News Flash

संख्या की संरक्षण?

संरक्षित जंगलांतील वाघांची संख्या वेगाने वाढली; परंतु त्यांच्यासाठी राहण्याची सुरक्षित जागा मात्र आपण निर्माण करू शकलेलो नाही..

(संग्रहित छायाचित्र)

विकासाच्या लाटेवर स्वार होण्यास उत्सुक असलेला मानवी समूह ‘प्रगत’ म्हणून ओळखला जातो. अशा प्रगत समूहाकडून प्राणिमात्राचा जीव घेण्याची आदिम प्रेरणा वारंवार पाहायला मिळणे, हे खचितच सुसंस्कृत समाजाचे लक्षण नाही..

एरवी स्वत:हून तो कुणाच्या वाटय़ाला सहसा जात नाही. स्वत:च निर्माण केलेल्या स्वातंत्र्याच्या परिघात जगणे त्याला कमालीचे आवडते. त्याची नजर करडी, समोरच्याचा थेट वेध घेणारी; पण त्यातही ‘मला काय तुमचे!’ असा निरपेक्ष भाव. भूक लागेल तेव्हाच शिकारीचा फडशा पाडणे, जंगलात मुक्तपणे संचार करताना स्वत:च्या गोतावळ्याची काळजी घेणे, त्याच्या आड येण्याचा प्रयत्न कुणी केला तर त्यावर तुटून पडणे, अन्यथा कुणाकडे ढुंकूनही न बघणे हेच त्याचे.. म्हणजे वाघाचे.. वैशिष्टय़. मात्र, विचार व वाणीची देण लाभलेला मानवी समूहच अलीकडच्या काळात त्याच्या जिवावर उठलेला दिसतो. अगदी काही दिवसांपूर्वी या वाघांची संख्या वाढली म्हणून देशभरात आनंदोत्सव झाला. आता त्याच्या मृत्यूच्या येणाऱ्या वार्ता या आनंदावर विरजण टाकणाऱ्या आहेत. भरपूर जंगल असलेला विदर्भ हा वाघांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्याच प्रदेशात गेल्या दीड महिन्यात चार वाघांची शिकार झाली, तर सहा महिन्यांत बारा वाघांना मृत्यूस सामोरे जावे लागले. ताडोबाच्या जंगलाला लागून असलेल्या चिमूर तालुक्यात गेल्या जुलैत एकाच दिवशी तीन वाघ मृतावस्थेत आढळले. एका वाघाला राहण्यासाठी किती जागा लागते, याचे उत्तर अभ्यासकांनी शोधले आहे. पण त्याचे तंतोतंत पालन करण्याची समज वाघांजवळ कुठून येणार? मुक्त संचाराचा खऱ्या अर्थाने आनंद घेणारा हा रुबाबदार प्राणी बऱ्याचदा शेतातील पिकांचे रक्षण व्हावे म्हणून कुंपणात वीजप्रवाह सोडून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांच्या जाळ्यात अडकतो आणि हकनाक जीव गमावून बसतो. चिमूरच्या वाघांच्या नशिबी असेच मरण आले. महाराष्ट्राचा विचार केला तर यंदा जानेवारी ते जून या सहा महिन्यांत बारा वाघांचा मृत्यू झाला. त्यातील सहांची शिकार झाल्याचे नंतर आढळून आले. याच काळात देशभरात ५१ वाघांचा मृत्यू झाला. मागील वर्षी देशात १०२ वाघांना जीव गमवावा लागला. त्यापैकी २० महाराष्ट्रातील, तर २७ शेजारच्या मध्य प्रदेशातील होते. या दोन्ही वर्षांच्या आकडेवारीतील एक बाब आणखी महत्त्वाची.

ती म्हणजे, यातील ४९ टक्के मृत्यू हे संरक्षित जंगलांच्या- म्हणजेच व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेर झालेले आहेत. व्याघ्रसंरक्षणातील हाच कळीचा मुद्दा आहे. पण त्यावर देशभरात कुणीही गंभीरपणे चर्चा करताना दिसत नाही. अलीकडच्या दहा वर्षांत संरक्षित जंगलांतील वाघांची संख्या वेगाने वाढली. परंतु त्यांच्यासाठी राहण्याची सुरक्षित जागा मात्र आपण निर्माण करू शकलेलो नाही. संरक्षित जंगलात गर्दी झाल्याने नवा अधिवास शोधण्यासाठी हे वाघ बाहेर पडतात. मैलोन्मैल स्थलांतर करतात आणि बहुसंख्य वेळा वीजप्रयोग, विषप्रयोग या शिकारीच्या नव्या जाळ्यांत अडकतात आणि जीव गमावतात. याशिवाय रस्ते अपघातात मरणाऱ्या वाघांच्या संख्येतसुद्धा अलीकडच्या काळात लक्षणीय वाढ झाली आहे. राहण्यासाठी नवे क्षेत्र शोधत भटकणारा हा उमदा प्राणी एका जंगलातून दुसऱ्या जंगलाकडे प्रवास करतो, तेव्हा त्याला सुरक्षित संचारमार्ग (कॉरिडॉर) हवा असतो. विकासाचा ध्यास घेतलेल्या मानवाने अलीकडच्या काळात हे मार्गच उद्ध्वस्त करून टाकले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाघाला हा विकासाचा अडथळा पार करावा लागतो आणि बहुतांश वेळा त्यातच त्याचा जीव जातो.

यातून एक बाब अधोरेखित होते. ती ही की, विकास करताना जीवसृष्टीतील सर्वाचा विचार व्हायला हवा. मात्र, हा विचार या देशात तरी कागदावर राहिल्याचे हे मृत्यू दर्शवतात. विकास पुढे रेटताना या प्राणिमात्रांचाही विचार करा, असे वन्यजीवप्रेमी जीव तोडून सांगतात. प्रसंगी लढे देतात. पण सरकार नावाच्या निबर यंत्रणेवर त्याचा फार परिणाम होताना दिसत नाही. परिणामी ‘जैविक विविधतेतील महत्त्वाचा घटक’ अशी ओळख असलेला वाघ हकनाक मरत राहतो. गेल्या चार वर्षांत देशातील वाघांचा अधिवास २२ टक्क्यांनी घटला, तर वाघांची संख्या मात्र १६ टक्क्यांनी वाढली. व्याघ्रगणनेच्या अहवालात हे नुकतेच जाहीर झाले. त्यावर बरीच चिंताही व्यक्त झाली. पण पुढे काय, यावर कुणी विचार करताना दिसले नाही. वाघांचा अधिवास.. म्हणजे जंगल.. झटक्यात वाढवणे हे अगदीच अशक्य आहे. अशा वेळी सैरभर भटकणारे हे वाघ किमान मारले तरी जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी जंगलाला लागून असलेल्या मानवी समूहांना अधिक ‘सुशिक्षित’ करणे आवश्यक आहे. मात्र, नेमके तिथेच हे प्रयत्न कमी पडताना दिसतात. पाच वर्षांपूर्वीपर्यंत वाघांची शिकार करणाऱ्या अनेक टोळ्या देशात, त्यातल्या त्यात मध्य भारतात सक्रिय होत्या. ‘बहेलीया’ ही त्यातली प्रमुख टोळी, तर संसारचंद हा देशपातळीवर कुख्यात प्रमुख तस्कर. सरकारी यंत्रणांनी फास आवळल्याने या टोळ्या नेस्तनाबूत झाल्या, तर या तस्करांचा तुरुंगात मृत्यू झाला. त्यामुळे संघटितपणे व व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून केलेली वाघांची शिकार जवळजवळ बंद झाली.

आता वाघांना खरा धोका उरला आहे तो जंगलालगत राहणाऱ्या मानवी समूहांकडून. अनेकदा वाघाला ठार मारणे हे या समूहांचे उद्दिष्ट नसते. शेतातील पीक वाचणे हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. त्यासाठी विषप्रयोग किंवा कुंपणात वीजप्रवाह सोडणाऱ्या या शेतकऱ्यांना सौरकुंपणासारख्या पर्यायाकडे नेणे, त्यांचे जंगलावरचे अवलंबन कमी करणे असे प्रयत्न प्राधान्याने राबवणे गरजेचे आहे. सरकारने यासाठी अनेक योजना आणल्या आहेत; पण सर्वदूर त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. वन्यप्राण्यांनी शेतीचे नुकसान केले तर मिळणारी सरकारी मदतसुद्धा तुटपुंजी आहे. त्यामुळे प्राणी जाळ्यात कसा अडकेल, याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. यातून मार्ग काढायचा असेल, तर सर्वच घटकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. विकासाच्या लाटेवर स्वार होण्यास उत्सुक असलेला मानवी समूह ‘प्रगत’ म्हणून ओळखला जातो. अशा प्रगत समूहाकडून प्राणिमात्राचा जीव घेण्याची आदिम प्रेरणा वारंवार पाहायला मिळणे, हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण कसे समजायचे? वाघ हा कधीच स्वत:हून हल्ला करण्यासाठी पुढाकार घेत नाही. फक्त त्याला असुरक्षित वाटायला नको. या मुक्या प्राण्याला तशी सुरक्षितता प्रदान करण्यासाठी मानवानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी- वाघांच्या वास्तव्याने जंगले समृद्ध झाली तर समाजाचीही समृद्धी वाढते, हा विचार रुजवणे गरजेचे आहे.

व्याघ्रसंरक्षणातील आणखी एक कळीचा मुद्दा आहे तो असंरक्षित जंगलांच्या सुरक्षेचा. या जंगलांच्या सुरक्षेसाठी सरकारी पातळीवर फार प्रयत्न होताना दिसत नाहीत. व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित जंगलांची जेवढी काळजी घेतली जाते, तेवढी या जंगलांची घेतली जात नाही. आता ही असंरक्षित जंगलेसुद्धा वन्यप्राण्यांच्या, त्यातल्या त्यात वाघांच्या वावराने गजबजलेली आहेत. अशा वेळी या जंगलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणे अथवा त्यासाठी कमी मनुष्यबळ तैनात करणे योग्य नाही. त्यामुळे या जंगलांकडे वन खात्याने अधिक लक्ष दिले तर वाघांच्या मृत्यूचे प्रमाण झपाटय़ाने कमी होईल. मात्र, हे करताना मानव-वन्यजीव संघर्ष वाढणार नाही याचीही कटाक्षाने काळजी घेणे गरजेचे आहे. बंदुकीचा धाक दाखवून किंवा कायद्याचा बडगा उगारून व्याघ्र वा जंगल संवर्धन होत नाही. त्यासाठी समन्वयवादी भूमिकेचीच गरज आहे.

आजमितीला जगातील एकूण वाघांपैकी ५३ टक्के वाघ भारतात आहेत. ही आनंदाची बाब असली, तरी संपूर्ण जगात शिकारीचे प्रमाणसुद्धा भारतात अधिक आहे. वाघांच्या अवयवजप्तीच्या ४० टक्के घटना भारतात उघडकीस येतात. दरवर्षी साधारण सव्वाशे वाघांचे अवयव देशात सापडतात. ही आकडेवारी आपल्यासाठी निश्चितच भूषणावह नाही. वाघांच्या अव्वल संख्येसह त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनातही आपण अव्वल ठरू, तो सुदिन. त्यासाठी वाघांची संख्यावाढ महत्त्वाची की त्यांचे संरक्षण, याचा प्राधान्यक्रम आधी ठरवावा लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 12:06 am

Web Title: editorial on four tigers hunt chandrapur one and a half months abn 97
Next Stories
1 धारणा आणि सुधारणा
2 टॉलस्टॉयचे स्मितहास्य..
3 जगी या खास..
Just Now!
X