आनंदाचे डोही आनंद तरंग! हा जीवनानुभव होण्यासाठी एक सद्गुरुमयताच अनिवार्य आहे, असं हृदयेंद्र म्हणाला..
योगेंद्र : सद्गुरुमय म्हण किंवा ध्येयाशी एकरूप होण्यासाठी म्हण, पण त्यासाठी साधना हवीच. मनाला त्या ध्येयाशी एकरूप होता यावं, चित्ताला सदोदित त्या चिंतनात रममाण होता यावं, बुद्धीला बोधासाठी तोच प्रधान विषय असावा यासाठीचा योग साधलाच पाहिजे.. त्यासाठी ‘गीते’तल्या सहाव्या अध्यायात किती तरी मार्गदर्शन आहे.. योग्यानं एकांतस्थळी कसं रहावं.. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मन:.. म्हणजे पवित्र तीर्थस्थानी दृढ आसन लावून कशी साधना करावी, हे सारं सांगितलंय.. त्या अध्यायावरही चिंतन करीत गेलं तरी साधना सखोल होईल..
हृदयेंद्र : ‘गीते’तल्या प्रत्येक अध्यायात प्रत्येक तत्त्वमार्गानुसार बरंच काही सांगितलं आहे.. प्रत्येकानं त्यातून योग शोधला आणि साधलाही आहे.. कुणी कर्माच्या योगानं, कुणी ज्ञानाच्या योगानं.. ध्येयपूर्तीकडे पावलं टाकलीच आहेत.. पण संपूर्ण गीतेचं सार शेवटच्या अठराव्या अध्यायातल्या बोधाच्या शेवटच्या दोन ओळींत आहे.. ‘मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरू’ आणि ‘सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज!’ माझाच हो, माझीच आवड वाढव, मलाच नमस्कार कर.. द्वैतात गटांगळ्या खात असलेलं जग कधीच कुणाचं नाही! त्या जगाचा होऊ नकोस, त्या जगाची आवड वाढवू नकोस, त्या जगाच्या आकार मोहात अडकू नकोस! नम: आकार: .. प्रत्येक आकारमात्रात मीच आहे ही जाणीव ठेवून आकाराकडे नको माझ्याकडे लक्ष ठेव! सर्व मनोधर्माचा त्याग करून मलाच शरण ये..
कर्मेद्र : पण अशी शरणता म्हणजे लाचारीच नाही का?
हृदयेंद्र : प्रत्येक लहान-सहान सुखासाठी आम्ही जगाला शरण जात नाही का? कुणाचे ना कुणाचे लाचार होत नाही का?
कर्मेद्र : का? मी नेटानं व्यवसाय करतो, तुम्ही नोकऱ्या करून स्वत:च्या पायावर उभे आहात.. आपण कुठे कुणाची लाचारी करतो?
हृदयेंद्र : सर्व नियमांनुसार असूनही कामं मार्गी लागावीत म्हणून तुला यंत्रणेसमोर सुकावं लागतंच ना? नोकरीतला प्रत्येक जणही आपलं स्थान, प्रतिष्ठा, प्रतिमा चांगली राहावी म्हणून धडपडतोच ना? मग जर अहोरात्र आम्ही या ना त्या स्वरूपात जगाला शरण आहोत तर त्यापेक्षा त्या भगवंताचं होण्यात आणि त्याला शरण जाण्यात काय वाईट आहे? तर सगळी गीता या दोन ओव्यांत आहे..
योगेंद्र : पण ‘गीते’त जागोजागी साधकाला उपयुक्त असा बोधही आहे..
हृदयेंद्र : आहेच, पण तो या दोन ओव्यांच्या अनुषंगानं लक्षात घेण्याची माझी सवय आहे.. ज्याला सद्गुरुमय जीवन जगायचं आहे त्यानं जीवन कसं जगावं, हेही गीताच सांगते! भगवंत म्हणतात ना? जो खूप खातो किंवा अगदी कमी खातो, जो खूप झोपतो किंवा अगदी कमी झोपतो, तो योगी होण्याची शक्यता नाही!
योगेंद्र : ‘न अति अश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नत:। न च अति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव च अर्जुन।।’
हृदयेंद्र : युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु। युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खा।। म्हणजे जो माणूस आहार, विहार, झोपणं आणि जागणं या सर्व कर्मसवयींत नियमितता राखतो तोच योगी होतो आणि भवदु:ख दूर करू शकतो! आता हे जे युक्त म्हणजे युक्तीनं कर्म करणं आहे ती युक्ती, ती कला केवळ सद्गुरूच शिकवतात.. त्यांच्या बोधानुरूप आचरण करीत गेल्यानं ती कला साधता येते. त्याव्यतिरिक्त काही करणं म्हणजे गोंधळ आहे! त्या कोशकीटाच्या उपमेप्रमाणे! मग मी रम्यस्थानी उपासनेसाठी म्हणून जाईन आणि त्या स्थानाच्या सौंदर्यातच आसक्त होऊन उपासना विसरीन, असंही होईल!
कर्मेद्र : पण आपण चौघंही या वर्षभरात कुठेकुठे गेलो.. मथुरा काय, गोंदवलं काय.. पण या सत्गप्पांशिवाय दुसरं काही केलंच नाही.. हा ज्ञान्या मात्र नेहमीच गप्प राहिला.. असो अडाण्यांमध्ये काही न बोलणं हेही ज्ञान्याचं मुख्य लक्षणच आहे!
ज्ञानेंद्र : (हसतो) असं नव्हे! मी मनानं बरंच टिपून घेतो.. हृद्सारखं भावनेनं मात्र मला विचार करता येत नाही..
हृदयेंद्र : पण आपण जिथे कुठे गेलो तरी ही अभंगांची धारा कधीच खंडित झाली नाही.. मधेच ती लुप्त झाल्यासारखी वाटली तरी तिचा अंत:स्थ प्रवाह अबाधित होता.. आणि परिस्थितीमुळे आपण चौघं एकमेकांना दुरावलो तरी हा प्रवाह आजन्म अबाधित राहील!
चैतन्य प्रेम