स्पर्शातून खूप कळते, जाणवते. एकदा ट्रिपला गेले होते. ग्रुप मॅनेजर अगदी तरुण होता. काहीना काही कारणाने नियोजन बिघडत होते. हॉटेलात भेटलेल्या छोटय़ा मुलीच्या डोक्यावर मी सहजच हात फिरवला. हा मॅनेजर म्हणतो, माझ्याही डोक्यावर हात फिरवा ना! खरंच खूपदा अशा साध्याशा गोष्टीची गरज असते. डोक्यावरचा आशीर्वादाचा हात, पाठीवरून फिरणारा अबोल हात! आश्वस्त स्पर्शाची अनेकदा गरज असते.

एक १५-१६ वर्षांची मुलगी काही दिवस माझ्याकडे समुपदेशनासाठी येत होती. आईशी झालेल्या वादावादीचे परिणामस्वरूप ती आत्महत्येस प्रवृत्त झाली होती. २-३ दिवस सलग ३-४ तास खूप भरभरून बोलली. यात कुठेतरी तिच्या नेमक्या समस्येवर मी बोट ठेवले व आईची चूक आईला दाखवून दिली. निघताना ही मुलगी दारात खुंटून उभी राहिली. तिचा पाय निघतच नव्हता. आणखी काही बोलायचे आहे का विचारले तर नाही म्हणाली. चेहऱ्यावर एक अत्यंत शांत भाव होता. मनातले मळभ दूर झाले होते. पण जाईचना! मलाही कळेना काय झाले असावे ते. मग तिने एकदम हात पसरले- मी तिला जवळ घेतले. तिने घट्ट मिठी मारली. तिच्याकडून तिला कदाचित पुरेसे शब्दात व्यक्त न करता आलेले हे आभार होते व एकूणच पुढील वाटचालीसाठी आश्वस्थ करण्याचा माझा एक प्रयत्न होता.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

निरीक्षण गृहातील (रिमांड होम) मुलांना सकारात्मक जीवनदृष्टी देता यावी म्हणून मी बाल न्याय मंडळावर असताना काही प्रयोग करीत होते. ही सर्व मुले मारामारी, दरोडे, खून, बलात्कार अशा गुन्ह्य़ातील होती. माणसाचे बाळ काही जन्मत:च गुन्हेगार नसते. घरचे अयोग्य वातावरण, त्यातून चुकीची संगत, अशाने ही मुले गुन्हेगारी विश्वात खेचली जातात आणि मग जन्मभर त्याच पिंजऱ्यात कोंडली जातात. नाटय़, चित्रकला, संगीत, स्पर्शोपचार याचा माझ्या ज्ञानदेवी सहकाऱ्यांनी मोठा वापर यासाठी केला. मुलांना शांत झोपवून शांत रसाचे संगीत लावले जायचे. मग आम्ही सर्व जण त्यांच्या डोक्यावर, अंगावर, हातापायावर हात फिरवायचो. मुलांना उठवून विचारले की काय वाटले, की हमखास उत्तर यायचे- ‘‘आईने मायेने हात फिरवल्यासारखे वाटले.’’ कधी आईची जागा आजी नाहीतर ताई घ्यायची. पण पुरुषाचा हात असला तरीसुद्धा तो आईचाच वाटायचा. चुकून कधीतरी फार पूर्वी अनुभवलेला मायेचा स्पर्श, आईची फक्त आठवण द्यायचा. पण एक नक्की तो स्पर्श मनात घर करून राहिला होता.

मुलांना हा स्पर्श आम्ही जाणवून देत होतो- उपचार म्हणून पण आम्ही सर्वच तो स्पर्श करताना मुळापासून हादरून जात होतो. कोण होती ही मुले आमची? कोणीच नाही! त्यांच्या अंगावर हात फिरवताना काय होत होते ते शब्दात वर्णन करता येण्यापलीकडचे आहे. पण खूप भरून यायचे, आंतरबाह्य़ थरकाप व्हायचा, डोळ्यात पाणी यायचे. शरीरातला कण न् कण त्या स्पर्शात नकळत माया ओतू बघायचा. मुलांनाही ते जाणवत असावे. त्यांच्या हृदयावर हात ठेवला की बदलत गेलेली ठोक्यांची लय जाणवायची. एक दिवस आम्ही खूप मोठमोठय़ा अधिकाऱ्यांना बोलावले. त्यात अशीही काही ‘सरकारी’ मंडळी होती की ज्यांना या मुलांबद्दल अजिबात सहानुभूती नव्हती. त्यांना या खेळात सामील केले. ही सर्व मंडळी एकदम बदलूनच गेली. चर्चा, लेख, भांडणे, मोच्रे, कशातूनच न साधणारे या जादूच्या स्पर्शाने साधते हे आम्हाला कळले. आता ही मुले सर्वाची ‘लेकरे’ झाली. रखवालदार गोड बोलू लागले, मारहाण बंद झाली, वकिलांची भाषा बदलली.

मी १९-२० वर्षांची असताना एकदा मुंबईला नातेवाईकांकडे गेले होते. मुंबई मला परकी नाही. एका संध्याकाळी फोर्टमध्ये काही खरेदी करून नंतर महालक्ष्मीजवळ एका मत्रिणीकडे जाऊन येते म्हणून बाहेर पडले. फोर्टमध्ये एका मोठय़ा दुकानात खरेदी करीत असता एका माणसाने संभाषण सुरू केले. अत्यंत सभ्य होता. बोलता बोलता स्वत:ची सर्व माहिती मला देऊ लागला. नंतर मागेच लागला. जरा जास्तच चौकशी करू लागला. त्याला टाळायच्या प्रयत्नात मी फोर्टपासून गिरगावातील घरापर्यंत चालत आले. तो बरोबरच चालत होता. घर कळायला नको म्हणून मधल्याच एका बस स्टॉपपर्यंत नेऊन त्याला कटवला. मी तशी धीट समजली जाते. घरी गेले आणि माझे त्राण संपले. काय झाले ते आजीला सांगितले. रात्री एकटीच एका खोलीत झोपले होते. रात्री केव्हातरी आजी उठून आली आणि माझ्या अंगावर हात टाकून शेजारी झोपली. तिने असे का केले असावे? मला मात्र खूप बरे-सुरक्षित वाटले. आम्ही दोघींनी या घटनेची पुढे कधीच चर्चा केली नाही. पण त्या क्षणी त्या आश्वस्त स्पर्शाची मला गरज होती हे नक्की. ती न बोलता आजीने जाणली. तो अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. कदाचित सहज म्हणून मायेचा हात जेव्हा पाठीवर पडतो- त्याची अशीच प्रत्येकाला, प्रत्येक वयात गरज असते.

माझ्या कामामुळे आणि एरवीसुद्धा लोक माझ्याशी खूप मनमोकळेपणाने बोलतात. हात धरणे, मिठी मारणे, ही आपली मराठी संस्कृती नव्हे. पण पुष्कळदा तीन तीन तास समुपदेशन करून जे साधता येत नाही ते समोरच्या व्यक्तीच्या हातावर निव्वळ हात ठेवून होते. स्पर्शातून खूप कळते, जाणवते. एक आठ वर्षांची बलात्कारित मुलगी माझ्याकडे आणली होती. त्या भीषण अनुभवातून अजून सावरली नव्हती. तिला ताप येतो असे आई सांगत होती. मी तिच्या हातावर हात ठेवला. घटना सांगत जाताना ताप वाढलेला व तिला शांत केल्यावर ताप उतरलेला माझ्या हाताने अनुभवला.

आमच्या नातेवाईकांचा एकुलता एक मुलगा होता. पिंटय़ा म्हणू त्याला. आई-बाबांचा अर्थातच ‘आखों का तारा!’ त्यांच्याकडे दोन छोटी मुले पाहुणी आली. पिंटय़ाचे आई-बाबा नको इतके लक्ष त्या मुलांकडे द्यायला लागले. एक दिवस सहज बोलताना मी पिंटय़ाच्या खांद्याभोवती हात टाकला. लगेच काढूनही घेतला. पिंटय़ाच्या डोळ्यात पाणी आले. ‘राहू देना ताई हात असाच,’ म्हणाला. मी हादरून गेले. निरीक्षण करू लागले. पिंटय़ा आई-वडिलांच्या अंगचटीला गेला की त्याला दूर ढकलले जात होते-  मोठा झालास ‘सांगत’, पण पाहुण्या मुलांना मात्र सारखे जवळ केले जात होते. पिंटय़ाच्या भावविश्वात स्वाभाविक मोठी उलथापालथ होत होती. पाहुणचाराच्या नादात पालकांकडून नकळत होणारे दुर्लक्ष सदैव केंद्रिबदू असणाऱ्या पिंटय़ाला सहनच होत नव्हते.

मधे एकदा ट्रिपला गेले. ग्रुप मॅनेजर अगदी तरुण होता. काहीना काही कारणाने नियोजन बिघडत होते. तो भांबावलेला होता. हॉटेलात भेटलेल्या छोटय़ा मुलीच्या डोक्यावर मी सहजच हात फिरवला तर हा मॅनेजर म्हणतो, ‘माझ्याही डोक्यावर हात फिरवाना!’ खरंच खूपदा सर्वानाच अशा साध्याशा गोष्टीची गरज असते. डोक्यावरचा आशीर्वादाचा हात, पाठीवरून फिरणारा अबोल हात!

काही वर्षांपूर्वी सर्वत्र गाडय़ांवर एक स्टिकर दिसायचे- ‘डिड यू हग युवर चाइल्ड टुडे?’ खूप मोठे, मोजदाद न करता येणारे मोल आहे त्याचे. अगदी रोज मिठी मारणे नको पण रोज एकदा तरी पाठीवर फिरणारा किंवा डोक्यावरचा आशीर्वादाचा हात नक्कीच हवा आहे. पूर्वी आपल्याकडे सकाळ-संध्याकाळ देवाला नमस्कार करून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करण्याची पद्धत होती. स्वाभाविकपणे आशीर्वादाचा हात पाठीवर पडायचा, डोक्यावरून फिरायचा. नकळत आधाराचे आश्वासन मिळायचे. याचे खूप मोल आहे हे अशा अनुभवांवरून जाणवते. एकतर एकुणात मोठय़ांसमोर वाकण्याची प्रथाच कमी होत आहे आणि आशीर्वादसुद्धा वरचेवर व तोंडाने दिला जातो. पण आता वाटते त्या नमस्कारांमागे मी तुमच्या पंखाखाली आहे हे सांगणे आणि आशीर्वादाच्या स्पर्शाने तसे आश्वस्त करणे खूप मोलाचे आहे.

गुन्हेगारीच्या गत्रेत सापडलेले मूल असो वा आयुष्यात काही कारणांनी असुरक्षित वाटते तो क्षण असो. मायेचा, आश्वस्त करणारा, सुरक्षिततेची भावना देणारा, ‘मी आहे’ सांगणारा, बालपणापासूनचा प्रत्येक स्पर्श आपल्या मनावर कोरलेला असतो हे नक्की. तो समरप्रसंगी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपात आपल्याला हात देतो. गत्रेत आधी पडू देत नाही, पडलोच तर बाहेर काढायला मदत करतो.

त्या जादूच्या स्पर्शातील जादू कोणती? ती येते कोठून? असा स्पर्श योग्य वेळी करावासा वाटणे यालाच माणूस म्हणायचे का? नाही पण जनावरसुद्धा स्पर्शातून व्यक्त होतातच की.

डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com