News Flash

बालदमा

लहान मुलांना पावसाळ्यात तसेच विशेषत: थंडीत दम्याचा त्रास जाणवायला लागतो.

मागील सदरात आपण श्वासाचा आणि आयुष्याचा संबंध पाहिला. याच श्वासाचा व्याधी झाला, दमा झाला किंवा अस्थमा झाला किंवा आपल्याला तो होऊ नये म्हणून आज्जीबाईच्या बटव्यात काय दडले आहे हे आता पाहायचे आहे. तर याची सुरुवात आपण बालदम्यापासून करू.

लहान मुलांना पावसाळ्यात तसेच विशेषत: थंडीत दम्याचा त्रास जाणवायला लागतो. अशा वेळी लगेच त्यांना एखादा पंप किंवा नेब्युलायझेशन सुरू करण्यापूर्वी प्रथम आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने काही औषधोपचार सुरू करावेत, कारण ‘दम’ हा कफ प्रकारातील व्याधी आहे. त्यामुळे कफ वाढू लागला, की मुलांना याचा त्रास जाणवू लागणार आहे. सततची सर्दी, कफाने भरलेली छाती, थोडय़ा थोडय़ा दिवसांनी जाणवणारा बारीक ताप व थोडय़ाशाही कारणावरून मुलांची होणारी चिडचिड किंवा रडता रडता धाप लागणे, श्वास कोंडणे अशा लक्षणांपासून या आजाराची सुरुवात होते. नंतर ही लक्षणे वाढू लागतात व ‘बालदमा’ होतो. मुले लवकर थकायला लागतात. काही मुले पाय दुखत आहेत, असेही सांगू लागतात. गंमत म्हणजे दम्याचा आणि कफाचा काय संबंध? इथपर्यंत प्रश्न विचारण्याचे धाडस आजकालचे काही पालक करतात तेव्हा हसावे की रडावे हेच कळत नाही. खरे तर दोष त्यांचा नाहीच, कारण आपल्याला सध्याच्या शैक्षणिक पद्धतीत व्हिटॅमिन, प्रोटीन, काबरेहायड्रेटच्या भाषेत त्याच पदार्थाची वात-पित्त-कफाची भाषाच कधी शिकवली जात नाही. माझ्याकडे तर एक पालक आपल्या मुलाच्या दमा या आजारासाठी औषधे घेण्यास आले होते. आठवडा झाला तरी अपेक्षित फायदा झाला नाही म्हणून मी त्या मुलाची दिनचर्या सांगा म्हटले, तर तो रोज सकाळी त्याच्या वडिलांबरोबर २ तास पोहायला जात होता. हे समजताच माझे निदान तर झाले होते, मात्र पोहण्याचा आणि दम्याचा काहीही संबंध नाही, असे त्यांना कोणी तरी सांगितले होते. त्यांना ही वात-पित्त-कफाची भाषा समजावयाला माझा फार वेळ गेला; पण नंतर ही चूक त्यांच्या लक्षात आली व पोहणे बंद करताच दमा बरा झाला हेही त्यांना जाणवले. आपल्याला आजकाल आइस्क्रीमच्या डब्यावर व्हिटॅमिन, प्रोटीन इत्यादी घटक लिहिलेले वाचायला मिळतात, पण आइस्क्रीममुळे कफ वाढतो हे वाचायला मिळत नाही. शाळेत, महाविद्यालयातही शिकवले जात नाही; पण म्हणून काही सत्ये नाकारता येत नाही. या दोन्ही एकाच पदार्थाला समजून घेण्याच्या दोन भाषा आहेत व दोन्ही बरोबर आहेत. आपण मात्र योग्य वेळी गरजेनुसार ते समजून घेतले पाहिजे.  एचटूओच्या भाषेत पाणी, साधे पाणी, फ्रिजचे पाणी, उकळलेले पाणी, बर्फ सर्व सारखेच. फक्त थोडे रचनेत बदल झाले. मात्र आयुर्वेदात या प्रत्येकाचे गुणधर्म व कार्ये वेगवेगळी आहेत. हाच फरक आहे. म्हणून बालदम्याचा त्रास असणाऱ्या मुलांना प्रथम कफकारक पदार्थ व कफवर्धक विहार बंद करा. उबदार वस्त्र घालायला द्या. नेहमी बाहेर जाताना डोके, कान झाका. फार वारा, पंखा किंवा ए.सी. समोर बसवू नका. रोज छाती, पोट, पाठ ओव्याच्या पुरचुंडीने शेका. एक चमचा दालचिनी, २० मनुके, चार चमचे खडीसाखर व दोन चमचे आल्याचा रस टाकून हे मिश्रण दिवसभर थोडे थोडे घ्या. जास्त दम लागत असल्यास वैद्याच्या सल्ल्याने चाटवायला द्या. नेब्युलायझेशन कायमचे बंद होईल. कफ मोकळा होऊ  द्या. तो बाहेर पडू द्या आणि विकृत कफ आहारविहाराने तयार होणार नाही याची काळजी घ्या. लहान मुलांचे वय हे कफाचे वय आहे. त्यामुळे प्राकृत कफ निर्माण झाल्यास त्यांचे पोषण होऊन मुले छान गुटगुटीत होतील, तर विकृत कफ निर्माण झाल्यास सतत आजारी पडतील. तुमचे सर्व अन्य प्रयत्न करून झाले असतील व तरीही बालदमा बरा झालेला नसेल तर आपले काही तरी चुकत आहे हे तरी समजून घ्या. आपल्या अज्ञानाची शिक्षा आपल्या मुलांना देऊ  नका. कमीत कमी ही वात-पित्त-कफाची तरी भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करा.

कधी कधी आपला आयुर्वेदावर विश्वास नसतो म्हणून आपण मुलांनाही या चिकित्सेपासून दूर ठेवतो ही आजची वस्तुस्थिती आहे. एका बाजूला सर्व जग लहान मुलांवर अनावश्यक अँटिबायोटिक्स वापरू नका, असे सांगून भविष्यातील धोक्याची जाणीव करून देत असतानाच आपणच आपल्या मुलाला सर्दीसारख्या व्हायरसमुळे होणाऱ्या आजारावर अँटी व्हायरलऐवजी अँटी बॅक्टेरिअल देत असतो. मग हे आपले अज्ञानच नाही का? विचार बदला ..नशीब बदलेल.

-वैद्य हरीश पाटणकर
harishpatankar@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 1:09 am

Web Title: asthma 3
Next Stories
1 श्वास
2 पक्षाघात
3 शीतपित्त
Just Now!
X