कमल हासनसारख्या अभिनेत्याच्या राजकारण प्रवेशामुळे तमिळनाडूत मोठा गुणात्मक बदल होईल, अशी आशा बाळगणे मूर्खपणाचेच ठरेल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विख्यात अभिनेता कमल हासन याच्या नव्या पक्षस्थापनेच्या निमित्ताने द. मा. मिरासदार यांच्या एका कथेचे स्मरण करणे समयोचित ठरावे. त्या कथेत एक शालेय मुलगा वाचनाच्या वेडापायी रात्री वाचनालयात अडकून पडतो. वाचनालयाच्या सज्जात पुस्तकात डोके घालून तो बसलेला असताना रात्र होते आणि कर्मचारी कुलूप लावून निघून जातात. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे हा मुलगा सुटकेसाठी खालील रस्त्यावरून जाणाऱ्यायेणाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो. नदीकडे निघालेल्या एक वृद्धास या मुलाची अवस्था कळते आणि ते चौकशी करू लागतात. त्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर या पोरास आशा असते की ते आपली सुटका करतील. परंतु ते राहते बाजूलाच. हे वृद्ध त्या पोरालाच म्हणतात : बसून राहा वर आहेस तेथे.. आम्ही खाली असून काय मोठे दिवे लावीत आहोत.

कमल हासन यांच्या या नव्या पक्षाकडे पाहून तमिळनाडूतील मतदारांची प्रतिक्रिया त्या कथेतील वृद्धाप्रमाणेच असण्याची दाट शक्यता आहे. ती तपासून पाहण्याचा एखादा मार्ग उपलब्ध नसल्यामुळे प्रचलित प्रथापद्धतीनींच त्यांच्या राजकीय प्रवेशाचे अंदाजपत्रक मांडावे लागेल. तसे करणे अयोग्य ठरणार नाही. सुब्रमण्यम भारती यांच्या वेशातील कमल हासन, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या केशशैलीतील कमल हासन, प्रचंड गर्दीला संबोधणारा कमल हासन आदी पक्षपूर्व प्रसिद्धी पाहता कमल हासन यांचा संभाव्य पक्ष तमिळनाडूच्या राजकारणाची प्रचलित घडी नव्याने घालणारा असेल असे मानण्यासारखी परिस्थिती नाही. चित्रपट कलाकाराने राजकीय भूमिका घ्यावी. इतकेच नव्हे तर राजकीय नेतृत्वही करावे हे तमिळनाडूस नवीन नाही. हा तमिळनाडूचा इतिहास आहे. कमल हासन यांच्या रूपाने तो किती वर्तमान आहे हेच तेवढे सिद्ध होईल. याआधी अभिनेते एमजीआर, जयललिता यांचा अण्णा द्रमुक आणि लेखक करुणानिधी यांचा द्रमुक हाच काय तो सामना होता. हे दोन्ही पक्ष गुणात्मकतेच्या पातळीवर साधारण सारखेच. गेल्या वर्षी जयललिता यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा अण्णा द्रमुक चांगलाच भरकटला. तोपर्यंत प्रत्यक्षाहूनही मोठय़ा असलेल्या प्रतिमेची त्यांना सवय झालेली. अशी प्रतिमा असली की बरे असते. वास्तवास सामोरे जावे लागत नाही. परंतु अण्णा द्रमुकच्या दुर्दैवाने ती प्रतिमा गतसाली काळाच्या पडद्याआड गेली. त्यामुळे प्रत्यक्षही बदलले. त्यांच्या जागा घेऊ पाहणाऱ्या शशिकला यांच्याकडे राजकीय चातुर्य एक वेळ असेलही. परंतु त्यांना प्रतिमा नव्हती. तमिळनाडूच्या राजकारणात ही प्रतिमा असली की कोणत्याही कृत्यांकडे कानाडोळा करता येतो. मग ते अचाट संपत्ती संकलन असो किंवा कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काही प्रश्न असोत. जयललिता यांच्या प्रतिमेचा उपयोग नेहमीच ते सोडवण्यासाठी झाला. ती प्रतिमाच गायब झाल्याने अण्णा द्रमुकवासी सैरभैर झाले असल्यास नवल नाही. दुसरीकडे त्याच वेळी द्रमुकचे करुणानिधी हे प्रत्यक्षात वयपरत्वे अशक्त होत गेले. पण तरी प्रतिमेच्या रूपाने ते आहेत. त्यामुळे द्रमुकची अद्याप अण्णा द्रमुकइतकी वाताहत झालेली नाही. पण करुणानिधी यांच्या पश्चात ती तशी होऊ शकते हेदेखील विसरता येणारे नाही.

कमल हासन राजकारण प्रवेश करीत आहेत ते या सगळ्याच्या पाश्र्वभूमीवर. तमिळनाडूच्या चित्रदुनियेत कमल हासन आणि रजनीकांत हे नेहमीच स्पर्धक राहिलेले आहेत. या त्यांच्या स्पर्धेचा उपयोग जयललिता यांच्या पश्चात करण्याचा प्रयत्न भाजपने करून पाहिला. त्यात ते काही प्रमाणात यशस्वीही झाले. हा प्रयत्न म्हणजे रजनीकांत यांना राजकारणाच्या घोडय़ावर बसवणे. राजकारणाच्या सद्य:स्थितीवर टीकाटिप्पणी करावयास सुरुवात करून रजनीकांत यांनी या घोडय़ावर स्वार होण्याची तयारी सुरू केलीच होती. ते प्रत्यक्षात त्या घोडय़ावर चढले तर त्या घोडय़ाचा लगाम भाजपच्या हातात असेल असेही दिसू लागले होते. भाजपलाही ही शक्यता प्रत्यक्षात येताना दिसू लागली. जयललिता काळाच्या पडद्याआड आणि करुणानिधी वयपरत्वे थकलेले. अशा वेळी आपल्या तालावर नाचू शकेल असा रजनीकांत तमिळनाडूच्या अंगणात आला तर त्या राज्यात बस्तान बसवणे सोपे जाईल असे भाजपला वाटले असल्यास नवल नाही. परंतु नंतरच्या घटना भाजपच्या इच्छेप्रमाणे घडल्या नाहीत. यामागील कारणे अद्याप तरी गुलदस्त्यात आहेत. रजनीकांत यांच्या राजकारणात येण्याची प्रक्रिया मंदावली.

कमल हासन यांनी मुसंडी मारली ती या काळात. रजनीकांत जर राजकारणात आले तर ते भगव्या रंगाच्या छायेत असतील हे कमल हासन यांनी ओळखले आणि राजकारणातल्या बिगरभगव्या अवकाशात स्वत:चा विस्तार करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांना भेटावयास बोलावणे, धार्मिक विद्वेषाविरोधात भाष्य करणे वगैरे सर्व कमल हासन यांचे प्रयत्न याच विस्ताराच्या उद्देशाने झाले. उत्तर भारत ज्या अर्थाने हिंदू आहे त्या अर्थाने दक्षिण प्राधान्याने हिंदू असूनही हिंदुत्ववादी नाही. द्रविडी चळवळीचा इतिहास त्यास कारणीभूत आहे. त्यामुळे भाजपला त्या राज्यात हातपाय पसरणे उत्तरेतील एखाद्या राज्याइतके सोपे नाही. रजनीकांत यांच्या सहयोगाने भाजपस ते सोपे गेले असते. अशा वेळी या हिंदुत्ववादी विचारधारेस विरोध म्हणून कमल हासन यांनी आपल्या राजकारण प्रवेशास वेग दिला. आपसारख्या व्यक्तिकेंद्रित पक्षाशी त्यांनी दरम्यान बोलणी करून पाहिली. पण असे व्यक्तिकेंद्रित पक्ष स्वत:च्या गंडापेक्षा अधिक भव्य काही तरी लाभ होत नाही तोपर्यंत एकत्र येत नाहीत. तमिळनाडूत असा लाभ करून घेण्यासाठी तूर्त संधी नाही. त्यामुळे कमल हासन यांनी अधिक वेळ न दवडता स्वतंत्र पक्षच स्थापला. त्याआधी अब्दुल कलाम यांच्या मदुराई येथील घरी जाऊन नमस्कार-चमत्काराचे उपचारही त्यांनी केले. इतक्या साध्या घरात राहून कलाम किती महान होऊ शकले, याबद्दल नंतर कमल हासन यांनी आश्चर्ययुक्त गौरवोद्गार काढले. म्हणजे तोपर्यंत कलाम किती साधे आहेत याची या गृहस्थास जाणीवच नव्हती असे दिसते. याचाच अर्थ राजकारणात येईपर्यंत हा इसम वास्तवापासून किती तुटलेला होता हे यातून दिसते. तेव्हा अशा वेळी अशा व्यक्तीच्या राजकारण प्रवेशामुळे फार मोठा गुणात्मक बदल होईल, अशी आशा बाळगणे मूर्खपणाचेच ठरण्याची शक्यता अधिक.

चित्रपट तारेतारकांच्या मागे धावणाऱ्या वेडपटांची संख्या त्या राज्यात अतोनात आहे. असे कमल हासन यांचे चाहते त्यांच्या या नव्या पक्षाचे पाईक होऊ शकतीलही. पण पुढील किमान काही वर्षांत स्वत:च्या बळावर राज्याचे राजकारण नियंत्रित करण्याइतका आकार या पक्षास मिळेल अशी चिन्हे नाहीत. दुसरीकडे अण्णा द्रमुक विकल झालेला असला तरी द्रमुक अजूनही धडधाकट आहे. मधल्या काळात टू-जी घोटाळ्याने या पक्षास जखडून टाकले होते. विशेष सीबीआय न्यायालयाने या घोटाळ्यातून राजा, कनिमोळी यांची सुटका केल्याने या पक्षात पुन्हा चांगलीच धुगधुगी निर्माण झाली असून साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल घेतली. आगामी निवडणुकांत दिल्लीतील गरज लक्षात घेता एके काळचा हा भ्रष्टाचारी वगैरे पक्ष भाजपचा सहकारी नसेलच याची काहीही हमी नाही. म्हणजेच कमल हासन यांच्या संभाव्य पक्षासमोर आव्हानच नाही असे नाही. थोडक्यात हासन यांच्या रूपाने एक नवे कमल राजकारणात उगवले असले तरी त्या आसपासचा चिखल तोच आहे, याचे भान न सुटलेले बरे.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamal haasan launches makkal needhi maiam party
First published on: 22-02-2018 at 03:12 IST