20 February 2018

News Flash

कलावंत की कवडे?

प्रकाश राज यांनी वास्तव आयुष्यात घेतलेली भूमिका अनेक नायक वा महानायकांतील बौद्धिक अंधारावर प्रकाश टाकणारी आहे.

लोकसत्ता टीम | Updated: December 12, 2017 2:00 AM

Prakash Raj: मोदीसरकारवर टीका करण्याची प्रकाश राज यांची ही पहिलीच वेळ नाही. मोदी सरकारवर टीका केल्यामुळे ते सातत्याने चर्चेत असतात.

प्रकाश राज यांनी कलावंतांविषयी म्हणून व्यक्त केलेल्या मतांच्या पाश्र्वभूमीवर आपल्या मराठी चित्रनाटय़सृष्टीचा कानोसा घेतल्यास काय दिसते?

अलीकडच्या काळात चित्रपटबंदी, सांस्कृतिक दहशतवाद आदी वादग्रस्त मुद्दय़ांवर आवाज उठवणारे कलाकार म्हणजे प्रकाश राज. मूळचे ते दक्षिण भारतीय. पुढे  चित्रवाणी आणि हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून ते लोकप्रिय झाले. प्रकाश राज हे पडद्यावरील नायक कधीच नव्हते. त्यांच्या बहुतांश भूमिका या खलनायकी आहेत. आपल्याकडे खलनायकांना प्रत्यक्ष जीवनातही चार हात दूर ठेवण्याकडे अनेकांचा कल असतो. हे या माध्यमाविषयीच्या भाबडेपणातून होते. त्याचमुळे कृष्ण, राम आदी भूमिका करणाऱ्या कलाकारांच्या पायावर प्रत्यक्षातही अनेक जण डोके ठेवतात. पडद्यावरचे नायकत्व आणि वास्तव यांचा जसा संबंध नाही तसाच चित्रपटातील खलनायकत्व आणि त्या कलाकाराची व्यक्तिगत जीवनमूल्ये यांचाही संबंध असतोच असे नाही. बऱ्याचदा आपल्याकडे उलटच दिसते. पडद्यावरचा खलनायक हा वास्तव जीवनात सहृदय असतो आणि अनेक चांगल्या कामांशी त्याचा संबंध असतो. निळू फुले हे त्याचे एक मराठी उदाहरण. पडद्यावर घृणास्पद व्यक्तिरेखा रंगवणारे निळूभाऊ प्रत्यक्ष आयुष्यात सभ्य गृहस्थच होते. त्यांच्याप्रमाणे प्रकाश राज यांच्या जीवनमूल्यांवर भाष्य करावे इतकी ती परिचित नाहीत. परंतु तरीही पडद्यावर खलनायक रंगवणाऱ्या या प्रकाश राज यांनी वास्तव आयुष्यात घेतलेली भूमिका अनेक नायक वा महानायकांतील बौद्धिक अंधारावर प्रकाश टाकणारी आहे. प्रकाश राज यांच्या या भूमिकेचे स्वागत.

कलावंत व्यवस्थेसमोर दबून राहू लागला तर तो समाजच्या समाजच दबलेल्या अवस्थेत जातो, भेदरून जातो. म्हणून घाबरणाऱ्या समाजाला आधार द्यावयाचा असेल तर कलाकारांनी ताठ मानेने उभे राहायला हवे, असे मत या राज यांनी व्यक्त केले. केरळ चित्रपट महोत्सवाचे उद्घाटक म्हणून प्रकाश राज यांनी सरकारला चार खडे बोल सुनावले इतकेच त्यांचे मोठेपण नाही. तर कलाकार म्हणून आपली भूमिका काय याची स्पष्ट जाणीव त्यांना आहे आणि ती व्यक्त करण्यात कोणतीही हयगय त्यांनी केली नाही, हे विशेष कौतुकास्पद. कलाकाराने आपणात काही विशेष वा दैवी गुण आहेत म्हणून स्वत:स मोठे समजू नये. या गुणांनी ते मोठे होत नाहीत. पण तरीही कलाकार हे दैवी वा काही विशेष गुणांचा समुच्चय असलेले भासतात कारण समाजाचे त्यांच्यावर प्रेम असते, हे राज यांचे मत वास्तवाची दुर्मीळ जाणीव दाखवून देणारे आहे. त्यांच्या मते म्हणूनच कलाकाराने या प्रेमास जागत निर्भयपणे बोलायला हवे, काही भूमिका घ्यायला हवी. ती घ्यायला कलाकार घाबरले तर त्यांच्यावर प्रेम करणारा समाजही भीतीत गुरफटून जातो, हे त्यांचे निरीक्षण निश्चितच महत्त्वाचे ठरते. या वेळी प्रकाश राज यांनी ‘सेक्सी दुर्गा’ या बंदीबळी चित्रपटाचा उल्लेख केला. धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून या चित्रपटावर बंदी घातली गेली. केरळ उच्च न्यायालयाने ती उठवल्यानंतरही चित्रपट महोत्सवात तो प्रदर्शित केला जाणार नाही, असाच प्रयत्न संबंधितांचा होता आणि त्यात ते यशस्वी झाले. दुर्गास लावलेल्या विशेषणामुळे ‘त्यांच्या’ भावना दुखावल्या गेल्या, परंतु त्यांना मद्यालयास दुर्गा नाव दिले गेले असेल तर त्याचे काही वाटत नाही किंवा दुर्गा नावाचा मार्ग घाणीने बरबटलेला असेल तरी त्याची काही चाड त्यांना नसते, हा प्रकाश राज यांचा युक्तिवाद निश्चितच बिनतोड म्हणावा लागेल. चित्रपट आणि समाजातील एकंदरीतच घटती सहिष्णुता यावर राज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सरकार त्यांच्यावर नाराज आहे. परंतु तरीही राज हे बधलेले नाहीत. सरकारला चार खडे बोल सुनावण्याच्या त्यांच्या भूमिकेत तसूभरही बदल झालेला नाही आणि तो होण्याची चिन्हेही नाहीत. उलट अन्य कलाकारांनीही विचारस्वातंत्र्याच्या मुस्कटदाबी विरोधात उभे राहायला हवे असा त्यांचा प्रयत्न आहे. यापुढे जाऊन राष्ट्रीयत्वाचा विचार हिंदुत्वाच्या भावनेशी बांधण्यासही त्यांचा विरोध आहे. हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे. पण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असे म्हणणारे त्या धर्मभावनेच्या आडून जनतेवर अन्य काही लादू पाहतात, हे घातक आहे असे राज यांचे मत. आपल्याकडे चित्रपट कलाकार सामाजिक विषयांवर हे असे आणि इतके भाष्य करीत नाहीत. त्यामुळे प्रकाश राज यांची कृती निश्चितच शौर्य पुरस्कारलायक ठरते.

या पाश्र्वभूमीवर आपल्या मराठी चित्रनाटय़सृष्टीचा कानोसा घेणे पुरेसे बोलके ठरावे. ‘गिधाडे’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’ या अशा नाटकांचा विजय तेंडुलकरी काळ सोडला तर नंतर मराठी मनोरंजनसृष्टीत कानठळ्या बसेल इतकी शांतताच नांदताना दिसते. ही शांतता कणाहीनांची. कणाहीनांच्या शांततेत समाधान नसते. ती असाहाय्यांची शांतता असते. सरकारदरबारी अनुदानासाठी वा पाच-दहा टक्क्यांतल्या घरांसाठी कटोरे घेऊन रांगेत उभे राहावयाची सवय झाली की हे असेच होते. मागे शिवसेना-भाजप सत्तेवर असताना कवी वसंत बापट यांनी एकदा काय ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुनावले होते. पु.ल. देशपांडे, दुर्गाबाई भागवत हे अन्य काही अत्यंत सन्माननीय अपवाद. बाकी आपली कलावंत मंडळी सत्ताधीशांच्या पायांवर लोटांगणास तशी नेहमीच तत्पर. पूर्वी पेशवाईत कलावंतांचे रमणे भरत. त्यात पेशवे कलावंतांना त्यांच्या त्यांच्या मगदुराप्रमाणे दक्षिणा देत. नंतर आधुनिक महाराष्ट्रात शरद पवारांनी या रमण्याच्या प्रथेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. रोखीच्या रमणावाटपाचे तसे काही तितके जमले नाही. परंतु त्या बदल्यात कलावंतांना घरे, समित्यांवर वर्णी किंवा गेलाबाजार पद्म पुरस्कार वगैरे असे बरेच काही देण्याची प्रथा मात्र या राकट देशा, कणखर देशात रूढ झाली. ती पाहून प्रश्न असा पडतो की- कन्नड, मल्याळम, तेलुगु वा बंगाली अशा भाषांतील कलावंत विविध प्रश्नांवर आपापली भूमिका घेण्यास कचरत नसताना मऱ्हाटी कलावंतांच्याच मणक्यास असा लकवा कशाने भरला असावा?

याचे उत्तर शोधताना राजदरबारात कलावंतांनी सेवा रुजू करण्याच्या प्रथेपर्यंत मागे जावे लागेल. कवी, गायक, विदूषक अशा अनेकांचा प्रतिपाळ आपल्याकडे संस्थानिक आणि त्या आधी राजेरजवाडे यांच्याकडून केला जात असे. सम्राट अकबराचा नवरत्न दरबार तर विख्यातच आहे. परंतु असा अकबर आणि त्याचे नवरत्न हे अपवादच. अन्यत्र मात्र सर्रास या प्रथेचे विडंबनच झाले. नंतर नंतर तर आपल्याला राजगायकपद वा राजकवीपद मिळावे म्हणून या कलावंतांतच अहमहमिका सुरू झाली. पुढे स्वातंत्र्यानंतर राजेरजवाडे, संस्थानिक निकालात निघाले. परंतु तरी कलावंतांच्या रक्तात मुरलेली राजदरबाराच्या शाबासकीची सवय राहिली ती राहिलीच. एकदा का या शाबासकीची सवय लागली की पाठीच्या कण्यास बाक येतो आणि कोणत्याही प्रश्नावर सरळ उभे राहताच येत नाही. आताही सामाजिक बांधिलकी, पुरोगामी विचारधारा वगैरे शब्दप्रधान बोलघेवडे कलावंत वास्तविक आयुष्यात काही भूमिका घेतात असे दिसत नाही. दुसऱ्या वर्गाने प्रवास करून पहिल्या वर्गाचे भाडे सरकारकडून वसूल करण्यापुरतेच यांचे शौर्य. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ते एका मराठी चित्रपटास राष्ट्रीय महोत्सवाच्या उद्घाटनपटाचा मिळालेला मान नाकारला जाणे असे बरेच काही घडत असूनही आपली कलावंत मंडळी मूग गिळून राहण्यातच धन्यता मानतात हे अगदीच लाजिरवाणे. कलावंताने आपल्या प्रतिभेने काळास आकार द्यावयाचा असतो. कसे ते प्रकाश राज यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या कृतीने कलावंत आणि कवडे यांतील फरकदेखील स्पष्ट झाला आहे.

First Published on December 12, 2017 2:00 am

Web Title: prakash raj bjp hindutva nationalism
 1. S
  Shriram
  Dec 15, 2017 at 4:29 pm
  कवीची हेटाळणी कवडा म्हणून करतात. कलावंताची नाही. कधी कधी कलाकाराची हेटाळणी नकलाकार म्हणून करतात.
  Reply
  1. V
   Vachak
   Dec 13, 2017 at 9:08 pm
   Your editorial is alright but there are so many things in our society on which people don't comment. Most of the time people are scared of their lives and this fact is exploited by musclemen, politicians, mighty people. Hence still our country can be termed as backward. Please fix the Marathi script problem. I am not able to comment in Marathi.
   Reply
   1. A
    Anil
    Dec 13, 2017 at 6:00 pm
    लेख चांगला आहे, मान्य, परंतु या कवड्यांमध्ये काही नावे वगळावीच लागतील - मा. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे सर्वार्थाने वेगळेपण जपून आहेत. या दोघांचा अपवादात्मक श्रेणीत नामोल्लेख झाला असता तर अजून जास्त बरे झाले असते, असो प्रकाश राज हा खराखुरा बुद्धिमान नायक आहे, तसे हिंदी चित्रपटसृष्टीत देखील काही अपवादात्मक चेहरे आहेत परंतु ते जेव्हा काही टिप्पणी करतात तेव्हा त्यांना त्यांच्या धर्माच्या आधारावर जहाल टीकेला सामोरे जावे लागते हि खरी शोकांतिका आहे.
    Reply
    1. N
     narendra kale
     Dec 13, 2017 at 2:25 pm
     हिंदुत्व हि जीवन पद्धती आहे त्यासाठी हिंदू धर्माचा संबंधाचा उल्लेख आणणे योग्य नाही. हिंदू नसलेला अन्य धर्मिय नागरिक देखील हिंदुत्व आचरणात आणतो कारण त्याने या देशाची संस्कृती आपलीशी केलेली असते.याचा साधा अर्थ देश भक्ती किंवा या मातीशी इमान राखणे हा आहे. त्यामुळेच आंबेडकरांनी धर्म बदललाअसे म्हंटले तरी त्यामुळे त्यांच्या हिंदुत्वाच्यामध्ये काही फरक पडला नाही . तीच गोष्ट शाहीर अमर शेख किंवा ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संबंधात देखील वस्तुस्थिती आहे. उपासना पद्धती बदली तरी देश भक्त असेल तर तो हिंदुत्वाच्या मध्ये समाविष्ट आहेच
     Reply
     1. सूरमा भोपाली
      Dec 13, 2017 at 12:43 pm
      अग्रलेख ठीकठाक आहे. परंतु "ही शांतता कणाहीनांची. कणाहीनांच्या शांततेत समाधान नसते. ती असाहाय्यांची शांतता असते." 'चर्च अग्रलेख' मागे घ्यावा लागला त्यावेळी कुबेरांचा कणा कुठे होता ???( कुबेर ही कणाहीन असतील तर त्यांना हा अग्रलेख माफ 😉) - आ. न. सूरमा भोपाली.
      Reply
      1. अशोक.गोविंद.शहा
       Dec 12, 2017 at 11:56 pm
       वाचनीय . उर्मिलेला मात्र हे पटत नाही .
       Reply
       1. Shrikant Yashavant Mahajan
        Dec 12, 2017 at 11:01 pm
        प्रकाश राजांच्या निमित्ताने संपादकांनी नेहमी प्रमाणे तारे तोडलेत. वास्तविक हिंदू धर्मातील अपवादात्मक गोष्टींचे आक्रस्ताळी रुप कलेसाठी वापरणं योग्य नाही. कारण ते सोफ्ट टार्गेट असतं इतर धर्मियांच्या गोष्टींबद्दल ब्र काढायची प्राज्ञा या मंडळींची नसते. शिवाय अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली ही अल्पसंख्य मंडळी बहुसंख्यांवर त्यांचे विचारच एक प्रकारे लादू पाहतात कारण समाजातील बहुसंख्यकांना या गोष्टींचे वावडे नसते. आम्ही वास्तवच दाखवतो अशी समर्थनात्मक चाल करणार्यांना विद्याधर गोखल्यांनी पूर्वीच उत्तर दिले आहे ते म्हणाले होते की वास्तव दाखवायचं तर मग एखादा नट संडासला बसलाय असं का नाही दाखवत? संहिता, सादरीकरण यांचा मेळ नको का ठेवायला.जगात रोज वेगवेगळ्या गोष्टी घडतात पण त्यातील काय समाजापुढे दाखवणं पुरस्करणीय आहे याचं भान नको का ठेवायला?
        Reply
        1. M
         Milind
         Dec 12, 2017 at 10:05 pm
         अग्रलेख अगदी चांगला जमून आला आहे. योग्य विश्लेषण आहे. आजकाल राजकीय पुढाऱ्यांनी बऱ्याच कलाकारांना मिंधे करून घेतले आहे. मागे बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण च्या वेळी असे भाडोत्री कलाकार पुरोगामीपणाचा खा फाडून कंठशोष करायला बाहेर पडलेले पहिले. दुर्गाताई भागवतांनी यशवंतराव चव्हाणांना कराड मध्ये सुनावले होते. बाळासाहेब ठाकरे ह्यांना हि फटकारले होते. तसे कलाकार आजकाल दिसत नाहीत. पण मग कलाकाराचं का? पत्रकार , संपादक तरी कुठे आजकाल पूर्वी सारखे बनतात. दबावाखाली अग्रलेख मागे घेतलाच कि तुम्ही? त्याचे काय?
         Reply
         1. M
          MD
          Dec 12, 2017 at 6:27 pm
          आजकाल असे बोलण्याऱ्यांची चालती असते दुसरे काही नाही ....त्यात लोकसत्ता सरकार विरुद्ध गरळ ओकणारायची पाठ थोपटतो ...मग काय आम्ही कशाला मनावर घेऊ ? ...
          Reply
          1. Ganesh Ghadge
           Dec 12, 2017 at 6:05 pm
           प्रकाश राज हे खरोखरच अपवाद आहेत. खूप वास्तव लेख आहे.
           Reply
           1. S
            sudhara
            Dec 12, 2017 at 5:53 pm
            पु.ल. देशपांडे, दुर्गाबाई भागवत विजय तेंडुलकर हे अन्य काही अत्यंत अपवाद. बाकी सर्व बोलघेवडे
            Reply
            1. S
             sudhara
             Dec 12, 2017 at 5:43 pm
             वटारलेल्या प्रतेक डोळ्याला सलाम, शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम, लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम, देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम, देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणार्यांना सलाम, रिकाम्या हातातून ऊद कढणार्‍या बडेबुवाला सलाम, शनीला सलाम, मंगळाला सलाम, भितीच्या प्रतेक ठेकेदाराला सलाम, आईवर आयुष्यभर गुरगुरणार्‍या बापाला सलाम, बापावर गुरगुरणार्‍या साहेबाला सलाम, साहेबाची टरकवणार्‍या त्याच्या ेबाला सलाम, सलाम,प्यारे भाईयों और भैंनो, सबको सलाम. ------------------मंगेश पाडगांवकर
             Reply
             1. A
              Abhijit Deshpande
              Dec 12, 2017 at 4:15 pm
              माझी कंमेंट १० वेळेला डिलीट करता. कळली तुमची साहिस्नूता
              Reply
              1. A
               Abhijit Deshpande
               Dec 12, 2017 at 4:09 pm
               प्रिय वाचक!, ‘असंतांचे संत’ या १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. – संपादक
               Reply
               1. S
                Shriram
                Dec 12, 2017 at 3:59 pm
                कवीचे हेटाळणीवाचक रूप कवडा होते कलाकाराचे नाही.
                Reply
                1. S
                 Shriram
                 Dec 12, 2017 at 3:56 pm
                 या प्रकाश राजनी सेक्सी दुर्गाची तळी उचलून धरली त्यापूर्वी 'वखवखलेला अल्ला' सिनेमा काढून दाखवावा. या नावाचे चित्र किंवा लेख संपादक लोकसत्ता मधे छापतील का ? उत्तर हो असेल तर लगेच दोन्ही पाठवतो. कलाकाराचे स्वातंत्र्य जपण्याचा वस्तुपाठ संपादकानी घालून द्यावा.
                 Reply
                 1. S
                  Somnath
                  Dec 12, 2017 at 3:08 pm
                  कुजकट पत्रकारिता करणार्यांनी सजग वाचकांच्या प्रतिक्रिया कुजक्यागिरी करून दाबून ठेवू नये.स्वतःची पावती मालकिणीकडे गहाण ठेवणाऱ्यानी दुसऱ्याच्या पावत्या बघू नये व विनाकारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ठेका घेतल्याचा बाऊ करू नये.
                  Reply
                  1. S
                   Shriram
                   Dec 12, 2017 at 2:33 pm
                   एका चंपक माणसाचं गौरवीकरण.
                   Reply
                   1. S
                    SG Mali
                    Dec 12, 2017 at 2:30 pm
                    अरेरे! याचे तोंड उघडायला थोडासा उशीरच झाला म्हणायचा (आतापर्यंत कोणत्या तरी उपकाराखाली दबलेला असावा म्हणून कदाचित गप्प असेल किंवा आतापर्यंत बोलायला सोप्पा विषय मिळत नव्हता तो दूर्गाच्या नावाने मिळाला म्हणून आता तोंड उचकटले असावे.) पण तरीही याच्या बोलन्याने लोकसत्ताच्या संपादकना बळ मिळाले असेल तर ते ही नसे थोडके. तर सांगण्याचा मुद्दा हा की संपादकानी याला स्वत:च्या पाठीवर बसवून घ्यावे आणि पाठीचा काणा ताठ करून घ्यावा आणि "असंतांचे संत" पुन्हा एकदा छापावा. तरच प्रकाश (जरी उशीरा पडला असेल तरीही ) यांचे गुण-गान गाण्याला अर्थ राहील. अन्यथा प्रकाशाच्या वान्झोट्या वल्गना यापेक्षा काहीच नाही. तरीही संपादकाच्या एका गोष्टीची दाद मात्र द्यावीच लागेल. त्यानी उघडपणे सांगितले की राजकारण्याची तळी उचलणारे मिन्दे असतात.समजणार्यानी समजून जावे.
                    Reply
                    1. S
                     Suhas
                     Dec 12, 2017 at 1:39 pm
                     प्रकाश राज यांच्याकडून संपादकांनी खरा तर शिकायला हवे म्हणजे 'असंतांचे संत' मागे घेतला नसता.
                     Reply
                     1. J
                      jit
                      Dec 12, 2017 at 1:21 pm
                      हा तर चक्क पेपराखालील अंधार आहे कि लोकसत्ताला दिसत नाही... संपादकीयाची नुसती लिस्ट पहा, बाजप विरोधी कसे लेखांची मालिका लिहिलं आहे.. हे कळेल... एक तर सर्व हयात काँग्रेस चे पाय चटण्यात गेली आणि कलाकाराने कसे खडे राहिले पाहिजे हे शिकवितात... हे म्हणजे एका मद्यपीने दारू कशी वाईट असते हे सांगणे आहे...
                      Reply
                      1. Load More Comments