..महिना-सव्वा महिन्यात एक नवा अब्जाधीश, या गतीने एकाच क्षेत्रात पैसा मिळवणाऱ्यांपेक्षा सारासार विवेक घालवून बसलेल्या नागरिकांचे ‘अभिनंदन’ करणे इष्ट!

ज्याप्रमाणे एकाची विष्ठा हे दुसऱ्याचे अन्न असू शकते त्याप्रमाणे एकाचे अनारोग्य ही दुसऱ्यासाठी उत्तम आरोग्यसंधी असू शकते. या कटू पण प्रामाणिक सत्याची जाणीव ‘बिझनेस स्टॅण्डर्ड’ प्रकाशित वृत्तावरून यावी. त्या वर्तमानपत्राने गेल्या वर्षभरात फक्त औषध आणि आरोग्यविषयक उत्पादन कंपन्या तसेच त्यांच्या प्रवर्तकांच्या संपत्तीचा धांडोळा घेतला असून त्याचा मथितार्थ डोळे उघडणारा ठरेल. ज्या काळात करोना आणि त्याची सरकारी हाताळणी यामुळे लाखोंचे रोजगार गेले, ज्या काळात सरकारी मदतीअभावी अनेक देशोधडीला लागले आणि ज्या काळात या विषाणूने अनेकांचे जगणे आणि स्वप्ने उद्ध्वस्त केली त्या काळात आपल्या देशात औषध कंपन्यांचे प्रवर्तक अब्जाधीश झाले. गेल्या वर्षांअखेरच्या तपशिलानुसार आपल्या देशात फक्त आणि फक्त औषध क्षेत्रातील अब्जाधीशांची संख्या १७ वर गेली असून या फक्त १७ जणांची एकत्रित धनसंपत्ती तब्बल ४ लाख ३५ हजार कोटी रुपये इतकी अजस्र आहे. त्याआधीच्या करोना-रहित काळात या क्षेत्रातील अब्जाधीशांची संख्या दहा होती. गेल्या करोनाच्या वर्षांत तीत सातने वाढ झाली. करोनाचे आपल्याकडील आगमन झाले मार्च महिन्यात. त्या महिन्याच्या अखेरीस, २४ मार्चला, टाळेबंदी जाहीर झाली. म्हणजे तो महिना गेला. उरलेल्या नऊ महिन्यांत तब्बल सात प्रवर्तकांना करोनाने धनवंत बनवले. याचा अर्थ प्रत्येकी महिना-सव्वा महिन्यास एक अशा गतीने आपल्याकडे या काळात अब्जाधीश तयार झाले.

त्यात वाईट वाटून घेण्याचे, त्यांच्या संपत्तीबाबत हेवा वाटून घेण्याचे वा त्यांच्या उद्यमशीलतेविषयी अनुदार भावना व्यक्त करण्याचे काहीच कारण नाही. प्रश्न सामूहिक मानसिकतेचा आहे. तीबाबत देश म्हणून आपण किती प्रौढ आहोत हा मुद्दा यानिमित्ताने चर्चिला जायला हवा. साथकालाप्रमाणे युद्धांतही बळी जात असतो तो सामान्यांचाच. पण त्याही काळात शस्त्रास्त्र निर्मात्यांची कमाई मोठय़ा जोमाने वाढते. पण म्हणून युद्धाचे खापर या शस्त्रास्त्र निर्मात्यांच्या माथी मारणे अयोग्य. ते पाप युद्ध घडवणाऱ्यांचे आणि/ किंवा ते घडावे म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्यांचे. त्याच तत्त्वानुसार आताही प्रचंड माया केली म्हणून औषधे वा औषधी रसायनांचे निर्माते यांना बोल लावणे योग्य नाही. दोष असलाच तर- आणि तो आहेच- तो आपला आहे. वास्तविक पहिल्या काही दिवसांतच करोना कशा पद्धतीने पसरतो, त्याची लागण कशी होते याचा साद्यंत शास्त्रीय तपशील जाहीर झाला. पण तोपर्यंत या करोनाच्या बागुलबुव्याने सर्वसामान्यांच्या मनोव्यापाराचा ताबा घेतलेला होता. तसा तो घेतला जावा असेच व्यवस्थेचे प्रयत्न होते. याचा परिणाम असा झाला की कथित र्निजतुक रसायनांनी प्रत्येक वस्तू धुवून घ्यायलाच हवी असे अनेकांच्या मनाने घेतले. त्यातूनच एक वेडपट कृत्यांची मंत्रचळी लाटच्या लाट आपल्या देशावर आदळली. काय काय झाले नाही त्यात? सरकारी कार्यालयांत प्रवेशद्वारी र्निजतुक फवारे मारण्याची सोय, गृहनिर्माण संस्थांतील जिने/उद्वाहनांपासून ते सार्वजनिक सज्जांपर्यंत सर्वास दररोज वा दिवसांतून अनेकदा कथित औषधी रसायनांची आंघोळ, परराज्यांतून आलेल्या मजुरांना औषधी रसायनांचे सचैल स्नान, पाळीव कुत्र्यामांजरांना घराबाहेर काढणे, फळेभाज्यांना औषधी रसायनांत बुडवणे, इतकेच काय पण दुधाच्या पिशव्याही धुऊन घेणे इत्यादी इत्यादी. अशी एकही वेडपट कृती नसेल की ती या काळात आपल्याकडे घडली नाही. त्यातून नक्की कोणाचे भले झाले या प्रश्नाचे उत्तर या नव्या अब्जाधीशांच्या यादीत सापडेल.

पण विचार करण्यातून मेंदू नामक अवयवास जराही शीण होणार नाही याची हमी देणारे नागरिक जर कोणत्याही रसायनामागे केवळ ‘र्निजतुक करणारे’ अशी अक्षरे आहेत म्हणून खरेदी करत सुटणार असतील तर खऱ्या औषध निर्मात्यांचे उखळ पांढरे होणारच. ‘९९.९९ टक्के’ या संपादकीयात (५ जानेवारी) वर्णिलेली अवस्था आपल्याकडे त्यातूनच तयार झाली. यात प्रतिकारशक्ती निर्मितीचा दावा करणारे औषध(?)निर्माते वैदू आणि स्वच्छतेच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे भुरटे रसायन उत्पादक यांचा समावेश केला तर हा परीघ चांगलाच मोठा होतो. वास्तविक कोणत्याही औषध/ गोळ्या/ चूर्ण/ काढा यामुळे एका रात्रीत प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. म्हणजे तसा दावा करणाऱ्या औषधाची संपूर्ण बाटली जरी एका दिवसात प्यायली तरी त्या व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीत काडीचाही फरक पडू शकत नाही. हे वैज्ञानिक सत्य. व्यक्तीची प्रतिकारशक्ती त्याच्या जीवनशैलीपासून जनुकांपर्यंत अनेक घटकांवर अवलंबून असते. हे घटक एका दिवसात बदलता येत नाहीत. पण तरीही अलीकडे अनेक जण अन्नपाण्यापेक्षा हे ‘इम्युनिटी बूस्टर्स’ प्राशन करताना दिसतात. त्यामुळे या सद्गृहस्थांची प्रतिकारशक्ती किती सुधारली याबद्दल प्रश्न असतील. पण त्यामुळे या सर्वाची निर्मिती करणाऱ्यांना मात्र बरे दिवस आहेत हे नक्की. म्हणून या संपत्तीनिर्मितीबद्दल या उद्योगपतींपेक्षा सारासार विवेक घालवून बसलेल्या नागरिकांचे अभिनंदन करणे इष्ट.

एकटय़ादुकटय़ांस असेल/नसेल पण मानवी समूहांस असा सारासार विवेक घालवून लाटेत सहभागी होणे आवडते. समुदायाचे मानसशास्त्र असेच असते. या लाटांत ‘‘आपण सहभागी झालो नाही आणि न जाणो आपल्याबाबत काही वाईट घडले तर काय’’ असा विचार सामान्य माणूस करतो आणि विवेकास खुंटीवर टांगून या लाटेत सहभागी होतो. अशा लाटानिर्मितीस व्यवस्था नेहमीच उत्तेजन देते. कोणत्याही पक्षाचे सत्ताधीश असोत. त्यांस लाटांवर हेलकावे घेण्यात रममाण होणारे नागरिक समूह नेहमीच हवे असतात. मग ही लाट दूध पिणाऱ्या गणपतीची असो वा भ्रष्टाचार निर्मूलनाची असो की टाळी/थाळीवादनाची असो. सारासार विचारशक्ती गहाण ठेवू शकणारे नागरिक हा कोणत्याही सत्ताधीशांचा खरा आधार. तो भरभक्कम असल्यामुळे सत्ताधीश निर्धास्त असतात. त्यांच्या या निर्धास्तावस्थेस कोणत्याही कारणाने तडा जाणार नाही याची हमी समाज देतच असतो. अशा समाजात उन्माद निर्माण करणे सोपे. एकदा का असा उन्माद निर्माण झाला की समाजाच्या सारासार विवेकाचा प्रश्नच निर्माण होत नाही आणि वैयक्तिकांच्या सारासारबुद्धीस कोणी विचारीत नाही. सारासार विवेक नाही म्हणून लाटा आणि लाटा आहेत म्हणून सारासार विचार शून्य असे हे दुष्टचक्र. कोणत्याही सरकारला हवे ते करण्यासाठी ही आदर्श अवस्था. अशा वेळी खरे तर विविध क्षेत्रांतील नियामक यंत्रणा आणि माध्यमे यांच्यावर समाजाची भिस्त असते. पण या दोन क्षेत्रांनीही नांगी टाकली की सामाजिक अध:पतनाच्या मार्गावरील प्रवास सुरू होतो. म्हणून कोणत्याही लाटांत वाहून जाऊ न देण्याची समाजाची ताकद महत्त्वाची.

ती आपण निर्माण करतो का हा खरा यानिमित्ताने विचारायला हवा असा प्रश्न. कारण अशा समाजातच संतुलित विकास होऊ शकतो आणि सर्वाना प्रगतीची संधी मिळू शकते. अन्यथा ती संपत्तीप्रमाणे कायम मूठभरांहातीच राहाते. बहुतांश रोगटांत स्वत: तंदुरुस्त राहणे हे ज्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या आरोग्याचे निदर्शक असते पण ते सामाजिक अनारोग्याचे निदर्शक असते. त्याप्रमाणे बहुतांश दरिद्री वा गरीब यांच्यातील मोजक्या लक्ष्मीपुत्रांमुळे त्यांची वैयक्तिक उद्यमशीलता दिसते खरी. पण ती सामाजिक श्रीमंतीची निदर्शक नाही. ‘‘गरीब आणि श्रीमंत यातील असंतुलन हे प्रजासत्ताकासमोरील सर्वात जुने आणि सर्वात मोठे आव्हान आहे’’ असे ग्रीक तत्त्वज्ञ प्लुटार्क म्हणून गेला. करोनाने हे वास्तव पुन्हा अधोरेखित केले आहे.