क्रिकेट हा एकमेव महान खेळ असा आहे, ज्यात किमान ‘मंकडिंग’च्या बाबतीत जे नियमात बसते, ते खिलाडूवृत्तीत बसत नाही..

इंडियन प्रीमियर लीगमधील एका सामन्यात पंजाब संघाच्या रविचंद्रन अश्विनने राजस्थानच्या जॉस बटलरला, तो गोलंदाजाच्या बाजूस म्हणजे नॉन-स्ट्रायकर एंडला क्रीझ सोडून उभा असताना चेंडू टाकण्यापूर्वीच धावचीत केले. अशा प्रकारे धावचीत करण्याला क्रिकेटविश्वात ‘मंकडिंग’ असे म्हटले जाते. अधिकृत शब्द केवळ रनआऊट किंवा धावचीत असाच आहे. त्याला ‘मंकड’ हे संबोधन भारताचे विख्यात माजी अष्टपैलू क्रिकेटपटू विनू मंकड यांच्या नावावरून पडले. १९४७ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेला असताना, बिली ब्राऊन या ऑस्ट्रेलियी फलंदाजाला विनू मंकड यांनी दोन वेळा अशा पद्धतीने बाद केले, त्यामुळे त्यांच्याच नावावरून धावचीतच्या या प्रकाराचे ‘मंकडी’करण झाले. गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी त्याच्या बाजूस उभ्या असलेल्या फलंदाजाने त्याची हद्द किंवा क्रीझ सोडली, तर त्याला धावचीत करण्याची नियमाधिष्ठित संमती गोलंदाजाला आहे. कदाचित एखाद्या गौरेतर गोलंदाजाने क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे एका गोऱ्या फलंदाजाला बाद करण्याची चलाखी दाखवली म्हणून असेल, पण अनेक दशके क्रिकेटच्या गोऱ्या प्रस्थापितांमध्ये अशा प्रकारे बाद करण्याला ‘खिलाडूवृत्तीविरोधी’ म्हणजे ‘अगेन्स्ट द स्पिरिट ऑफ क्रिकेट’ म्हणून हिणवले गेले आणि अजूनही ‘मंकडिंग’ला गोऱ्यांमध्ये प्रतिष्ठा नाही. इतर कोणत्याही खेळामध्ये एखाद्या नियमात बसणाऱ्या कृतीला ती खिलाडूवृत्तीत बसत नाही, म्हणून हिणवले जात नाही. या सगळ्या खेळांमध्ये नियम आणि खिलाडूवृत्ती यांच्यात गल्लत किंवा तफावत नाही. क्रिकेट हा एकमेव महान खेळ असा आहे, ज्यात किमान ‘मंकडिंग’च्या बाबतीत जे नियमात बसते, ते खिलाडूवृत्तीत बसत नाही यास्तव खिलाडूवृत्ती जोपासण्यासाठी नियम न पाळण्यास उत्तेजन दिले जाते! आणि नियम पाळणाऱ्याला खलनायक ठरवले जाते!

मुळात चेंडू टाकला जाण्याच्या आधीच एखादा किंवा काही यार्ड कमी धावायला लागावे यासाठी क्रीझबाहेर सरकणे यात चलाखी अधिक आणि खिलाडूवृत्ती कमीच. त्यात पुन्हा अशा प्रकारे क्रीझबाहेर उभे राहिल्यास आपण गोलंदाजांकरवी धावबाद होऊ शकतो हे ठाऊक असूनही असे प्रकार करत राहणे हा शुद्ध बिनडोकपणा झाला. त्यातही अशा प्रकारे खरोखरच धावबाद झाल्यानंतर अन्याय झाल्याची हाकाटी करणे हीच खरी रडेगिरी ठरते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि क्रिकेटचे नियम बनवणारा लंडनस्थित मेरिलिबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) या दोघांनीही अशा प्रकारे फलंदाजाला धावचीत करण्याला नियमांचे अधिष्ठान दिलेले आहे. येथे एक घोळ होता, ज्याबद्दल आयसीसी आणि एमसीसी हे दोघेही समान दोषी ठरतात. कारण संबंधित नियमाच्या शब्दरचनेबाबत दोहोंमध्ये मतैक्य नव्हते. गोलंदाजाने चेंडू टाकण्यासाठी हात सर्वोच्च टोकावर नेण्यापूर्वी तो फलंदाजास धावचीत करू शकतो, असे आयसीसीने म्हटले होते. तर चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजाने मागील पायाची टाच जमिनीवर टेकवण्यापूर्वी फलंदाजाने क्रीझ सोडल्यास गोलंदाज त्या फलंदाजाला धावचीत करू शकतो, असे एमसीसीच्या नियमावलीत म्हटले होते. यात आता एमसीसीने बदल केला असला, तरी संदिग्धता कायम आहे. कारण दोन्ही संघटनांच्या नियमात ‘गोलंदाजाकडून चेंडू टाकण्याची अपेक्षित क्रिया’ असा विचित्र शब्दप्रयोग आहे. ही क्रिया अध्याहृत धरूनच नॉन-स्ट्रायकर एंडकडील फलंदाज काही वेळा क्रीझ सोडतो, कारण त्याचे लक्ष समोरच्या फलंदाजाकडे म्हणजे त्याच्या सहकाऱ्याकडे असते. या स्थितीत तो गोलंदाजाला पाहू शकत नाही, आणि म्हणूनच अशा वेळी त्याला गोलंदाजाने धावचीत केल्यास ते खिलाडूवृत्तीविरोधी ठरते असा हास्यास्पद बचाव केला जातो. एमसीसीचे प्रशिक्षक फ्रेझर स्टुअर्ट यांनी तर अश्विनला खलनायक ठरवताना, तो चेंडू टाकण्यापूर्वी काही क्षण स्थिरावला असे म्हटले आहे. नॉन-स्ट्रायकर फलंदाज ते पाहू शकत नाही, कारण काय तर हल्ली फलंदाज फार तडाखेबाज फटके लगावत असल्यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेसाठीही नॉन-स्ट्रायकर फलंदाजाला समोरच्या फलंदाजाकडेच पाहावे लागते, म्हणे! ही सवलत पंचांना नाही. त्यांनी गोलंदाजाकडेही पाहायचे आणि चेंडू टाकला गेल्यानंतर फलंदाजावरही लक्ष ठेवायचे. याउलट अश्विनसारखे गोलंदाज गोलंदाजी करताना सजग असतात आणि फलंदाजाला बाद करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यासाठी ते कोणत्याही नियमाचा भंग करत नाहीत, याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. अश्विनने यापूर्वीही श्रीलंकेच्या एका फलंदाजाला बाद केले होते, त्या वेळी प्रभारी कर्णधार वीरेंदर सेहवागने खिलाडूवृत्तीने अपील मागे घेऊन संबंधित फलंदाजाला अभय दिले होते. याउलट इंग्लंडकडून खेळणाऱ्या जॉस बटलरला मागे एका श्रीलंकेच्या गोलंदाजाने याच प्रकारे धावचीत केले होते. म्हणजे हा प्रकार बटलरसाठी नवीन नाही. तरीही त्याने अन्याय झाल्याची हाकाटी करणे जितके अनाकलनीय, तितकेच शेन वॉर्नसारख्या बेशिस्त आणि बेलगाम क्रिकेटपटूने अश्विनसारख्या क्रिकेटपटूच्या निष्ठेवर संशय घेणे अश्लाघ्य ठरते.

खरेतर क्रिकेट हा फलंदाजांना अखिलाडू पद्धतीने अनुकूल असलेला खेळ आहे आणि हल्ली आयपीएलसारख्या गल्लाभरू स्पर्धामुळे तर गोलंदाजांची अवस्था अधिकच केविलवाणी झालेली आहे. गुडघाभरही चेंडू उसळत नाही, अशा टुकार खेळपट्टय़ा; नियमन आणि नियंत्रणाअभावी भक्कम आणि आडव्यारुंद होत गेलेल्या बॅटी; षटकामागे उसळते चेंडू टाकण्यावर असलेले नियंत्रण अशा परिस्थितीत क्रिकेटमधील उरलासुरला समतोलही संपुष्टात आला आहे. चेंडू कोणत्या हाताने टाकणार, यष्टीच्या कोणत्या बाजूने येऊन टाकणार हे गोलंदाजाला पंचांकडे जाहीर करावे लागते. फलंदाजावर असे कोणतेही नियंत्रण नाही. तो प्रसंगी रिव्हर्स स्वीप म्हणजे उलटे फटके मारू शकतो, यष्टी सोडून खेळू शकतो, क्रीझ सोडून पुढे येऊ शकतो. गोलंदाजाने मात्र क्रीझच्या चौकटीत राहूनच गोलंदाजी करणे अपेक्षित असते. पाय क्रीझच्या पुढे पडला, बाजूला पडला की बाद चेंडू किंवा नो-बॉल. ही सगळी पार्श्वभूमीच खरेतर ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ची थट्टा करणारी आहे. इतर कोणत्याही खेळामध्ये मैदानावरील दोन संघांना असलेल्या सवलत-स्वातंत्र्यात इतकी तफावत नसते. फुटबॉलसारखे खेळ जगभर लोकप्रिय होण्याचे आणि क्रिकेट लोकप्रियतेच्या बाबतीत त्याच्या आसपासही न पोहोचण्याचे हे एक कारण आहे. स्पिरिट किंवा खिलाडूवृत्तीचा हा सरंजामी बागुलबुवा साहेबाची या खेळावरील हुकमत संपल्यानंतरही केला जातो. विनू मंकडनंतर आणखी एका महान भारतीय क्रिकेटपटूने ‘मंकडिंग’ केले होते. त्याचे नाव कपिलदेव. कपिलदेव यांनी दक्षिण आफ्रिकेत एका सामन्यात यजमानांचा फलंदाज पीटर कर्स्टनला बाद केले होते. अश्विनने या दोघांचा कित्ता गिरवताना स्वत:च्या कृतीचे योग्य समर्थनही केले. दुर्दैवाने भारतातच बीसीसीआयसारख्या संघटनांकडून त्याला म्हणावा तसा पाठिंबा मिळू शकला नाही. आयपीएलचे प्रशासक राजीव शुक्ला यांनी तर ‘मंकडिंग’ला आयपीएलमध्ये थाराच नको, अशी हास्यास्पद मागणी केली. कारण षटकार-चौकारांची बरसात पाहण्यासाठीच आयपीएल नामक सर्कसला हजेरी लावली जाते, एवढेच त्यांचे क्रिकेटविषयीचे मर्यादित आकलन आहे. बहुतेक सर्व गौरेतर माजी क्रिकेटपटूंनी आणि काही गोऱ्या क्रिकेटपटूंनीही अश्विनचे समर्थन केले हे उल्लेखनीय आहे. ‘मंकडिंग’ ज्या ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा घडले, त्या ऑस्ट्रेलियन संघाचे त्या वेळचे कर्णधार होते महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन. त्यांच्या याविषयीच्या मताकडे हल्लीच्या बहुतेक गोऱ्या टीकाकारांनी सोईस्कर दुर्लक्ष केलेले दिसते. ‘मंकडिंग’विषयी ब्रॅडमन म्हणाले होते, ‘विनू मंकड यांनी केले ते योग्यच होते. धाव चोरण्यासाठी एखाद्या फलंदाजाला निष्कारण अशी सवलत मिळणे बरोबर नाही’! यावर आणखी काय बोलण्याची त्यामुळे गरजच उरत नाही.