वाचनसंस्कृतीबद्दल आज कितीही गळे काढले जात असले तरी चांगल्या वाचकाला कशासाठी आणि कोणती पुस्तके वाचावीत हे बरोबर समजलेले असते..

विजय तेंडुलकर यांनी एके ठिकाणी,  जे लिहिले जाते व जे वाचले जाते ते साहित्य, अशी साहित्याची सोपी व्याख्या केली होती. अशा साहित्याची निर्मिती सर्रास होतच असते. त्यातील काही  त्या-त्या काळात लोकप्रियही होत असते. पण म्हणून ते चांगलेच असते असे नाही. साहित्याची अभिजातता जोखण्याची सर्वोत्तम कसोटी असते ती काळाचीच..

lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

लोक वाचत नाहीत यांसारखे भंपक विधान लिहिणाऱ्यांनी तरी लिहू नये. परंतु ते लिहिले जाते. त्याबाबत गळे काढले जातात आणि लोक तेही वाचत असतात. असा हा काळ. त्यात या अशा विधानांचा अर्थ नीट समजून घेणे आवश्यक आहे. लोक वाचत नाहीत असे म्हणता म्हणता व्यक्ती या घटकाला वाचनापासून परावृत्त करण्याचे कारस्थान तर रचले जात नाही ना? सगळा समाजच जर वाचत नाही, तर मूढ माणसा तू तरी का वाचतोस, असा काही संदेश तर दिला जात नाही ना? आजची परिस्थितीच अशी आहे, की ही शंकाही रास्त ठरावी. परंतु हे असे असूनही लोक मात्र वाचत असतात. यातील काही वाचन हे नकळत्या नाइलाजाने होते. गमभन शिकल्यानंतर जे काही आपोआप होते, त्याचाच हा एक भाग. अक्षर नावाच्या चित्रांचे वाचन करून माणूस त्यांचा अर्थ समजून घेतो. रस्त्यांवरच्या पाटय़ांपासून वाणसामानाच्या यादीपर्यंत सगळे काही या वाचनात येते. दुसऱ्या प्रकारच्या आणि आपण येथे ज्याबद्दल बोलत आहोत, त्यात येते ते ‘साहित्य’. ते वर्तमानपत्र नावाचे ‘घाईतील साहित्य’ असो, की सुशेगात रचलेले ग्रंथ, लिहिलेली पुस्तके, तीही वाचली जातातच. ती का वाचली जातात किंबहुना लेखक असे साहित्य का प्रसवतात, हा तसा अगदीच बाळबोध प्रश्न. परंतु तो पुन:पुन्हा समजून घेतला पाहिजे. साहित्याचे नेमके प्रयोजन काय, हे सातत्याने आठवणीत ठेवले पाहिजे. साहित्याचे हे प्रयोजन शोधणे, सांगणे हे खरे तर समीक्षेचे क्षेत्र. तिने पुस्तके लोकांपर्यंत न्यावीत. म्हणजे पुस्तकांचे विपणन करावे असे नव्हे किंवा पुस्तके लोकप्रिय करावीत असेही नाही. समीक्षेने साहित्याचा अर्थ वाचकांपर्यंत वाहून न्यावा. परंतु या समीक्षेची अवस्था अशी, की तिचाच अर्थ समजून घ्यायचा म्हटले तर वाचकाला आपले रक्त आटवावे लागणार. एक मात्र खरे की चांगल्या वाचकाला कशासाठी आणि कोणती पुस्तके वाचावीत हे बरोबर समजलेले असते. कोणी काहीही म्हणो, त्याला हवी ती पुस्तके तो बरोबर शोधून वाचत असतो. गेल्या काही महिन्यांत एका जागतिक पुस्तकविक्री संकेतस्थळावरून अचानक ‘नाइन्टीन एटी फोर’ नावाच्या पुस्तकाचा खप अचानक वाढला. केवळ हेच नाही, तर अशा प्रकारच्या आणखीही काही पुस्तकांवर वाचकांच्या उडय़ा पडत आहेत. हे पाहता आजचा वाचक वाचतो, हे तर कळतेच. तो सजग आहे, याची जाणीव तर होतेच. पण त्याच्या या कृतीतून साहित्याचे उत्तम प्रयोजनही आपल्या लक्षात येते. आणि म्हणूनच ही घटना समजून घेणेच नव्हे, तर साजरीही होणे आवश्यक आहे.

‘नाइन्टीन एटी फोर’ ही जॉर्ज ऑर्वेल यांची कादंबरी. ‘अमेरिकेत नवा उष:काल’ अशी घोषणा देत रोनाल्ड रिगन पुन्हा एकदा अध्यक्षपदी आरूढ झाले ते हेच वर्ष. याच वर्षी ‘अ‍ॅपल’चा मॅकिंटॉश वैयक्तिक संगणक अमेरिकेत विक्रीला आला. याच वर्षी इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि भोपाळ वायुकांड घडले. पण हे ऑर्वेल यांच्या कादंबरीतील वर्ष नव्हे. त्याच्या ३५ वर्षे आधी, १९४९ साली त्यांनी ही कादंबरी लिहिली. तिचे नाव काहीही असू शकले असते. अगदी २०१४, २०१५ किंवा २०१६ही. कादंबरीच्या नावाला तसा काहीही अर्थ नाही. आणखी ३०-४० वर्षांनी जग कोणत्या वाटेवर असेल हेच त्यांना त्या शीर्षकातून सुचवायचे आहे इतकेच. याच धर्तीवरच्या आणखीही काही पुस्तकांची वाचकसंख्या हल्ली वाढली आहे. त्यात समावेश आहे जे. डी. व्हॅन्स यांच्या ‘हिलबिली एलेजी’, सिंक्लेअर लेविस यांच्या ‘इट कान्ट हॅपण्ड हिअर’, ‘द हॅण्डमेड्स टेल’ या मार्गारेट अ‍ॅटवूड यांच्या कादंबऱ्यांचा. या शिवाय आणखी एक अ-ललित पुस्तक हल्ली चांगलेच खपत आहे, ते म्हणजे हॅना अ‍ॅरेन्ट यांचे ‘द ओरिजिन ऑफ टोटॅलिटेरिअ‍ॅनिझम’. या सर्व कादंबऱ्या तशा आधुनिक अभिजात साहित्यात गणल्या जाणाऱ्या. अशी पुस्तके लोक विकत घेतात, तेव्हा तिकडे पन्नास रुपयांस एक किंवा पाच दिवाळी अंकांवर एक पुस्तक मोफत अशी काही योजना सुरू झाली की काय, अशी शंका कोणास येऊ शकते. परंतु ते तसे नाही. या पुस्तकांचा खप वाढणे आणि तेथे ट्रम्पकाळ सुरू होणे याचा अगदी निकटचा संबंध आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड होणे हे अनेकांसाठी धक्कादायक होते. ते का धक्कादायक आहे हे त्यांच्या तसबिरींना लाडूचा नैवेद्य दाखविणाऱ्यांना समजणे अवघड आहे. इतरांच्या मनात मात्र या ट्रम्पकाळाबद्दल अनामिक भय आणि चिंता दाटून राहिलेली आहे. त्याची योग्यायोग्यता समजून घेण्याबरोबरच हा ट्रम्पकाळ आला तरी कसा हे जाणून घेण्याचा प्रयत्न ते या पुस्तकांतून करीत आहेत. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचा अर्थ लावतानाच, त्या घटनांतून पुढे काय वाढून ठेवलेले आहे हे समजून घेण्यासाठी अमेरिकी नागरिक ही पुस्तके वाचत आहेत. याचा एक अर्थ असा, की ‘नाइन्टीन एटी फोर’मधील सर्वावर सर्वकाळ नजर ठेवणारा ‘बिग ब्रदर’, त्या समाजातील राज्यकर्त्यांनी तयार केलेली ‘न्यू-स्पीक’ नावाची नवी भाषा हे सगळे वाचकांना खूपच ओळखीचे वाटू लागले आहे. हिटलर, मुसोलिनी ही इतिहासातील पात्रे किमान अमेरिकी भूमीत तरी अवतरणार नाहीत असे त्याला वाटत होते. सिंक्लेअर लेविस यांनी त्यांच्या कादंबरीतून रंगविलेली अमेरिकी फॅसिस्ट राजवट येथे येणे शक्यच नाही – ‘इट काण्ट हॅपण्ड हिअर’ – हाच त्याचा समज होता. पण तो समज गैर ठरतो की काय अशी परिस्थिती आज उद्भवली आहे. आपला संगणक, आपले दूरध्वनी यंत्र, आपले खरेदी-विक्री व्यवहार अशा सर्व गोष्टींतून आपल्यावर नजर ठेवू पाहणारी यंत्रणा तो अनुभवत आहे. ‘आपले सरकार म्हणजे लोकांचे सरकार’ किंवा ‘अमेरिकी स्वप्न’ यांसारख्या तद्दन पोकळ जाहिरात वाक्यांतून लोकांना भुलविणारे, त्यांच्यातील भयगंडाला फुंकर घालून त्यांच्यावर राज्य करू पाहणारे देशोदेशीचे ‘बिग ब्रदर’ वा ‘दादा-साहेब’ तो पाहात आहे. स्वातंत्र्य म्हणजेच गुलामगिरी, युद्ध म्हणजेच शांतता अशा सारखी अर्थाची उलटापालट करणारी भाषा मनापासून स्वीकारणारे लोक तो पाहात आहे. या लोकांची मानसिकता घडते तरी कशी हे त्याला समजून घ्यायचे आहे. गावंढळांच्या शोकगीतातून – ‘हिलबिली एलेजी’मधून ते समजते काय हे तो तपासून पाहात आहे. या सर्व पुस्तकांची खपवृद्धी हेच दर्शवीत आहे. आणि त्याचबरोबर ती आणखीही एक बाब आपल्यासमोर आणत आहे. ती म्हणजे त्या पुस्तकांचे, त्या लेखकांचे द्रष्टेपण.

विजय तेंडुलकर यांनी एके ठिकाणी, जे लिहिले जाते व जे वाचले जाते ते साहित्य, अशी साहित्याची सोपी व्याख्या केली होती. अशा साहित्याची निर्मिती सर्रास होतच असते. त्यातील काही त्या-त्या काळात लोकप्रियही होत असते. पण म्हणून ते चांगलेच असते असे नाही. त्यात अडचण अशी आहे, की साहित्याची अभिजातता जोखण्याची सर्वोत्तम कसोटी असते ती काळाचीच. या कसोटीवर टिकते, सन आणि समाजप्रवाह अशा सगळ्याला पुरून उरते, ते मोजकेच साहित्य. अशा प्रकारे कालजयी ठरतात त्यांनाच द्रष्टे म्हणतात. ऑर्वेल, सिंक्लेअर लेविस यांसारखे साहित्यिक आज केवळ काळाच्या पुढे पाहणारेच ठरले नाहीत, तर पुढच्या काळाचा अर्थ समजावून सांगण्याची ताकदही त्यांच्या साहित्यात आहे. ही त्यांची शक्तीच आज अमेरिकी नागरिकांना वैचारिक बळ देत आहे. असे साहित्य आणि असे साहित्यिक असणे हे त्या समाजाचे पूर्वसुकृतच म्हणायचे. बहुधा ‘लोक वाचतच नाहीत,’ असे सतत समाजाच्या मनावर ठसवत राहण्याची चाल त्या समाजात नसावी. त्यामुळे तेथे साहित्याची संमेलने वगैरे न भरवताही हे पुण्य फळाला आले आहे.