणे.

*   वेगवेगळी क्लििनग उत्पादने एकत्र न करणे. उदा. ब्लिचिंग पावडर आणि कोणतेही अ‍ॅसिड एकत्र केले तर खूप अपायकारक गॅस तयार होतो.

*   बाटली संपली की फेकून किंवा रिसायकलला देण्याआधी त्यात पाणी घालून धुणे, लेबल काढणे,

*   लहान मुले, पाळीव प्राणी यांपासून सर्व जंतुनाशके दूर ठेवणे (अमेरिकेत लहान मुलांनी सॅनिटायझर खाल्ल्याने तेथील विष नियंत्रण केंद्राला चार वर्षांच्या अवधीत ८५,००० फोनकॉल्स आले होते.).

*   घरात सूर्यप्रकाश येऊ देणे, हादेखील उत्तम नैसर्गिक डिसइन्फेक्टंट आहे.

जंतूंपासून सुरक्षित ठेवण्यासाठी, जंतुनाशकांचा वापर घरगुती स्तरावरही आवश्यक आहेच. पण  ही सर्वच  रसायने आहेत, वापरताना तारतम्य हवे. स्वच्छता आणि जंतुनाशन या दोन वेगळ्या बाबी आहेत. जितके आपण रासायनिक वातावरणात राहू तितके प्रकृतीला आणि पर्यावरणाला अपायकारक होऊ शकते. अलीकडे सोडियम हायपोक्लोराइटेचे फवारे किंवा सॅनिटायझर टनेल वगैरे निर्माण केले गेले. पण त्याची  गरज, उपयुक्तता आणि अपायक्षमता अभ्यासणे आवश्यक आहे. रसायने आणि आरोग्यभान यांची सांगड घालणे हे महत्त्वाचे!