राजकारण, माध्यमे वा चित्रपट क्षेत्रातील प्रत्येकाचे म्हणून एक स्थान असते. याचे भान प्रत्येकानेच ठेवायचे असते. ते सुटले की काय होते, हे आता दिसू लागले आहे..

इथे कोणाही व्यक्तीचा नामोल्लेख नाही याचे एक कारण असे की या सर्व प्रवृत्ती आहेत आणि त्या व्यक्तिनिरपेक्ष आहेत..

‘‘राजकारणासदेखील स्वत:चा काही विचार असावा लागतो आणि राजकारण्यांना वकूब. पण याचे भान भारतीयांना नाही. केवळ सरकार पाडणे वा बदलणे इतकेच राजकारण नसते’’ अशा आशयाचे निराद चौधरी यांचे परखड मत (ऑटोबायोग्राफी ऑफ अ‍ॅन अननोन इंडियन) जेव्हा वाचनात आले तेव्हा ते अतिरंजित वाटले. तथापि आसपास जे काही सुरू आहे ते पाहता निराद चौधरी हे कमालीचे द्रष्टे ठरतात. आज ते असते तर त्यांनी हेच मत अधिक जहालपणे मांडले असते आणि वकूबहीनांमध्ये माध्यमांचाही समावेश केला असता. सध्या जे काही सुरू आहे ते पाहता राजकारण्यांनाच राजकारण कशाचे करावयाचे हे कळत नसल्याचे दिसते. कारण समाजास बांधून ठेवू शकेल असा मुद्दा घेण्याइतका वकूबच त्यांच्यात नाही. त्यामुळे निराद चौधरींचे निरीक्षण विश्वासार्ह ठरते. त्याचप्रमाणे या दोन्हींपासून समान अंतर राखत भवतालच्या घटनांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, प्रसंगी आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून अर्थ लावणे आणि व्यापक सामाजिक हिताच्या विचारांतून व्यवस्थेस प्रश्न विचारणे हे माध्यमांचे काम. पण राजकारण्यांप्रमाणे आताशा माध्यमांनीही आपले नियत कर्तव्य सोडले असून अन्य घटकांप्रमाणे कमरेचे सोडून डोक्यास बांधण्याचीच त्यांच्यात स्पर्धा असल्याचे दिसते. जे काही सुरू आहे ते काही एक किमान विचार करण्याची क्षमता असलेल्या गृहस्थांसही उद्विग्न, हतबुद्ध असे जे काही असते ते सर्व करणारे आहे. संपादकीयातून भाष्य करावे इतक्याही लायकीच्या या घटना नाहीत. अशा वेळी वर्तमान सोडून इतिहासाचा आधार हा दिलासादायक म्हणावा लागेल.

पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या मुंबईभेटीत बॉलीवूड होण्याआधीच्या चित्रपट उद्योगातील मान्यवर त्यांची भेट घेण्यास गेले असताना घडलेला हा प्रसंग आहे. त्या काळच्या तगडय़ा कलावंतांचा समावेश या शिष्टमंडळात होता. त्यांना भेटल्यावर अनौपचारिक चर्चा सुरू होण्याआधी पं. नेहरू यांनी सर्व कलाकारांना आपापला परिचय करून देण्यास सुचवले असता त्या काळचा एक समर्थ अभिनेता खजील झाला. चित्रपटाच्या पडद्यावर गर्दी खेचणारी आपल्यासारखी व्यक्ती पंतप्रधानांना माहीत नसावी याचे त्यास मोठे वैषम्य वाटले आणि त्याने ते तसे बोलून दाखवले. ‘देशभर सर्वत्र लोकप्रियता असणारे आपणच खरे नायक आहात,’ अशा अर्थाचे उद्गार त्याच्या तोंडून निघाले. त्यांच्या कन्या इंदिरा गांधी यांचे चित्रपटसृष्टीशी संबंध होते ते सत्यजित राय आणि तितक्या तालेवारांमार्फत. राजीव गांधी यांनी चित्रपटताऱ्यांना अनाठायी महत्त्व देण्याची सुरुवात केली परंतु नरसिंह राव यांच्यापासून ते अखेर अटलबिहारी वाजपेयी यांनाही चित्रपट कलावंतांना राजकीय पक्षाच्या मांडीवर बसवण्याची गरज भासली नाही. वाजपेयी यांच्याच काळात त्यांचे सहकारी लालकृष्ण अडवाणी हे चित्रपटशौकीन. पण तरीही आपण शिंगे मोडून वासरांत शिरणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली. या प्रतिपादनाचा उद्देश चित्रपट कलेशी संबंधित ही मंडळी काही दुय्यम असतात असे सुचवणे हा नाही.

पण प्रत्येकाचे म्हणून एक स्थान असते, याचे भान प्रत्येकानेच कसे ठेवायचे असते आणि ते इतके दिवस कसे ठेवले जात होते, हे सांगणे हा यामागील विचार. ते सुटले की काय होते हे आपल्या आसपास दिसून येते. अशा वेळी असे का होते, याचा विचार करणे हे विद्यमान घटनांवर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा महत्त्वाचे आहे. तसा विचार करू गेल्यास हाती लागणारा निष्कर्ष असा की प्रत्येक क्षेत्रात कमअस्सलांची भाऊगर्दी झाली की अशी परिस्थिती उद्भवते हे लक्षात येईल. राजकारण्यांना या कचकडय़ांच्या तारेतारका यांची गरज भासते कारण त्यांच्या राजकारणात सत्त्व नसते आणि त्यामुळे आपल्यामागे पुरेसा समुदाय नाही, हे सत्य त्यांना उमगलेले असते. पडद्यावरच्या नायकनायिकत्वास खऱ्या आयुष्यातही गांभीर्याने घेणाऱ्या अर्धवट कलाकारांना राजकारण्यांची गरज लागते कारण आपल्यातील कलासत्त्व किती विसविशीत आहे आणि त्यामुळे आपणास ना तारकत्वाचा दर्जा आहे ना आपण कलावंत आहोत, हे त्यांना माहीत असते म्हणून. या दोन्ही वर्गास त्यांची जागा दाखवून देण्याची बौद्धिक क्षमता प्रत्यक्ष आयुष्यात ज्यांनी तटस्थता दाखवणे अपेक्षित आहे ते संपादक/ पत्रकारदेखील आता आपले नियत कर्तव्य पाळत नाहीत. याचे कारण बौद्धिकता, विचक्षणता, विश्लेषण यापेक्षा लोकप्रियता त्यांना मोहवते. कारण ते सोपे असते. म्हणजे ज्यांच्याकडून लोकप्रियतेपासून दूर राहण्याची अपेक्षा असते ते लोकप्रियता मिळवू पाहणार, जे लोकप्रिय आहेत त्यांना स्वत:च्या लोकप्रियतेच्या पोकळपणाची खात्री म्हणून ते राजकारण्यांच्या मागे जाणार आणि या दोन्हींची गरज असणारे राजकारणी माध्यमे आणि तारेतारका या दोघांनाही आपल्यामागे नेणार. असा हा परस्परपूरक, निर्बुद्धताधारित खेळ. त्याचे तुफान गर्दीचे प्रयोग मोठय़ा जोशात सध्या आपल्या आसपास सुरू आहेत. अशा वेळी ही स्थानभ्रष्टता आपणास कोठे घेऊन जाईल याचा विचार आपण करणार आहोत की नाही, तितकी तरी जागरूकता आपल्यात आहे की नाही, हा प्रश्न.

कारण यातून कोणत्या विषयास किती महत्त्व द्यावे याचे काही एक तारतम्यदेखील आपण किती झपाटय़ाने गमावून बसत आहोत, हे दिसून येते. कोणी एक अभिनेत्री काही तरी बेताल बोलते आणि त्यावर ज्येष्ठ, विचारवंत, अभ्यासक आदींसाठी असणाऱ्या सदनाचे सदस्य असलेला संपादक आणखी एक पाऊल खाली उतरून बडबडतो, हे कशाचे लक्षण? या अभिनेत्रीस तिचे चित्रपट चालत असतानाही इतकी प्रसिद्धी कधी मिळाली नसेल तितकी या प्रकरणाने दिली. खरे तर मुंबईत आता पूर्वीइतके सुरक्षित वाटत नाही, असे म्हणण्याचा तिला अधिकार आहे. त्याआधारे ती घटनेच्या चौकटीत व्यक्त झाल्यास ही बेइमानी असे म्हणणे हा उद्दामपणा झाला. सत्ताधाऱ्यांवर टीका केल्यास राष्ट्रद्रोही ठरवण्याइतकेच हे पाप. ते करणाऱ्यांवर टीका करायची आणि मुंबईवर टीका केली म्हणून बेइमान ठरवायचे, हा दुटप्पीपणाच. खरे तर या गल्लीतल्या भांडणात दिल्लीत बसलेल्यांनी पडायचे काही कारण नव्हते. पण सदर प्रकरणातील व्यक्ती आपल्यास राजकीयदृष्टय़ा सोयीची आहे इतक्या(च) निकषावर तिच्या सुरक्षेची काळजी केंद्र सरकारला वाटणे हे हास्यास्पद की केविलवाणे, असा प्रश्न पडावा. आणि तरीही अशा व्यक्तीचे कार्यालय अनधिकृत बांधकामाचे कारण दाखवत मुंबई महानगरपालिका पाडते. त्यावर शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा (रास्त) आरोप करणारे तरी सीबीआय, सक्तवसुली संचालनालय वा अमली पदार्थविरोधी यंत्रणा आदींचा योग्य वापर कुठे करतात? जो अधिक शक्तिशाली आहे त्याच्या हाती अनेक यंत्रणा म्हणून अनेक यंत्रणांचा गैरवापर. तर राज्य स्तरावरच मर्यादित असलेल्याच्या हाती एकच यंत्रणा म्हणून एकाच यंत्रणेचा गैरवापर, इतकाच काय तो फरक. गुणात्मक या विशेषणाने दाखवून देता येणार नाही, इतका हा भेद सूक्ष्म आहे.

चीनने उकरून काढलेले शत्रुत्व, त्यातून निर्माण झालेले आव्हान, रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था, त्यामुळे रोजगार गमावणाऱ्यांची वाढती संख्या, जराही कह्यत नसलेला करोना असे एकापेक्षा एक अक्राळविक्राळ प्रश्न आ वासून उभे असताना आपण कशावर चर्चा करून मने रिझवून घेत आहोत? या चर्चेत कोणाही व्यक्तीचा नामोल्लेख नाही याचे कारण नाव घेण्याचे आम्हास वावडे आहे, हे नाही. तर तितके महत्त्वाचे हे इसम नाहीत, हे आहे. आणि दुसरे असे की या सर्व प्रवृत्ती आहेत आणि त्या व्यक्तिनिरपेक्ष आहेत. त्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. समाज असा असेल तर त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीही अशाच असणार. उथळ होण्याची आस असणाऱ्यांचेच उथळीकरण होते. ते किती करून घ्यायचे याचा विचार आता समाजाने करावयाचा आहे.. तितके भान असेल तर!