News Flash

योगी आणि टोळी

हिंदु युवा वाहिनीच्या अस्तित्वाविषयी रा. स्व. संघ परिवारातून प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे.

हिंदु युवा वाहिनीच्या अस्तित्वाविषयी रा. स्व. संघ परिवारातून प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे

हिंदु युवा वाहिनीच्या अस्तित्वाविषयी रा. स्व. संघ परिवारातून प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे. ही स्वागतार्ह घटना..

पंजाबात गुरू रामरहीम सिंग अशा फिल्मी नावाने ओळखल्या जाणाऱ्या अर्धराजकारण्याची आणि कुडमुडय़ा धर्मगुरूची ‘डेरा सच्चा सौदा’ अशा नावाची स्वतंत्र सेना आहे. बिहारात ब्रह्मेश्वर सिंग यांनी उच्चवर्णीयांची ‘रणवीर सेना’ स्थापन केली होती. गुंड बिहारी राजकारणी शहाबुद्दीन याचीही स्वत:ची टोळी आहे. तुरुंगातून सुटका झाल्यावर साधारण २०० मोटारी या शहाबुद्दीन याच्या स्वागतासाठी हजर होत्या आणि त्यांनी मिरवणुकीने आपल्या या नायकास स्वगृही नेले. असे प्रत्येकाने स्थापलेले समर्थक गट असताताच. महाराष्ट्रात छगन भुजबळ यांची ‘समता परिषद’ आहे. नारायण राणे हे ‘स्वाभिमानी’ अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या संघटनेचे नेतृत्व करतात. सध्या राजकीयदृष्टय़ा अनाथ असलेले विनायक मेटे आधीपासूनच ‘शिवसंग्राम’ चालवितात. बच्चू कडू नावाचे उद्योगी आमदार ‘प्रहार’मार्फत तरी आपला प्रभाव पडेल या प्रयत्नात असतात. राष्ट्रवादीतील असे उद्योगी जितेंद्र आव्हाड यांना आपल्या कर्तृत्वसिद्धीसाठी पक्ष पुरत नाही, त्यामुळे त्यांना ‘संघर्ष’ नामक संघटना चालवावी असे वाटते. देशभरातील असे अनेक दाखले देता येतील. या सर्वच संघटना या सामाजिक/सांस्कृतिक वा समाजोपयोगी कार्यासाठी आहेत असा दावा त्यांचे संस्थापक करतात. कागदोपत्री तसे करावेच लागते. परंतु प्रत्यक्षात या सर्वच संघटना या त्या त्या नेत्यांचे दबावगट म्हणूनच काम करतात आणि तेच त्यांच्या स्थापनेचे उद्दिष्ट असते. या दबावगटांच्या जोरांवर आपापल्या प्रदेशांत वा पक्षांत स्वत:साठी जास्तीतजास्त अवकाश तयार करणे हाच त्यांच्या स्थापनेमागील हेतू असतो. यातील काही तर त्या त्या नेत्यासाठी आवश्यक महसूल निर्मितीच्या महद्कार्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडीत असतात. हा सर्व तपशील आताच मांडावयाचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालच्या हिंदु युवा वाहिनीचे वाढते प्रस्थ आणि त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारात निर्माण झालेले प्रश्न. ते परिवारापुरतेच मर्यादित असते तर त्यांची दखल घेण्याची गरज भासली नसती. परंतु या प्रश्नांचे गांभीर्य हे परिवाराच्या हिताअहितापेक्षाही अधिक आहे.

ही हिंदु युवा वाहिनी योगी आदित्यनाथ यांची संकल्पना. ते गोरखपूरचे मठाधिपती. त्या परिसरात त्यांचा शब्द चालतो. देवधर्माच्या नावे आपले राजकारण दामटणाऱ्या या योगींची तुलनाच करावयाची तर मारियो पुझो या लेखकाच्या अजरामर गॉडफादर या व्यक्तिरेखेशी करता येईल. त्या कादंबरीच्या कथानकातील महत्त्वाचा तपशील असा की लोकनियुक्त सरकारला समांतर अशी स्वत:ची यंत्रणा उभारली जाते. स्थानिकांवरील अन्यायाचे निवारण करण्याचा अधिकार अशा यंत्रणा स्वत:कडे घेतात आणि आपापली स्वत:ची न्याययंत्रणाही चालवतात. झटपट न्याय- म्हणजे थेट शिक्षाच- देणाऱ्या या व्यवस्था. आदित्यनाथांची हिंदु युवा वाहिनी यापेक्षा वेगळी नाही. धर्मजागृती, धर्मरक्षण हे तिचे उद्दिष्ट. पण ते कागदावर सांगण्यापुरते. प्रत्यक्षात परधर्मीयांत, विशेषत: मुसलमानांत, दहशत निर्माण करणे हे तिचे जीवितकार्य. उत्तर प्रदेशातील जात/धर्मकेंद्रित राजकारणात काहींना तिचे महत्त्व वाटले असणे शक्य आहे. मुळातच कायदा व सुव्यवस्थेची बोंब असल्याने एका विशिष्ट धर्मीयांचे प्राबल्य वाढत असेल तर त्याचा प्रतिकार अन्य धर्मीयांनी आपापल्या संघटनांमार्फत करणे हे बिहार, उत्तर प्रदेशात नवे नाही. तेव्हा त्या पाश्र्वभूमीवर योगी आदित्यनाथ निर्मित ही संघटना धर्मसंस्थापनार्थायच जन्माला आलेली आहे, असे लोकांकडून मानले गेले असेल तर ते एकवेळ क्षम्य म्हणता येईल. अशा संघटनेच्या नावावर पाचपंचवीस गुन्हे, दंगली, जाळपोळ वगरेंचे आरोप असले तर ते आपल्याकडील रीतीप्रमाणेच म्हणावे लागेल.

परंतु एका सरकारचे प्रमुखपद मिळाल्यानंतर ही अशी संघटना जिवंत ठेवावी का, हा खरा प्रश्न आहे आणि योगी आदित्यनाथ जरी असले तरी त्याचे उत्तर नाही असेच असायला हवे. जातीय सलोख्यासाठी ही संघटना स्थापन केली गेली, असे आदित्यनाथ म्हणतात. या संघटनेचे अस्तित्व हे तूर्त गोरखपूरपुरतेच मर्यादित होते. परंतु हाच जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी संपूर्ण राज्य या योग्याच्या हाती दिले गेल्यानंतर या संघटनेच्या अस्तित्वाचे प्रयोजनच काय? जे काम हे योगी एका जिल्ह्य़ापुरतेच करू शकत होते, ते आता प्रचंड सरकारी मदतीने संपूर्ण राज्यभर करू शकतात. म्हणजे एका अर्थी त्यांना ‘आपल्या’ कार्याचा व्यापक विस्तार करण्याची संधी आहे. तो करावयाचा तर यंत्रणाही तितकीच मोठी हवी. ती तर सरकारच्या रूपाने योगींच्या हाती आलेलीच आहे. मग तरीही ही हिंदु युवा वाहिनी जिवंत ठेवली जात आहे, ती का? इतकेच नव्हे तर योगी आदित्यनाथ या वाहिनीचा विस्तार करू इच्छितात. अगदी महाराष्ट्रातही त्यांना जातीय सलोख्यासाठी यावयाचे असून त्या दृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे. देशभरातून दिवसाला पाच हजार इतक्या प्रचंड वेगाने सध्या या युवा वाहिनीत भरती होण्यासाठी तरुण इच्छुक आहे. याचा अर्थ उत्तर प्रदेश सरकारात सहभागी होऊन रीतसर समाजसेवा वगरे करण्यापेक्षा या वाहिनीच्या माग्रे जातीय/धार्मिक सलोखा वाढवणे तरुणांना अधिक आकर्षक वाटते. ते योग्यही आहे तसे. कारण सरकारात सहभागी होऊन काम करावयाचे तर नियमांची चौकट पाळावी लागते आणि काही किमान अर्हतादेखील असावी लागते. हिंदु युवा वाहिनीची चाकरी करणे त्यामानाने अधिक सोपे. डोक्यास भगवे मुंडासे, हाती भाला, त्रिशूळ किंवा असे मध्ययुगीन काहीही आणि मुखी प्रभु रामचंद्राचा जयघोष करावयाची तयारी असली की काहीही करण्याची मोकळीक. म्हशीच्या मांसास गोमांस समजून ते बाळगणाऱ्याचा जीव घेतला काय, दंगेधोपे केले काय किंवा लुटालूट केली काय. हे सर्व हिंदू धर्मातील उच्च तत्त्वांच्या प्रचारासाठी होणार असल्याने आणि असा खरा हिंदुहितरक्षक योगी आदित्यनांथांच्या रूपाने मुख्यमंत्रिपदावर असल्याने यांना अडवणार तरी कोण?

परंतु इतके सारे हिंदूंचे हितरक्षक वाढताना पाहून आद्य हिंदुहितरक्षक संघात नाराजी पसरली असून कानामागून आलेल्या आणि भलत्याच गोड वाटू लागलेल्या या हिंदु युवा वाहिनीच्या अस्तित्वाविषयी परिवारातून प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे. ही स्वागतार्ह घटना. याआधी मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची निवड झाल्यावर उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांनीही श्रेष्ठींच्या उपस्थितीत हिंदु युवा वाहिनीच्या औचित्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी अर्थातच सर्वानी सोयीस्कररीत्या त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु त्यानंतर ज्या रीतीने या हिंदु युवा वाहिनीचा प्रभाव वाढत आहे ते पाहता हा प्रश्न पुन्हा डोके वर काढणारच होता. तसेच झाले. अशा वेळी व्यवस्था, घटना, कायदा व सुव्यवस्थेचे नियम आदींना न डावलण्याची काळजी घेणाऱ्या संघाने आपल्या या योग्यास सदर संघटना विसर्जित करण्यास भाग पाडावे. खरे तर हिंदुहितरक्षणासाठी आम्ही असताना तुमची गरजच काय, असा प्रश्न या योग्यास विचारण्याची हिंमत संघाने दाखवावी. या संघटनेचे असणे नुसते अनतिकच नाही तर बेकायदादेखील आहे. तेव्हा ही संघटना तरी सांभाळा किंवा सरकार असे खणखणीतपणे संघाने योगी आदित्यनाथ यांना बजावायला हवे. व्यवस्थेबाहेरच्या टोळ्या- मग भले त्या मुख्यमंत्रिपदावरील एखाद्या योग्याच्या असल्या तरी- अंतिमत: त्या व्यवस्थेलाच मारक असतात. तेव्हा संघाने आज रोखले नाही तर हिंदु युवा वाहिनी ही भस्मासुराप्रमाणे संघ आणि भाजप यांवरच उलटल्याखेरीज राहणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 1:13 am

Web Title: rashtriya sevak sangh target yogi adityanath hindu yuva vahini
Next Stories
1 बुडत्या बँका, खंक महाराजा
2 अगतिकतांची कणखरता
3 मेरिटशाहीचे मेरुमणी
Just Now!
X