पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे, असे पंतप्रधान होण्यापूर्वी म्हणणारे मोदी अचानक नवाझ शरीफ यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी तेथे गेल्याने चर्चेला उधाण आले. अमेरिकेने त्यांच्या या धोरणीपणाचे स्वागत केले असले तरी या भेटीमुळे उभय देशांतील संबंध सौहार्दाचे होतील, असे मानण्याचे कारण नाही.
शेजाऱ्यांशी संबंध सौहार्दाचे असणे केव्हाही चांगलेच. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर का असेना नरेंद्र मोदी यांना याची जाणीव झाली हे उत्तमच. तोपर्यंत पाकिस्तानला कोणकोणत्या मार्गाने धडा शिकविता येईल आणि तो कसा शिकवायला हवा हे सांगण्यात मोदी आणि त्यांच्या भाजपने दाताच्या कण्या केल्या. आधीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात पाकिस्तानशी झालेल्या शांतता चर्चा वा त्या सरकारचे पाक धोरण हे मोदी यांच्या मते नेभळटपणाचे द्योतक होते. पाकिस्तानला ‘जशास तसे उत्तर द्यायला हवे’ असा मोदी आणि कंपनीचा आग्रह असे. अर्थात हे जशास तसे उत्तर म्हणजे काय, हे सांगण्याची तसदी त्यांनी कधी घेतली नाही. पुढे सत्ता मिळाल्यावर काँग्रेसला दिलेला सल्ला मोदी विसरले आणि पाक आपल्या मदतीचा हात अव्हेरत असताना थेट पाकिस्तानात पंतप्रधान नवाझ शरीफ यांना जन्मदिनी शुभेच्छा देण्यासाठी त्या देशात जाऊन आले. गेल्या दहा वर्षांत कोणा भारतीय पंतप्रधानाने पाकिस्तानला दिलेली ही पहिली भेट. ती न सांगता सवरता दिली असे सांगितले जात असले आणि तिचे कवित्व आणखी काही काळ तरी वातावरणात राहणार असले तरी या चमत्कार भावनेस चार हातांवर ठेवून या भेटीची उपयुक्तता समजून घेत तिचा निरुपयोग लक्षात घ्यायला हवा.
पहिली बाब म्हणजे ‘‘सहज डोक्यावरून चाललो होतो, असलात तर येईन म्हणतो चहाला’’, अशा पद्धतीने ही भेट झालेली नाही. तसे सांगितले जात असले तरी त्यावर विश्वास ठेवणे बावळटपणाचे ठरेल. याचे कारण ही भेट केवळ दोन पंतप्रधानांमधली नाही, तर एका अर्थाने परस्परांना शत्रू मानणाऱ्या देशांच्या प्रमुखांची ती भेट आहे. त्यामुळे तीमधील अनौपचारिकपणास मर्यादा येतात. कॅमेऱ्यांच्या क्लिकक्लिकाटात एकमेकांना मिठय़ा मारणे, टाळ्या देणे आणि एकंदरच मित्रत्वाचे दावे करणे वेगळे आणि पडद्यामागे एकमेकांच्या देशहिताचे भान राखत धोरणे आखणे हे पूर्णपणे वेगळे. याची कल्पना मोदी आणि शरीफ या दोनही पंतप्रधानांना नव्हती असे अजिबात नाही. तरीही त्यांनी हे असे भेटण्याचा उद्योग केला आणि तरीही त्याचे काही प्रमाणात महत्त्व आहे. हे दोघे असे जाहीर न सांगता एकमेकांना भेटले याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सांगून जेव्हा भेटी ठरतात तेव्हा प्रचंड प्रमाणावर उत्सुकता ताणली जाते. विशेषत: देहबोलीवरून ठाम निष्कर्ष काढणारे माध्यमपंडित आणि चॅनेलीय चर्चाकार आसपास असताना भारत व पाक पंतप्रधानांच्या घोषित भेटी या केवळ माध्यमसर्कस ठरतात. त्याचे एक वेगळे दडपण असते आणि अशा भेटींच्या फलश्रुतीस फाजील महत्त्व येते. वास्तविक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अधिकृत चच्रेतून काय निष्पन्न होणार यास नसíगक मर्यादा आहेत. परंतु त्याची जाणीव न ठेवता अशा भेटीत जणू भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्वच प्रश्न कायमचे मिटणार अशा प्रकारची भावना तयार केली जाते. तसे होणारच नसते आणि ते त्याप्रमाणे न झाल्यास चर्चा फसली म्हणून शंख करण्यास माध्यमे आणि विरोधक मोकळे. अशा वेळी या देशांत न जाहीर होता चर्चा झाली तर नेत्यांवर तितके दडपण राहात नाही, या विचाराने मोदी यांची ही कथित अनाहूत पाकभेट ‘ठरवली’ गेली असणार, यात तिळमात्र शंका नाही. त्यात काहीही गर नाही. या देशांच्या प्रमुखांनी न भेटण्यापेक्षा भेटणे केव्हाही बरे आणि काहीही निष्पन्न होत नसले तरी चर्चा करीत राहणे त्याहून बरे. कारण दुसरे करता येण्यासारखे अन्य काही नाही. मोदी यांना आता त्याची निश्चितच जाणीव झाली असणार. त्यामुळेच त्यांचा हा परराष्ट्र धोरण बदल मोठा प्रेक्षणीय आहे. या वर्षांच्या सुरुवातीस मोदी यांनी क्षुद्र कारणांवरून भारत-पाक बोलणी रद्द करावयास लावली. पुढे संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात पाक पंतप्रधान नवाझ शरीफ मंचावर समोर असूनदेखील त्यांना अनुल्लेखाने मारले आणि त्यास वर्षही व्हायच्या आत पाकिस्तानात जाऊन शरीफ यांचे जन्मदिन अभीष्टचिंतन केले. या घटना परस्परविरोधी असल्या तरी या सर्वाचे फलित एकच असणार आहे.
याचे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानात पंतप्रधानपद आणि सत्ता जरी नवाझ शरीफ यांच्याकडे असली तरी अधिकारधारी शरीफ दुसरे आहेत. त्यांचे नाव राहील शरीफ. ते पाकिस्तानचे लष्करप्रमुख. मोदी भेटले ते नवाझ शरीफ यांना. लष्करप्रमुख शरीफ तेथे फिरकलेही नाहीत. हे लष्करप्रमुख शरीफ पंतप्रधान शरीफ यांना किती कस्पटासमान लेखतात ते अलीकडेच दिसून आले. नवाझ शरीफ यांच्या अलीकडच्या अमेरिकाभेटीस महिना व्हायच्या आत राहील शरीफ अमेरिकेत गेले आणि अमेरिकेनेही त्यांना सन्मानाने वागवले. पंतप्रधान शरीफ यांनी अमेरिकाभेटीत दोन मुद्दे मांडले. एक म्हणजे नेहमीचे भारताविरोधातील रडगाणे. ते प्रत्येक पाक पंतप्रधानास गावेच लागते आणि दुसरे म्हणजे अणुऊर्जा क्षेत्रात साहाय्य. या दोन्हींबाबत अमेरिकेने जाहीर काहीही वाच्यता केली नाही. परंतु अमेरिकेने पाकिस्तानला फार काळ कधी उपाशीही ठेवलेले नाही. पंतप्रधान शरीफ यांच्या भेटीनंतर लगेच लष्करप्रमुख शरीफ यांनी अमेरिकेत जाऊन पाकसंदर्भात लष्कराला मध्ये घेतल्याखेरीज काहीच कसे होऊ शकत नाही, हे दाखवून दिले. आताही पंतप्रधान मोदी अफगाणिस्तानातून भारतात परतल्यावर पाक लष्करप्रमुख शरीफ काबूलकडे रवाना होत आहेत. अफगाणिस्तानात पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. पाककडून तालिबानला कशी मदत दिली जाते आणि तालिबानी मग अफगाणिस्तानात कसे उत्पात घडवतात, हे मोदी यांनी सूचित केले. आता मोदी यांची पाठ वळल्यानंतर लष्करप्रमुख राहील शरीफ अफगाणिस्तानकडे निघाले आहेत. विद्यमान अफगाण अध्यक्ष अश्रफ घानी हे कट्टर पाकवादी आहेत. तेव्हा ते पाक लष्करप्रमुखास निराश करणार नाहीत, हे उघड आहे. याही आधी मोदी यांचे पूर्वसुरी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात पाक पंतप्रधान शरीफ यांना किती अधिकार होते ते तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल घडवून दाखवून दिले होते.
या सगळ्याचा अर्थ इतकाच की मोदी यांच्या कथित चतुर मुत्सद्देगिरीमुळे भारत आणि पाक संबंध लगेच सौहार्दाचे होतील, असे अजिबातच नाही. तसे मानणारे या विधानावर लगेच अमेरिकेकडे बोट दाखवू शकतील. मोदी यांच्या या धोरणीपणाचे अमेरिकेने स्वागत केले आहे. त्यात काहीही विशेष नाही. याचे कारण या देशांनी एकमेकांशी चर्चा सुरू करावी याचा प्रत्यक्ष आणि त्याहूनही किती तरी पट अप्रत्यक्ष रेटा हा अमेरिकेचाच आहे. अमेरिकेस अस्थिर अफगाणिस्तानला स्थिर करण्यासाठी पाकिस्तान हवा आहे आणि जगास अस्थिर करू पाहणाऱ्या चीनला निष्प्रभ करण्यासाठी भारताची गरज आहे. तेव्हा या पाकभेटीसंदर्भात ‘आमचे मोदी कित्ती हुश्शार’ छापाच्या प्रतिक्रिया भाजपवासीयांनी दिल्या असल्या तरी त्यामुळे फार वाहवत जाण्याचे कारण नाही. उलट ही भेट म्हणजे पाकिस्तानसंदर्भात मोदी यांनी सतत घेतलेल्या ताठर भूमिकेबद्दलचे पापक्षालन आहे, असे म्हणावयास हवे. कोणत्याही प्रश्नावर सतत टोकाची भूमिका घेत राहिल्यास तीत सुधारणा करतानाही काही तरी टोकाचेच करावे लागते. मोदी यांच्या पाकभेटीचा हा अर्थ आहे.