News Flash

नवा ‘मार्क’वाद

मार्क हा माहिती महाजालातील फेसबुक या अत्यंत लोकप्रिय, जागतिक चावडीचा उद्गाता.

मार्क झकरबर्गने फेसबुकचे श्रेय एकटय़ाचे नाही हे सांगितले आणि उद्योग का करायचा हे आधी कळायला हवे, असा सल्लाही दिला. आपल्याही समाजात असा एक तरी मार्क झकरबर्ग तयार व्हावा असे वाटत असेल तर व्यक्तींइतकाच, व्यक्तींनी बनलेल्या समाजानेदेखील अहं सोडणे आवश्यक आहे..

वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी जगातील धनाढय़ांत ज्याची गणना होऊ लागली तो मार्क झकरबर्ग हा काही सामाजिक भाष्यकार नव्हे की तत्त्ववेत्ता. तरीही त्याच्या वक्तव्याची दखल घेणे आवश्यक ठरते. मार्क हा माहिती महाजालातील फेसबुक या अत्यंत लोकप्रिय, जागतिक चावडीचा उद्गाता. हे असे काही करण्याची कल्पना त्याचीच. ती प्रत्यक्षात आणताना त्याने जे काही साध्य केले त्यातील अनुभवाची प्रचंड शिदोरी त्याच्याकडे आहे. याच अनुभवशिदोरीच्या आधारावर त्याने भारतीय समाजमनाचे चुकते कोठे यावर नेमके बोट ठेवले. प्रसंग होता दिल्लीतील आयआयटी या प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या संस्थेतला. सध्या भारत भेटीवर आलेला मार्क विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बुधवारी या संस्थेत होता. अशा प्रसंगी करावे लागते ते प्रसंगोपात्त भाषण झाल्यानंतर त्याची विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरे झाली. फेसबुक जन्माला घालावे असे मुळात तुला का वाटले, तुझ्या या यशाचे रहस्य काय, अशा स्वरूपाचा तो प्रश्न होता. त्यावर मार्कने दिलेले उत्तर हे भारतीय मानसिकतेला बरेच काही शिकवून जाणारे आहे. मार्क म्हणाला : मी फेसबुक तयार केले वा स्टीव्ह जॉब्स याने अ‍ॅपल जन्माला घातली असे म्हणणे हेच मुळात अत्यंत चुकीचे आहे. एखाद्या एकटय़ादुकटय़ा व्यक्तीने असे म्हणणे योग्य नाही. कारण एकटीदुकटी व्यक्ती फार काही करू शकत नाही. फेसबुक वा अ‍ॅपलसारखे जेव्हा काही घडते तेव्हा त्यामागे अनेकांचा हातभार असतो, क्रियाशील वाटा असतो. ऐतिहासिक अशा बनून गेलेल्या या उत्पादनांच्या निर्मितीत इतरांचाही तितकाच वाटा आहे. हे असे एकटय़ादुकटय़ाचे कौतुक करणे हे प्रसिद्धीमाध्यमांचे काम. परंतु ते खरे नाही. हे सर्व झाले वा होते ते सांघिक भावनेनेच.
एकचालकानुवर्तत्वाचे स्तोम माजवणाऱ्या आपल्या देशात एखाद्या प्रचंड यशस्वी व्यक्तीने हे असे सांगणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. एखादा कोणी हरीचा लाल येईल आणि आपला उद्धार करेल, संभवामि युगे युगे प्रत्यक्ष हरीच पुन्हा आपल्यात अवतरत असतो आणि तो आपणास उद्धरून नेत असतो अशा स्वरूपाचा निष्क्रिय विचार आपल्याकडे रक्तातील दोषासारखा साठून राहिलेला आहे. त्याचे प्रत्यंतर आसपास सर्वत्रच दिसते. मग तो आपला राष्ट्रीय प्रेमाचा क्रिकेटसारखा खेळ असो वा राजकारण. सर्व काही फिरते ते एकाच व्यक्तीभोवती. एक डाव्यांचा अपवाद वगळला तर आपले सर्वच्या सर्व राजकीय पक्ष हे एकखांबी तंबूच आहेत, हे मान्य करण्याचे धाडस आपण दाखवावयास हवे. ते तसे असल्यामुळे ना संघभावनेचा विकास होतो ना व्यक्तींना विकासाची संधी मिळते. जे काही होते ते एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर. त्यामुळे इतरांचा प्रयत्न असतो तो फक्त या एका व्यक्तीचीच मर्जी राखणे. अशा वातावरणात व्यावसायिकता वाढत नाही. कारण सर्वसाधारण व्यक्ती आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतात त्या एका व्यक्तीकडे पाहून. मी काम करणार ते व्यवस्थेसाठी, व्यक्तीसाठी नव्हे असा दृष्टिकोन वाढीसच लागत नसल्यामुळे जे काही होते ते सर्व व्यक्तिसापेक्ष. या दोषाचा दुसरा, आणि दीर्घकालीन, परिणाम म्हणजे बुद्धिप्रामाण्यतेचा होत असलेला अंत. जी काही आपली बुद्धी वापरावयाची ती केंद्रस्थानी असलेल्या एकाच व्यक्तीला खूश करण्यासाठी. त्यामुळे ती व्यक्ती खूश होणार नाही अशा सर्व गोष्टी टाळल्या जातात आणि परिणामी खुशमस्कऱ्यांची मोठय़ा जोमाने पदास होत राहते. या खुशमस्कऱ्यांचे जाळे मग अन्य विचारी जनांना आपल्यात ओढू पाहते. जे तसे सामील होण्यास विरोध करतात ते व्यवस्थेच्या बाहेर फेकले जातात. पिढय़ान्पिढय़ा असेच होत असल्यामुळे आपल्या उद्धारकर्त्यां व्यक्ती तेवढय़ा बदलत जातात. व्यवस्था उभ्याच राहत नाहीत. आपला शोध सुरू असतो तो या नायकापासून ते त्या नायकापर्यंत.
मार्क मात्र व्यवस्थामग्न समाजाचे प्रतिनिधित्व करतो. महाविद्यालयीन काळात आपल्या मित्रामित्रांत संदेशवहनाची सोपी व्यवस्था असावी म्हणून त्याने संगणक प्रणाली विकसित केली. पुढे ती शेजारच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थी मित्रांसाठीदेखील वापरली जाऊ लागली. आणि त्यातून बघता बघता फेसबुक ही आज घडीला जगातली अक्राळविक्राळ वाटावी अशी कल्पना- आणि मग कंपनी- जन्माला आली. मार्क जिचे प्रतिनिधित्व करतो त्या समाजातील व्यवस्थेने मार्कच्या कल्पनेचे स्वागत केले, तिचे बाजारमूल्य ओळखले आणि उद्योग, तंत्रज्ञान आदीचा कोणताही वारसा नसलेला मार्क झकरबर्ग नावाचा तरुण बघता बघता जगातील अब्जावधींमधील दुवा बनला. परंतु फेसबुकसारखी मोठी कंपनी काढावी, असे आपल्या स्वप्नातही नव्हते, असे तो प्रामाणिकपणे नमूद करतो. चांगली कंपनी काढण्यासाठी काय करावे, असेही त्यास विचारण्यात आले. त्यावरील त्याचे उत्तरदेखील बरेच काही शिकवणारे होते. मार्क म्हणाला, अनेक जण उद्योग सुरू करण्यासाठी उत्सुक असतात. पण नेमके काय करायचे हेच त्यांना माहीत नसते. मुळात उद्योग सुरू करण्याआधी कशाविषयी आपल्याला काही तरी वाटावयास हवे. तसे वाटत असेल तर त्या उद्योगास अर्थ आहे. हे वाटणे भारतीय परिप्रेक्ष्यात फारच महत्त्वाचे ठरते. कारण आपल्याकडे उद्योग काढायचा तो बख्खळ पसा कमावता यावा यासाठीच, असे मानले जाते. त्यामुळे सर्व लक्ष असते ते केवळ जास्तीत जास्त नफा कसा मिळेल याकडे. या नफाकेंद्रित विचारधारेमुळे नवोन्मेषशालीन उत्पादने आणि कल्पना विकसित करण्यात आपण कमी पडतो. मार्कच्या सांगण्याचा अर्थ असा की मुळात विचार करायचा तो उत्तम कल्पनेचा, ती प्रत्यक्षात आल्यामुळे इतरांसाठी निर्माण होणाऱ्या सोयीसुविधा आदींचा. ही कल्पना उत्तम असेल तर पसा आपोआप येतोच. परंतु पसा मिळवणे हेच जर लक्ष्य असेल तर सर्वच मुसळ केरात जाण्याचा धोका अधिक. समस्त भारतवर्ष पिढय़ान्पिढय़ा त्या धोक्याच्या सावटाखाली जगत आहे आणि हे मान्य करण्याचा प्रामाणिकपणाही आपल्याकडे नाही.
आजमितीला जवळपास जगभरातले १५० कोटी जन फेसबुकच्या माध्यमाद्वारे एकमेकांशी जोडले गेले आहेत. पुढील काळात त्याहूनही अधिक अजून जोडले जातील, असा तज्ज्ञांचा होरा आहे. मार्क भारतात आला तो त्या उद्देशाने. सव्वाशे कोटी भारतीयांना जोडल्याखेरीज जग जोडता येणार नाही, असे तो म्हणाला ते रास्तच ठरते. आपल्या विचार वा कृतीतून आपली व्यापारी वृत्ती लपवण्याचा प्रयत्नदेखील हे अमेरिकी उद्योजक करीत नाहीत, ही बाब निश्चितच अनुकरणीय. त्यामुळेच जाहीर कार्यक्रमात समोरच्यांच्या भावनांना हात घालण्यासाठी आई-वडील वा अन्यांच्या आठवणींचे कढ काढण्याचा वा टिपे गाळण्याचा हास्यास्पद उद्योग त्यांच्याकडून होत नाही. दूरसंचार आस्थापनांतील अडथळे आणि कल्पनांना नसलेला मुक्त वाव या दोन बाबी इंटरनेटच्या प्रसारात अडथळा असल्याचे मार्कचे मत आहे. ते अचूक म्हणावयास हवे. यातील पहिल्याने इंटरनेटसाठी आवश्यक असलेला भौतिक विकास होत नाही तर दुसऱ्याने बौद्धिक. जन्माने कर्मठ यहुदी असलेला मार्क कर्माने कडवा नास्तिक आहे. स्वत:चे नास्तिक असणे त्याच्या सामाजिक वावराच्या आड कोठेही येत नाही, ही बाब उल्लेखनीय. हे प्रगत आणि प्रौढ समाजाचे लक्षण. असा समाज कोण काय खातो याची उठाठेव करण्याच्या फंदात पडत नाही. तेव्हा आपल्याही समाजात असा एक तरी मार्क झकरबर्ग तयार व्हावा असे वाटत असेल तर व्यक्तींइतकाच व्यक्तींनी बनलेल्या समाजानेदेखील अहं सोडणे आवश्यक आहे. व्यक्तीपेक्षाही समाजाचा अहं हा जास्त दाहक असतो. झकरबर्गचा नवा मार्कवाद हे सांगतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 12:30 am

Web Title: mark and team work of face book
Next Stories
1 रक्षण्या आरक्षणे..
2 बारा वर्षांनंतरची कबुली
3 प्रतिभेचा प्रक्षोभ हवा!
Just Now!
X