विज्ञानाच्या क्षेत्रातील मंडळींना इतर क्षेत्रे बिनमहत्त्वाची वाटतात, त्याहीपेक्षा खेदाची बाब म्हणजे उर्वरित समाजाला विज्ञान दूरचे वाटू लागते. असे का होते?

गंमत वाटण्यास साधेसे कारणही पुरते. विषाद वाटण्यासाठी मात्र अंमळ विचार करावा लागतो. दिनविशेष म्हणून साजऱ्या होणाऱ्या तारखा लागोपाठ असणे आणि त्यापैकी एकाही तारखेस रविवार नसल्यामुळे हे दोन्ही दिनविशेष एकाच आठवडय़ात येणे ही काहीशी गमतीची बाब. तसे सरत्या आठवडय़ात घडून आले. पैकी पहिला मराठी राजभाषा दिन आणि दुसरा राष्ट्रीय विज्ञान दिवस. कवी कुसुमाग्रज यांच्या जन्माची आणि सी. व्ही. रामन यांनी ‘रामन परिणाम’ शोधल्याची स्मृती ठेवणारे हे दोन दिवस लागोपाठ येणारे. यापैकी आदला दिवस मराठी भाषेचे, तिच्या सौष्ठवाचे आणि आपसूकच त्यातील साहित्याचे गुणगान गाण्याची वार्षिक संधी देणारा, तर नंतरचा विज्ञानाची आठवण करून देणारा. यातल्या मराठी-गुणगानाची संधी मराठीजनांनी दवडली नाही. सार्वजनिक कार्यक्रमांपासून समाजमाध्यमी भावनापाझरापर्यंत हे गुणगान होत राहिले. पण विज्ञान दिवस मात्र तितकासा थाटला नाही. तसे पाहू गेल्यास हे दोन्ही सोहळेच. पण मराठीजनांची सोहळानंदी टाळी लागली ती मराठीबाबतच. त्यातून जागे होईपर्यंत विज्ञान दिवस पार पडूनही गेला. याचा विषादही महाराष्ट्रास वाटेनासे का झाले, याचा विचार करणे औचित्याचे ठरेल.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
eknath shinde
आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचा आदेश!
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
electricity
कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…

भाषा आठवणे आणि विज्ञान दुरावणे, असे हे द्वंद्व दिसते. मात्र ते आजचे नाही. आणि केवळ मराठीपुरतेही नाही. त्याची मुळे काही शतके मागे जाऊन रुतलेली आहेत. हे पहिल्यांदा ठसठशीतपणे दाखवून दिले ते ब्रिटनच्या सी. पी. स्नो यांनी. हे स्नो गेल्या शतकातले कादंबरीकार आणि शास्त्रज्ञही. त्यामुळे त्यांना हे द्वंद्व नेमकेपणाने सांगता आले असावे. त्यांनी साठ वर्षांपूर्वी केम्ब्रिजमधल्या प्रसिद्ध वार्षिक रीड व्याख्यानात एक निबंध वाचला. ‘टू कल्चर्स’ हे त्या निबंधाचे शीर्षक. ते अनेकांना खडबडून जागे करणारे ठरले होते. त्याचे पुढे पुस्तक झाले, तेही गाजले. त्यात स्नो यांनी दोन संस्कृतींकडे निर्देश केला होता. पहिली संस्कृती लिटररी इंटलेक्चुअल्स अर्थात वाङ्मयीन बुद्धिमंतांची आणि दुसरी नॅचरल सायंटिस्ट्स अर्थात वैज्ञानिकांची. स्नो यांचे प्रतिपादन असे की, या दोन वर्गात वैचारिक देवाणघेवाण नाही. त्यांच्या मते, मुख्य प्रवाहावर वाङ्मयीन बुद्धिमंतांचेच वर्चस्व आहे. या वर्गाच्या प्रभावाखाली येणाऱ्या समाजातल्या मोठय़ा हिश्शाला विज्ञान दुबरेध वाटते. त्यामुळे ते त्यापासून दूरच राहतात. आपल्या मराठी-गुणगानाची आणि विज्ञान-विसराची कारणे कदाचित यात मिळतील. परंतु असे होण्याला स्नो यांनी कारण सांगितले होते ते शिक्षणपद्धतीचे. स्पेशलायझेशन अर्थात विशेषाध्ययन हे या वेंगाडपणाचे मूळ आहे, असे स्नो यांचे मत. म्हणजे असे की, विशिष्ट विषयातच तज्ज्ञ, विशेषज्ञ निर्माण करण्याची शिक्षणपद्धत विशेषज्ञांचा एक वर्ग तयार करते. असा वर्ग मोजक्यांचाच असतो, आणि त्यामुळे इतर समाजापासून तो दुरावतो. दुसरे म्हणजे, या अशा तुकडे पाडण्याने जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आदी अनेक विज्ञाने तयार होतात. हे विशेषीकरण काहीएक प्रमाणात उपयोगी आणि सुसह्य़ही ठरते. मात्र, यामुळे विज्ञानाकडे एकत्रितपणे पाहण्याची दृष्टीच नाहीशी होते.

असे होणे म्हणजे विज्ञानाच्या मूळ गाभ्याचाच विसर पडण्याचा धोका असतो. युरोप-अमेरिकादी ठिकाणच्या काही संशोधन संस्था सोडल्या, तर असा विसर पडावा अशीच व्यवस्था. आपल्याकडे तर आनंदीआनंद. तो दोन पातळ्यांवर आहे. एक म्हणजे विज्ञानसंस्था आणि वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रातील सुशेगात वृत्ती. ती कशी आहे आणि त्याने काय होते, याचा वेध गत रविवारी ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झालेल्या दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या ‘फुले का पडती शेजारी?’ या लेखात घेतला गेला आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती नको. पण यातला दुसरा मुद्दा महत्त्वाचा. किंबहुना सद्य:स्थितीत अधिक कळीचा.

तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव. यात दोन गोष्टी येतात. पहिली म्हणजे, विज्ञानात कोणतीही बाब ताडून पाहावी लागते. स्थळ-काळनिरपेक्षतेच्या कसोटीवर खरी उतरल्याशिवाय तीस मान्यता मिळत नाही. दुसरे म्हणजे विज्ञानात मुक्त टीकेला वाव असतो. या दोन गोष्टींची पूर्तता करणारा समाज वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा असतो. आपण तसा समाज आहोत काय?

अलीकडच्या काही घटना पाहिल्या तर याचे उत्तर मिळेल. महाराष्ट्रात कोणी एक कीर्तनकार ‘ठोकुनी देतो ऐसा जी के’ पद्धतीने अवैज्ञानिक बोलतात. ते तसे आहे, हे काहींनी त्यांना दाखवून देऊनही ते आपल्या विधानावर हटून बसतात. नव्हे, त्यांच्या समर्थनार्थ काही पुंडही सरसावतात. त्यांची चूक दाखवून देणाऱ्यांस धमकावतात. महाराष्ट्रीय समाजाचे विज्ञानवास्तव दाखवून देण्यास एवढे उदाहरण पुरेसे ठरावे. एवढे होऊनही, हे कीर्तनकार स्वत:स प्रबोधनकार म्हणवतात. विशेष म्हणजे, त्यांच्या या एकपात्री प्रबोधनात यू-टय़ूब आदी नवतंत्रमाध्यमांचाही खच्चून वापर झालेला दिसतो. म्हणजे साधन विज्ञानाचे आणि साध्य अ(वि)ज्ञानाचे, असा हा प्रकार.

तो नवा नाही. औद्योगिक क्रांतीच्या पहाटकाळातही असेच घडत होते. त्या क्रांतीला पहिली प्रतिक्रिया आली ती नकाराचीच होती. पण ती देणारेच क्रांतीची फळे चाखायलाही पुढे सरसावले, हेही तितकेच सत्य आहे. त्या क्रांतीनंतर बदलांचा वेग वाढला. औद्योगिक क्रांतीच्या परमोच्च काळात विज्ञानाचे केंद्र शिक्षणापासून उद्योगाकडे हलले. त्यास तंत्रज्ञान या नव्या शाखेचा हातभार लागला. तंत्रज्ञानाचा प्रसार आणि व्याप्ती झपाटय़ाने वाढली. याला कारण तंत्रज्ञानाला परंपरेची गरज नसते. मात्र, परंपरा वाहती ठेवायला तंत्रज्ञान वापरले जाताना दिसते. हा भोळसट अंतर्विरोध आपल्याकडे ओसंडून वाहताना दिसतो.

परंतु काही परंपरापाईक मात्र विज्ञान-तंत्रज्ञानाला विरोध करतात. त्यातही दोन मते आहेत. काही जण विज्ञानाला पाश्चात्त्य ठरवून आधुनिक विज्ञानपूर्व काळाचा धावा करतात. तर काही विज्ञानाचे परकेपण सांगून आपले, इथल्या मातीतले विज्ञानच खरे म्हणतात. अलीकडे तर यातल्या दुसऱ्या मताचे आकर्षण अनेकांना वाटते आहे. त्यामुळे आधुनिक काळात शं. वा. किलरेस्करांपासून नरेंद्र दाभोलकरांपर्यंत अनेकांनी बुवाबाजीविरुद्ध आवाज उठवला, त्यातला फोलपणा दाखवून दिला, तरी समाज जागा होत नाही. याचे कारण विज्ञानाच्या समाजाशी तुटलेपणात आहे. हे तुटलेपण येते ते विज्ञानाच्या कप्पेबंदीमुळे. त्यामुळे विज्ञान सामाजिक-राजकीय-आर्थिक घडामोडींपासून फटकून राहते.

असे झाले की, विज्ञानाच्या क्षेत्रातील मंडळींना इतर क्षेत्रे बिनमहत्त्वाची वाटतात. तर उर्वरित समाजाला विज्ञान दूरचे वाटू लागते. महाराष्ट्रात तर हे अधिक प्रखरपणे दिसते. भारतीय स्तरावरील प्रबोधनपर्वाची पहाट झाली, त्या महाराष्ट्रात हे व्हावे ही शोकांतिका म्हणावी लागेल. त्या प्रबोधनपर्वाच्या अखेरच्या काळाचे एक प्रतिनिधी असणारे आणि अंत:करणात माणुसकीचा गहिवर अखंड राबता ठेवणारे श्री. म. माटे यांना हे सत्तर वर्षांपूर्वीच दिसले होते का? माटेमास्तरांनी त्यासाठी ‘विज्ञानबोध’ संपादित केला होता. त्यास तब्बल दोनशे पानांची प्रस्तावना त्यांनी लिहिली होती. त्या प्रस्तावनेची सुरुवात त्यांनी ‘घरचे वारेच बदलले पाहिजे’ या घोषवाक्याने केली होती. सद्य:स्थिती पाहता, वारे बदललेच पाहिजे.