30 May 2020

News Flash

मैदाने आणि बंदीशाळा..

युरोपातीलच नव्हे, तर जगातील सर्वाधिक सातत्याने प्रेक्षकसंख्या लाभणारी साखळी म्हणजे जर्मनीची बुंडेसलिगा.

संग्रहित छायाचित्र

सध्याच्या वातावरणात खेळ सुचू कसा शकतो, असे विचारणाऱ्यांना खेळही समजलेला नाही आणि आनंदही! सुनियोजितपणे आताही खेळाचा आनंद मिळवता येईल ..

स्थानिक खेळाडूंना संधी देणाऱ्या ‘बुंडेसलिगा’ला जे जमले, ते परदेशी खेळाडूंचा बडिवार माजवणाऱ्या ‘ईपीएल’ वा ‘आयपीएल’ला जमत नाही. मग सामन्यांना घोर लागतो. ‘साइ’मध्ये भारतीय खेळाडूंचा सराव सध्याच्या प्रतिकूल स्थितीत सुरू होईल, हे मात्र अभिनंदनीय..

‘कोविड-१९’मुळे आर्थिक गाडेच रुतून बसलेल्या असंख्य क्षेत्रांपैकी एक महत्त्वाचे म्हणजे क्रीडाक्षेत्र. बहुतेक खेळांमध्ये अंतरसोवळे पाळताना येणाऱ्या नियमाधिष्ठित अडचणी, काही खेळांचे आंतरराष्ट्रीय स्वरूप आणि त्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या व अंतर पाळण्याबाबत त्यांना येऊ शकणाऱ्या अडचणी अशा अनेक मुद्दय़ांवर क्रीडाक्षेत्रही टाळेबंदीग्रस्त बनले. हे बंद होणे निव्वळ अर्थचक्र थोपवणारे नाही, तर आनंद हिरावणारेही आहे. यातून मार्ग काढणे हे सरकारी यंत्रणेबरोबरच क्रीडा यंत्रणेवरही अवलंबून आहे. यात काहींनी पुढाकार घेतलेला दिसतो, काही नुसतेच सुतकी चर्चेत गुंतलेले. अशा वेळी काही उदाहरणांची दखल घेणे आवश्यक ठरते. सुरुवात जर्मनीपासून..

एप्रिलच्या मध्यावर ज्या वेळी जगात करोनाचा हाहाकार आणि त्यानिमित्ताने निष्ठुर नाकेबंदी सुरू झाली होती, त्या वेळी जर्मन फुटबॉल संघटना आणि सरकार त्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ पुन्हा सुरू कसा करावा याविषयी खल करत होते! त्याची कुणकुण इंग्लिश प्रीमियर लीग, स्पॅनिश ला लिगा आयोजित करणाऱ्या मंडळींना लागली. त्यांचीही काही तरी हालचाल, कुजबुज सुरूच होती. ते सगळे थांबले. ऐकण्यासाठी नि पाहण्यासाठी! कारण टाळेबंदीच्या शृंखला तोडण्यासाठी जर्मन फुटबॉल संघटना जे करेल, ते अनुकरणीयच असेल याविषयी त्यांना खात्रीच. जर्मन नियोजन काय दर्जाचे असते याची ही एक  झलक. युरोपातीलच नव्हे, तर जगातील सर्वाधिक सातत्याने प्रेक्षकसंख्या लाभणारी साखळी म्हणजे जर्मनीची बुंडेसलिगा. प्रत्येक सामन्याला सरासरी ४३,३०० इतकी प्रेक्षकसंख्या. बुंडेसलिगा इंग्लिश प्रीमियर लीग किंवा स्पॅनिश ला लिगाइतकी लोकप्रिय नसेल, पण शिस्त आणि नियोजनाच्या बाबतीत या दोहोंच्या कित्येक योजने पुढे. क्लबांच्या मालकीपासून तिकिटांच्या किमतींपर्यंत सारे काही सुनियोजित आणि परवडण्याजोगे. अवाच्या सवा किमती मोजून वलयांकित फुटबॉलपटूंना खरीदून क्लबची आर्थिक तंदुरुस्ती डळमळीत करणे तेथे साफ अमान्य. ही जर्मन फुटबॉल स्पर्धा सुरू होऊ शकली, याचे प्रमुख कारण म्हणजे आयुष्य पूर्वपदावर आणण्याची त्या देशाच्या नेतृत्वानेच पुढाकार घेऊन रुजवलेली जबरदस्त आस. त्यासाठी आवश्यक नियोजन करण्याची इच्छाशक्ती आणि जोखीम पत्करण्याचे धाडस. अमेरिका किंवा भारताच्या कितीतरी आधी, मोठय़ा प्रमाणावर करोनासंसर्ग सुरू असूनही युरोपातील अनेक देशांनी टाळेबंदी भेदण्याचे किंवा तिची पत्रास न बाळगण्याचे धोरण अवलंबले होते. मध्यंतरी दक्षिण कोरियामध्ये प्रेक्षकविहीन मैदानांत काही सामने खेळवले गेले. त्या वेळी प्रेक्षकांचे कार्डबोर्ड स्टेडियममध्ये उभारले गेले. आपण कोणासमोर तरी खेळतो आहोत, यातून मिळणारी ऊर्मी आणि ऊर्जा कोणत्याही खेळाडूसाठी सर्वात परिणामकारक आणि निर्विष उत्तेजक. तिच्या अनुपस्थितीत खेळणे सोपे नाही. आता प्रेक्षक आहेत, पण ते ‘जिवंत’च नाहीत या वास्तवाशी जुळवून घेणेही तितकेच अवघड. द. कोरियात याविषयी प्रयोग झाला. जर्मनीत त्याला व्यावसायिक फुटबॉलमध्ये सुरुवातही झाली. अर्थातच नियमावली दीर्घ होती. दोन संघ वेगवेगळ्या वेळी मैदानात येतील, हस्तांदोलन करणार नाहीत, सामूहिक छायाचित्रे काढली जाणार नाहीत, अंतरसोवळ्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, सर्व चेंडूंवर जंतुनाशक फवारणी केली जाईल.. खेळाडूंना करोनाचा संसर्ग झालेला नाही हे सुनिश्चित करण्यासाठी दर आठवडय़ाला खेळाडूंची करोना चाचणी होईल. सलग दोन ‘निगेटिव्ह’ निष्कर्ष आलेल्यांनाच खेळण्याची परवानगी मिळेल हेही ठरले. या सगळ्या नियोजनाला पाच आठवडे लागले. बाकीच्या प्रमुख व्यावसायिक साखळ्यांनी हेच प्रारूप प्रमाण मानले. त्यांच्याही साखळ्या पाच आठवडय़ांच्या तयारीनंतर जूनमध्ये सुरू होतील. अर्थातच प्रेक्षकांविना!

जे जर्मन फुटबॉल संघटनेला जमले, ते आयसीसीला का जमू नये? किंबहुना बीसीसीआयलाही का जमू नये? याउलट सरकारी पाठबळ अत्यल्प असूनही भारतात भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) किमान सरावासाठीची मार्गदर्शक तत्त्वे तरी जारी केली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. सरावाचे दोनेक महिने वाया गेल्यामुळे खेळाडूंची चलबिचल सुरू होतीच. पुढील जवळपास चार महिने पावसाचे. म्हणजे मैदानी सराव अशक्यच. अशा वेळी कोणत्याही धनपेटीचे गाजर समोर नसतानाही क्रीडा प्राधिकरणाने खेळाडूंना मदत केली. आयसीसीचे सारे लक्ष चेंडूला लाळ लावावी की नको आणि त्यावर प्रतिबंध घातल्यास चेंडूला लकाकी आणण्यासाठी काय वापरले जावे यावर. हा मुद्दाही महत्त्वाचाच, पण सर्वंकष नव्हे. सर्वंकष बाब म्हणजे खेळ पुन्हा कशा प्रकारे सुरू करता येईल, सरावासाठी खेळाडूंना कोणत्या सुविधा पुरवता येतील याविषयीचे नियोजनवजा प्रारूप विकसित करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, ही. सध्या क्रिकेट खेळणाऱ्या देशांपैकी काही प्रमाणात ऑस्ट्रेलिया आणि त्याहीपेक्षा न्यूझीलंड हे देश करोनाच्या कचाटय़ातून बऱ्यापैकी बाहेर पडलेले दिसतात. तेथे काही सुरू करता येईल का, याविषयी आयसीसीने चाचपणीदेखील केल्याचे ऐकिवात नाही. भविष्यातला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना कसा असेल, कशा प्रकारे खेळवला जाईल याविषयी आयसीसीने अद्याप काही जाहीरच केलेले नाही. या क्षणीदेखील वैयक्तिक पातळीवर क्रिकेटपटू आणि क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये याविषयी चर्चा सुरू आहे. उदा. भारताविरुद्धची मालिका बंद मैदानात, प्रेक्षकांविना कशी सुरू करता येईल याविषयी मंथन ऑस्ट्रेलियात सुरू झाले आहे. भारताच्या बाबतीत बीसीसीआयने याविषयी पुढाकार घेतलेला नाही, पण ते समजण्यासारखे आहे. एकतर भारतात टाळेबंदीला इतर सर्व बाबींच्या तुलनेत प्राधान्य दिले गेले. अशा परिस्थितीत क्रिकेट सुरू करण्याविषयी चर्चा कदाचित बीसीसीआयला शिष्टसंमत वाटली नसावी. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, आयपीएल ही बीसीसीआयची सर्वात धनाढय़ स्पर्धा सुरू करायची, तर त्यासाठी परदेशी क्रिकेटपटूंना आमंत्रित करावे लागणार. सध्याच्या परिस्थितीत ते जवळपास अशक्य. जर्मन फुटबॉल लीगप्रमाणे इंग्लिश प्रीमियर लीग काय किंवा आयपीएल काय, स्थानिक खेळाडूंना एका मर्यादेपेक्षा या स्पर्धात महत्त्व लाभू शकले नाही. स्थानिक खेळाडू म्हणजे विराट कोहली नव्हे! पण विराट कोहली ज्या व्यवस्थेतून वर आला, त्या रणजी आदी व्यवस्थेला बीसीसीआयनेच कायम दुर्लक्षित ठेवले.

करोनाने लादलेली अघोषित टाळेबंदी उठवण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू झाले आहेत. काही ठिकाणी उत्साहात व निडरपणे आणि काही ठिकाणी निरुत्साहात आणि भीतीच्या छायेखाली. अर्थचक्र सुरू करावे लागते, यात खेळ आणि खेळाची मैदाने मागे राहू शकत नाहीत. खेळातून निखळ आनंद मिळतो, तसेच खेळातून रोजगाराची एक मोठी साखळीही निर्माण होते. अर्थचक्राला गती मिळते ती अशा शृंखलांतूनच. सध्याच्या काळवंडलेल्या वातावरणात खेळ सुचू कसा शकतो, असे विचारणाऱ्यांना खेळही समजलेला नाही आणि आनंदही! त्यामागील अर्थकारण तर अशा बहुतेकांच्या आकलनापलीकडलेच. टाळेबंदीच्या बंदीशाळा उघडून मैदानांवर उतरायची वेळ कोणती हे ठरवण्यातच आपल्याकडे वेळ निघून जाते आहे. अशा वेळी बंदीशाळेबाहेर निघून मैदानावर झेपावलेल्यांचा हेवा वाटणे स्वाभाविकच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 12:03 am

Web Title: editorial on the bundesliga football tournament start in germany abn 97
Next Stories
1 ‘सीमा’ हाच धर्म !
2 हवा आणि रूळ
3 जो अधिकाऱ्यांवर विसंबला..
Just Now!
X