निषेध म्हणून अमेरिकी राष्ट्रगीताच्या वेळी उभा न राहणारा खेळाडू ज्या जाहिरातीत झळकला, तीही लोकांनी स्वीकारली..

एक जाहिरात ती काय! तिचे काय एवढे मनाला लावून घ्यावे? – ही जर विचारपूर्वक मांडलेली भूमिका असेल, तर तिचे स्वागतच. पण गेल्या आठवडय़ाभरात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका जाहिरातीवरून जी फणफण केली, ती जाहिरातींचे एकंदर महत्त्व पटवून देणारी ठरली. ही जाहिरात साधीसुधी नव्हे. अमेरिकेत जन्मलेल्या आणि जगभर पोहोचलेल्या एका कंपनीची ती जाहिरात. खेळांचे कपडे आणि बूट ही या कंपनीची उत्पादने. अमेरिकी नॅशनल फुटबॉल लीग किंवा एनएफएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रग्बीसारख्या खेळाच्या क्रीडा स्पर्धा म्हणजे आपल्या आयपीएलसारख्याच. सहयोगी कंपन्यांना भरपूर जाहिरात करून देणाऱ्या. अशा क्रीडा स्पर्धेत नायकी या कंपनीने केलेली ताजी जाहिरात ट्रम्प यांना खुपते आहे. त्या जाहिरातीत याच स्पर्धेतील माजी खेळाडू कॉलिन केपरनिकसह सेरेना आणि व्हीनस विल्यम्स, लेब्रॉन जेम्स यांसारखे कृष्णवर्णीय खेळाडू आहेत, मेगन ब्लंक ही अपंग क्रीडापटू आहे, वाढलेले १२० किलो वजन घटवून मेंदूतील गाठीला परतवून लावणारा चार्ली जबाली हा जिद्दी क्रीडापटू आहे.. आणि समलैंगिक खेळाडूदेखील. त्या सर्वाच्या प्रयत्नांचे, यशाचे, संघर्षांचे क्षण ही जाहिरात दाखवते. ‘तुमच्या स्वप्नांना कुणी वेडपट म्हणेल, पण ती खिल्ली नाही- कौतुकच ते! स्वप्ने वेडपटच असायला हवीत. विश्वास ठेवा, सर्वस्व पणाला लावा’ यासारखे शब्द ऐकू येतात. तो आवाज केपरनिकचा. या केपरनिकमुळे ट्रम्प भडकले. एनएफएल आणि नायकी या दोन्हीची अधोगती सुरू झाल्याचा लेखी दावा त्यांनी ट्विटरवरून केला. मग नायकीचा समभाग कसा ‘रसातळाला जातो’ आहे, लोक या कंपनीवर कसे चिडले आहेत, अशा बातम्या येऊ लागल्या. याला कारण केपरनिक.

अनेकांच्या मते तो देशद्रोहीच. एनएफएलच्या प्रथेप्रमाणे वाजवल्या जाणाऱ्या राष्ट्रगीताच्या वेळी- एप्रिल २०१६ मध्ये त्याने हा कथित देशद्रोह केला. राष्ट्रगीतासाठी उभे राहणे सोडाच, हा गुडघ्यात वाकला. मी हे मुद्दाम केले, निषेध म्हणून केले, असे वर म्हणाला. निषेध कशाचा? आदल्या वर्षभरात अमेरिकेच्या अनेक शहरांत कृष्णवर्णीय संशयितांना पोलिसांनी गुन्हेगार समजून सरळ गोळ्या घालून जिवे मारले. त्या खोटय़ा चकमकींचा निषेध. गोऱ्या गुन्हेगारांनाही फार तर माथेफिरू ठरवून बचावाची संधी दिली जाते आणि काळ्यांना मात्र गुन्हेगारच समजले जाते, या भेदभावकारक व्यवस्थेचा निषेध. आणि ही व्यवस्था बदलू पाहणाऱ्यांची टर उडवणारे डोनाल्ड ट्रम्पसारखे नेतृत्व ज्या अमेरिकी बहुमतामुळे उदयाला येते आणि सत्तापद मिळवते, त्या बहुमताचासुद्धा निषेधच. त्यापुढल्या वर्षी केपरनिकला एनएफएलमधून वगळण्यात आले. तर याने न्यायालयात फिर्याद गुदरली. ट्रम्प यांच्या उजव्या विचारांशी एनएफएलची हातमिळवणी असल्यामुळेच ते मला वगळतात, असे केपरनिकचे म्हणणे. ही फिर्याद जवळपास सव्वा वर्ष केवळ विचाराधीन होती. पण ती रीतसर सुनावणीला घ्यावी असा निर्णय आठवडय़ापूर्वी, ३० ऑगस्ट रोजी न्यायालयात झाला. नायकी कंपनीशी केपरनिकचा करार झाला आहे, नायकीच्या पुढल्या जाहिरात मोहिमेसाठी केपरनिक हा आवाहक- ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर- आहे, याची कल्पनाही तेव्हा कुणाला नव्हती. एनएफएल स्पर्धेतील सर्वच्या सर्व संघांचे कपडे पुढील आठ वर्षांसाठी नायकीचेच असतील, असा करार नायकी व एनएफएल यांच्यात  झालाय हे मात्र साऱ्यांनाच माहीत होते. अमेरिकी गोऱ्यांचे कौतुक असे की, त्यांनी केपरनिक हा नायकीचा ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर झाल्याबद्दल आदळआपट केली असली, तरी त्याची फिर्याद ऐकणारी न्याययंत्रणा नायकीपुढे झुकली असेल यासारखा वाह्यात अपप्रचार केलेला नाही. या विरोधकांनी नायकीच्या मालावर बहिष्कार टाकला, कथित देशप्रेमी महाविद्यालये वा संस्थांतून नायकीचे कपडे बाद केल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि अनेक उत्साही ट्रम्पभक्तांनी समाजमाध्यमांतून, ‘मी पाहा कसे माझे नायकीचे बूट जाळतोय’ याच्या चित्रफिती प्रसृत केल्या.

अमेरिकेतील गौरेतर खेळाडूंच्या राजकीय अभिव्यक्तीची चर्चा केवळ कॉलिन केपरनिकच्या निमित्ताने सुरू झाली असे समजायचे कारण नाही. बॉक्सर मोहम्मद अली, बेसबॉलपटू कर्ट फ्लड हे या अभिव्यक्तीचे आद्य प्रवर्तक. मोहम्मद अलीने कॅशस क्ले या नावाचा त्याग करून मोहम्मद अली हे नाव धारण केले. कारण त्याच्या नजरेतून कॅशस क्ले हे गुलाम नाव होते! त्या वेळी तो कडाडला होता, ‘मी अमेरिका आहे. तुम्हाला ते मान्य नाही. पण आता याची सवय करून घ्या. काळा, आत्मविश्वासपूर्ण, उद्धट असा मी. माझे नाव. तुमचे नव्हे! माझा धर्म. तुमचा नव्हे! माझी स्वतची उद्दिष्टे आहेत. सवय करून घ्या.’ कर्ट फ्लडने आणखी वेगळा मुद्दा मांडला. गोऱ्या प्रस्थापितांविरुद्ध लढताना गौरेतर खेळाडूंना सर्वाधिक विरोध त्यांच्याच समाजातून होतो. ‘कसला हा कृतघ्नपणा’ असा त्यांचा सूर असतो. म्हणजे यशस्वी काळ्यांनीही मिळाले त्यातच समाधान ‘मानून’ घेतले, तर आणि तरच ते राष्ट्रप्रेमी आणि स्वातंत्र्यप्रेमी अमेरिकेचे प्रतीक ठरतात. अन्यथा नाही. खेळामुळे अमेरिकी समाजातील दरी बुजू लागल्याचा खोटा आभास बंद करा, असे आता गौरेतर खेळाडू वारंवार बोलून दाखवू लागले आहेत. म्हणूनच जवळपास दोन डझन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकूनही सर्वाधिक श्रीमंत टेनिसपटूंच्या यादीत काळ्या सेरेना विल्यम्सच्या वरच गोऱ्या (आणि बहुतांश अमेरिकन) मारिया शारापोवाचा क्रमांक पाचेक ग्रँड स्लॅम अजिंक्यपदेही नसताना वारंवार कसा लागतो असा प्रश्न सेरेनाही विचारू लागली आहे. महान काळा टेनिसपटू आर्थर अ‍ॅशने एकदा म्हटले होते, ‘मला एखादा काळा माणूस बुद्धिबळ जगज्जेता झालेला पाहायचा आहे. पण आम्हाला कोणी तो खेळ खेळू तरी देतील का?’

यातली बोच बहुतांश गौरवर्णीयांना एक तर कळत नाही किंवा कळूनही ते प्रतिवाद करू पाहतात. गुन्हेगारी काळ्यांमध्येच जास्त कशी? अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्यांत काळेच जास्त कसे? आदी प्रतिप्रश्न विचारले जातात. ‘प्रत्येक काळा समाजविघातक नसतो पण सारे समाजविघातक काळेच कसे?’ यासारखे नेहमीचे तर्कट मांडले जाते. आपल्या समाजात दुफळी आहे आणि आपल्यामुळे ती वाढते आहे, याचे सोयरसुतकही असले प्रश्न विचारणाऱ्यांना नसते. आपले युक्तिवाद विवेकहीन असले तरी वरकरणी तार्किक भासतात, याचे खोटे समाधान त्यांना पुरते. मग खेळाडूंनी फक्त खेळावे, राजकारण करू नये, असे दटावणीखोर युक्तिवादही खपून जातात. ती सारी तर्कटे झुगारणाऱ्या सर्वाचा केपरनिक हा प्रतिनिधी ठरला आहे. हा स्वतंत्र आणि शूर व्यक्तींचा देश – ‘लँड ऑफ द फ्री अँड  होम ऑफ द ब्रेव्ह’ हे अमेरिकी राष्ट्रगीताचे पालुपद. पण स्वातंत्र्य सर्वानाच असेल, तर मग नातेही बरोबरीचे हवे. ते नाही, ही केपरनिकसारख्या अनेकांची खंत आहे. ती खंत त्याने राष्ट्रगीताचा अवमान करून व्यक्त केली. ‘टुकडे टुकडे गँग’ हा शब्द अमेरिकेत कुणाला माहीतही नसेल. पण एखाद्याला देशद्रोही ठरवून आपण देशप्रेमी ठरण्याचा हुच्चपणा तिथेही आहे.

एका जाहिरातीच्या वादामुळे तो चव्हाटय़ावर आला. पण जाहिरात आल्यानंतर मात्र हा वाद आता मिटतो आहे. संबंधित कंपनीचा समभागही वधारू लागला आहे आणि ट्रम्प म्हणत होते तसली अधोगती वगैरे काही नाही हे बऱ्याच जणांच्या लक्षात येऊ लागले. जाहिरात आवडली म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली आणि केपरनिकलाही जणू नवी ओळख, नवी स्वीकारार्हता मिळाली. आनंद मानायचा तो ट्रम्प यांची टिप्पणी वेडपट ठरली किंवा त्यांनी टीका केलेली जाहिरात जिंकली याचा नव्हे. जाहिरात तर जिंकलीच. पण भेद मानणाऱ्यांपेक्षा भेद मिटवू पाहणारे जिंकू शकतात, निषेध नोंदवणाऱ्यांनाही लोकप्रियता मिळते, हे त्या जिंकण्यातून दिसले याचा खरा आनंद.