साधनेसंबंधी तुकाराम महाराजांच्या दुसऱ्या अभंगाची चर्चा झाली आणि आता ‘आनंदाचे डोही’ अभंगाच्या उरलेल्या चरणांकडे हृदयेंद्र वळणार इतक्यात प्रज्ञा म्हणाली..
प्रज्ञा : साधनेसंबंधात जो अभंग निवडलास त्याच्या एका चरणाबद्दल मला वाटतं पुरेशी चर्चा झाली नाहीये..
हृदयेंद्र : (प्रज्ञाचं हे मत जणू अभिप्रेतच होतं असं हृदयेंद्रला वाटत होतंच. त्याच स्वरात.) कोणता चरण?
प्रज्ञा : तो स्त्रियांबद्दलचा..
योगेंद्र : (वहीकडे पाहात) ‘‘एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण। प्राण गेल्या जाण बोलो नये।।’’
प्रज्ञा : हं.. हाच..
हृदयेंद्र : पण मी म्हटलं ना, त्याचा अर्थ मी वेगळा घेतो..
कर्मेन्द्र : बिच्चारा हृदू! तीन बायका नि त्यांच्या शब्दाबाहेर न जाणारे तीन नवरे विरुद्ध एकटा! हरणार रे बाबा!!
प्रज्ञा : गंमतीवारी उडवू नका आणि आपण सातहीजण जुनाट विचारांना चिकटून नाही तेव्हा खरंच नीट चर्चा करा.. स्त्री ही साधनेतलं विघ्न का म्हणून असावी? आणि तू जो अर्थ लावतीस किंवा मानतोस तोच सर्वाना का लागावा आणि सर्वानी का मानावा? स्पष्ट जर लिहिलंय की स्त्रियांशी प्राण गेला तरी भाषणही करू नये तर इथे ‘स्त्री’ हाच शब्द का धरू नये? स्त्री साधनेत अडसर आहे? मग स्त्रीही साधना करीत नाही का?
हृदयेंद्र : करते आणि अगदी सिद्धपदापर्यंतही जाते.. मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई..
प्रज्ञा : पुन्हा तीच रीत.. चार-दोन नावं सांगायची.. पूर्वीच्या काळी काय गार्गी-मैत्रेयी होत्या.. पण मग ती परंपरा का नाही बनू दिली? उदाहरणं देता येतील एवढय़ांनाच स्वातंत्र्य मिळालं का? की आमच्याकडे समानता पूर्वापार आहेच! विद्वान स्त्रियाही आहेत.. संत स्त्रियाही आहेत.. पण वाईटाचं श्रेय स्त्रीच्या माथी! मुलगा चांगला निघाला तर श्रेय सर्वाचं, वाईट निघाला तर आईनं वळण लावलं नाही म्हणून! मूलच झालं नाही तर बघायलाच नको.. (या उद्गारानंतर प्रज्ञा मूक झाली. क्षणाभराची शांतताही सर्वानाच असह्य झाली..)
हृदयेंद्र : संतांनी स्त्रीदेहाची, स्त्रीमध्ये आसक्त होण्याची निंदा केली.. अगदी महिला संतांनीही केली. त्यामागे कारण आहे.. स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू म्हणून कलेच्याही माध्यमातून बिंबवलं जात होतं त्या काळात ही टोकाची टीका झाली आहे, प्रथम लक्षात घे..
प्रज्ञा : पण स्त्रियांशी बोलूही नका, असं ज्यांना सांगता ते साधकच मनानं कच्चे आहेत, हे का नाकारता?
हृदयेंद्र : अगदी बरोबर! पण म्हणून लोलुप्यता, कामना, निद्रा म्हणजे आळस या तीन गोष्टीही तर प्रथम सांगितल्या आहेत ना! साधकाची देहबुद्धी काही साधनेच्या प्रारंभी सुटली नसते.. त्या देहबुद्धीला सर्वात जवळचा वाटणारा आधार हा लैंगिकतेचा असतो आणि त्या आधारपूर्तीचं जे माध्यम असेल त्याच्याही प्रभावातून मुक्त व्हावं लागतं, हेच या चरणातून सुचवलं आहे.. आणि हा अभंग नकारात्मकता शिकवत नाही.. काय सोडा हे सांगतानाच, कशाच्या प्रभावातून मुक्त व्हा, हे सांगतानाच काय करा आणि कोणते संस्कार मनावर बिंबवा हेदेखील तो सांगतो.. आणि ही साधना स्त्रियांना प्रथम साधते बरं का.. शारदा माता, गोपालेर माँ यांच्यासारखे भावसंस्कार करणाऱ्या विभूती याच मातीतल्या. ही यादी कितीतरी मोठी आहे..
योगेंद्र : पाँडिचेरीच्या मदर, मामा देशपांडे यांच्या मातोश्री..
हृदयेंद्र : कलावतीदेवी, ताई दामले, विमला ठकार..
कमेंद्र : प्रज्ञादेवी.. सिद्धीदेवी.. ख्यातिदेवी.. (सगळे हसतात आणि हृदयेंद्र ‘एऽ गप रे..’ असं म्हणतो तेव्हा हसून) .. अरे तुम्हाला अंदाज नाही ही ख्याती अध्यात्मात हा हा म्हणता पुढे जाईल.. मी ख्यातीच्या मनाप्रमाणे वागत नाही, तिला हवी ती वस्तू देत नाही, तिचं ऐकत नाही.. त्यामुळे तिच्यात अपेक्षा न ठेवण्याची वृत्ती, सहनशीलता, धैर्य इतकं वाढलंय की, ती वेगानं साधना करील! (सगळे हसतात)
हृदयेंद्र : गंमत सोड.. पण जेव्हा भौतिकाच्या प्रत्येक प्रभावातून साधक सुटतो तेव्हाच श्रीसद्गुरूंचा बोध तो खऱ्या अर्थानं ग्रहण करू लागतो.. तेव्हाच त्या बोधानुरूप जगण्याचा तो अभ्यास करू लागतो.. अभ्यास सुरू झाला की, अनुभव येऊ लागतात. आपण अहोरात्र धडपडूनही जे सुख मिळवू शकत नाही ते ती सद्गुरूंच्या आज्ञेनुसार वागून कसं आवाक्यात येतं, हे जाणवू लागतं.. एकदा खरं शाश्वत सुख कोणतं हे कळू लागलं की, त्या सुखाचा जो आधार श्रीसद्गुरू त्यांच्याशिवाय मनाला, बुद्धीला, चित्ताला दुसरा विषय उरत नाही.. तेव्हाच ‘गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा। तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे।। काय सांगो जाले काहीचियां बाही। पुढे चाली नाही आवडीने।।’ ही स्थिती येऊ शकते.. मग आयुष्यात अखेरचा पालट घडतो!!
कर्मेन्द्र : म्हणजे सद्गुरूंच्या कृपेनं भरभराट होते! माझ्या एका मित्राचे गुरू काय सॉलीड आहेत.. त्यांच्या आशीर्वादानं त्याचा धंदा काय वाढलाय!
हृदयेंद्र : (हसतो) मला ते काही माहीत नाही.. खऱ्या सद्गुरूच्या सान्निध्यात साधकाची भौतिक भरभराट होईलही; पण त्या भरभराटीला महत्त्व नसतं..
चैतन्य प्रेम