05 March 2021

News Flash

१८६. तिन्ही लोक उद्धरती..

अभेद कर्म म्हणजेच निष्काम कर्म.. पण त्या निष्काम कर्मातही सकामता येते तेव्हा त्यांतही भेद येतो!

अभेद कर्म म्हणजेच निष्काम कर्म.. पण त्या निष्काम कर्मातही सकामता येते तेव्हा त्यांतही भेद येतो! या भेदाचं वर्म कळलं पाहिजे, निष्काम कर्माचं खरं वर्म कळलं पाहिजे आणि ते केवळ एकचजण जाणतो, असं बुवा म्हणाले..
हृदयेंद्र – हो.. हा एक म्हणजे सद्गुरूच!
बुवा – अगदी बरोबर!
हृदयेंद्र – चैतन्य प्रेम यांच्या ‘पूर्ण अपूर्ण’ या सद्गुरू आणि शिष्य या विषयावरील सदरात याची चर्चा होती खरी..
बुवा – आता मी म्हटलं ना? आपल्या शास्त्रांतही निष्काम कर्माची महती गायली आहे, पण नेमकी कोणती र्कम निष्काम आहेत, हे काही सांगितलेलं नाही.. याचं कारण एकच की प्रत्येकासाठीचं निष्काम कर्म वेगवेगळं असू शकतं आणि केवळ सद्गुरूच ते सांगू शकतो!!
अचलदादा – अगदी बरोबर.. सद्गुरुंच्या प्रत्येक चरित्राकडे पाहिलं तरी हेच दिसून येईल.. साईबाबांकडे एक रामदासी होता आणि त्याच्या झोळीत पोथ्याच पोथ्या होत्या.. त्या पोथ्यांतच गुंतला होता तो.. एकदा बाबांनी त्याला काहीतरी कामासाठी बाहेर पाठवलं. तो गेला तर बाबा शामाला काय म्हणाले? की शाम्या त्यातली विष्णुसहस्त्रनामाची पोथी घे आणि वाचायला लाग.. शामा काय म्हणाले? की बाबा, मला संस्कृत येत नाही.. त्यावर बाबा पुन्हा म्हणाले, तरी वाच.. ते वाचू लागले.. इकडे तो रामदासी परतला आणि आपली पोथी शामाने घेतल्याचं पाहून संतापला.. बाबांनी समजावलं, की मीच सांगितलं म्हणून त्यानं घेतली.. त्याला ती दे.. तर यानं बाबांना सांगितलं की, आता मला त्याबदल्यात भगवद्गीता द्या! बाबा हसले फक्त.. समोर प्रकटलेला सद्गुरू ज्याला ओळखता येत नाही, त्यानं विष्णूसहस्त्रनामाची कितीही पारायणं केली, तरी त्यांचा काय उपयोग? आणि जी गीता ‘सर्वधर्मान् परित्यज्ज मामेकं शरणम् व्रज’ सांगत सद्गुरुचरणांशी पूर्ण शरणागती शिकवते, ती गीता उलट तो बाबांकडे मागत होता!! तर जो पोथीत अडकला आहे त्याला पोथीतून सोडवणारं जे कर्म तेच निष्काम कर्म आणि ज्यानं कधी पोथी हातात धरलीसुद्धा नाही त्याला हाती पोथी धरायला सांगणं, हे त्याच्यासाठीचं निष्काम कर्म!
बुवा – थोडक्यात माझ्या मनाच्या विरुद्ध जे कर्म असतं ना तेच निष्काम कर्म असतं आणि माझ्या मनाची नेमकी आवड काय आहे, नेमकी ओढ कुठे आहे हे केवळ सद्गुरूच जाणतात. ती आवड तोडणारी आज्ञाच ते देतात..
हृदयेंद्र – श्रीगोंदवलेकर महाराजांकडे एक सोवळंओवळं करणारे शास्त्रीबुवा होते.. त्यांनी एकदा स्नान केल्यावर महाराज त्यांना म्हणाले, बुवा मी अमकी वस्तू विसरलो बघा ती घेऊन या जरा.. ही वस्तू कुठे होती? तर महाराज शौचाला जात तिथे! बुवा नि:शंक मनानं तिथे गेले, ती वस्तू घेऊन आले आणि पूजेला लागले.. तेव्हा निष्काम कर्माच्या परीक्षेत ते उत्तीर्णच झाले..
बुवा – बरोबर.. तेव्हा मनाच्या विरुद्ध जे आहे तेच निष्काम कर्म.. आता नीट पहा, मनाच्या विरुद्ध काय आहे? अक्षरच उलटसुलट केलीत तरी कळेल की मनाच्या विरुद्ध नामच आहे! मनाचं न-मन करणारं प्रत्येक कर्म हेच निष्काम कर्म आहे! मनाचं मनपण वाढवणारं प्रत्येक कर्म हे सकामच आहे, मग भले त्यानं निष्कामतेचे कितीही मुखवटे का घातले असेनात! आणि चोखामेळा महाराजांचे सद्गुरूही होते नामदेव महाराज! नाम हाच देव, हे नावातूनच सांगणारे.. त्या सद्गुरूंनी जे सांगितलं ना तोच खरा मंत्र आहे.. म्हणून चोखामेळा महाराज काय सांगतात? नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी। आता मंत्र म्हणजे काय? तर मन अधिक त्र म्हणजे मंत्र.. त्र म्हणजे त्रिगुण.. सत, रज आणि तम अशा या त्रिगुणात्मक जगाच्या प्रभावातून सुटका हवी असेल तर तो मंत्र केवळ नाम हाच आहे!
अचलदादा – माउलीही सांगतात ना? ‘‘त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी। चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ।।’’ सत, रज आणि तम या तीन गुणांच्या संगमानं माखलेला माणूस कितीही तीर्थयात्रा करो, जोवर चित्त नामात नाही, तोवर या त्रिगुणांपासून सुटका नाही आणि म्हणूनच तोवर काही खरं नाही.. ‘‘पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक। नामे तिन्ही लोक उद्धरती।।’’ वाल्मिकी मुनी स्वत:च्या अनुभवावरून सांगत आहेत की नामानं उच्च, मध्यम आणि नीच अर्थात सत, रज, तम अशा वृत्तीच्या लोकांचा उद्धार होतो!
चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2015 4:50 am

Web Title: three qualities of man
टॅग : God
Next Stories
1 १८५. भेदाभेद कर्म
2 एक-स्थिती
3 १८२. वैखरीचा पाया
Just Now!
X