21 March 2019

News Flash

संस्कारांचे वास्तव

मुलांवर आजच्या काळात अनेक ओझी असतात आणि लादली जातात.

मुलांवर आजच्या काळात अनेक ओझी असतात आणि लादली जातात. या ओझ्याखाली आपले बाळ चिरडले जाते की काय याची पर्वा कुणाला आहे, असे वाटत नाही. संस्कारांचे ओझे, आकांक्षांचे ओझे, जगण्याचे ओझे.. ओझेच ओझे!

संस्कार हवेतच पण एकाचा सुसंस्कार कदाचित जगाच्या मान्य संस्कारात गुन्हा असू शकतो तर संस्कार शिकवणे व अंगीकारणे यात मोठय़ांच्या वर्तणुकीचा घोटाळा असतो. मी बाल न्याय मंडळावर असतानाची घटना आहे. एका ८ वर्षांच्या मुलाला चोरीच्या गुन्ह्य़ाखाली अटक झाली व तो निरीक्षणगृहात ठेवला गेला. अतिशय तल्लख बुद्धीचा होता. त्याच्या आई-वडिलांना शोधून काढले व समुपदेशन करून मुलाला शिक्षणासाठी सरकारी वसतिगृहात ठेवण्याची व्यवस्था केली. परत जाताना आई-वडिलांना तुम्ही काय करता, असे विचारल्यावर दुसऱ्याच्या शेतातली संत्री-लिंबे उचलून बाजारात विकतो, असे सांगितले. तो त्यांचा परंपरागत व्यवसाय होता. ज्याला कायदा चोरी म्हणतो. मुलाने भूक लागल्यावर हातगाडीवरचे एक संत्रे उचलले व खाल्ले. अशा घरातल्या मुलाला ती चोरी वाटण्याचे कारण नव्हते.

मध्यंतरी एका लॉ-कॉलेजमध्ये व्याख्यान देण्यासाठी गेले होते. सुरुवातीसच वाहतुकीचे नियम मोडण्याबद्दल चर्चा निघाली. एका चांगल्या घरातल्या वकील होऊ घातलेल्या विद्यार्थ्यांने रस्ता रिकामा असताना का सिग्नल तोडायचा नाही किंवा त्याहीपेक्षा वाईट म्हणजे हे बरोबर आहे अशी आग्रही भूमिका घेतली. होऊ घातलेल्या कायदेरक्षकाची अशी मानसिकता असली तर संस्कारांची ऐशीतशीच की! मी पोलीस ग्राऊंडपाशी राहते. जवळच पोलीस वसाहत आहे. याच परिसरात दोन शाळा आहेत सर्व पालक व पोलीस सर्रास वन-वे मधून गाडय़ा नेतात. त्यांना कोणी हटकत नाही.

यापेक्षा त्यांना मनातला पोलीस आवरत नाही हे सत्य आहे. एकदा पोलिसांसाठी स्त्री अत्याचारावर प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. प्रशिक्षणाच्या ओघात यातील किती स्त्रिया पोलीस/अधिकारी नवऱ्याचा मार खातात आणि किती पुरुष पोलीस/अधिकारी बायकोला मारहाण करतात, असा प्रश्न  विचारला असता उपस्थित सर्व शंभर जण एकदम गप्पच झाले. मनातला खरेपणा अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तर खासगीमध्ये खरेच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असे काही स्त्री अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले. याचाच अर्थ, व्याख्यानात कुणीतरी धक्का देईपर्यंत स्त्रियांना अत्याचाराविरुद्ध  संरक्षण पुरविण्यासाठी कटिबद्ध संरक्षक स्वत:च पुरुषांनी स्त्रियांना मारणे आणि स्त्रियांनी मार खाणे हे योग्यच असा संस्कार घेऊन जगत होते.

मुलांना मारणे, शिवीगाळ करणे हे सगळे त्यांच्या चांगल्यासाठीच! ‘संस्कार’ करण्यासाठी अशी पक्की धारणा मोठय़ांच्या मनात आहे. लहानांनी मोठय़ांना का असे विचारायचे नाही. ते चुकीचे वागले असले तरी प्रश्न करायचा नाही. विचारला तर ते उद्धटपणाचे ठरते. हाही एक संस्कारांच्या नावाखाली केलेला अत्याचार. अशा संस्कारातील मुले अन्याय सहन करायला शिकतात. त्यातच धन्यता मानतात.

‘चाइल्डलाइन’कडे शाळांमधील अस्वच्छ स्वच्छतागृहांबद्दल पालक नेहमीच तक्रार करतात. मोठाल्या देणग्या घेणाऱ्या, भरपूर फी मागणाऱ्या श्रीमंत शाळांमधूनसुद्धा हीच परिस्थिती असते. तुम्ही ऐकून का घेता, असे विचारल्यावर शाळा मुलांवर सूड काढेल अशी भीती व्यक्त केली जाते. याचप्रकारे शाळेबाबत कुठलीही तक्रार पालकांकडे केली तर याच कारणासाठी त्याला गप्प केले जाते. बिन-कण्याची प्रजा यातून वाढीस लागते. मग परकीयांची राज्ये यायला कितीसा वेळ? इथे अभिमानाने सांगावेसे वाटते की शाळा-शाळांमधून असलेल्या ‘ज्ञानदेवी’च्या बालसेना प्रतिनिधींनी मात्र या अन्यायाविरुद्ध लढायचे ठरवले. काहींनी गोड बोलून व्यवस्थापनाकडून सर्व ड्रेनेज सिस्टीम सुधारून घेतल्या. स्वत: मदाने साफ करायला घेतली तेव्हा लाज वाटून व्यवस्थापनाने ती व्यवस्था अंगावर घेतली. विशेष म्हणजे गुटक्याची पाकिटे असायची ती शिपायांचीच. इथेच न थांबता बालसेनेची मुले एकत्रित शाळा-शाळांत जाऊन स्वच्छतागृहाचा सव्‍‌र्हे करत. त्यावरही त्यांची मजेदार स्टट्रेजी होती. ज्या शाळेत जायचे त्या शाळेतील बालसेना कार्यकर्ता सामील व्हायचा नाही. काही शाळांमधून मुख्याध्यापकांनी मुले नीट वापरत नाहीत हे कारण सांगितले. त्यावर आमचे छोटे नेते लगेच विचारते झाले, हे शिकविण्याची जबाबदारी कोणाची?

आमच्या गंमत शाळेतील मुले संस्कार व प्रत्यक्ष याचे एक छान नाटक करून दाखवतात. हातावर तंबाखू मळत त्याची फक्की मारत व ती शाळेच्या वऱ्हांडय़ात पिचकारी मारत थुंकणारा ‘मास्तर’ यात असतो व तो तोंडाने मात्र ‘तंबाकू खाणे वाईट’, ‘शाळा हे विद्येचे मंदिर आहे’, ‘स्वच्छता म्हणजे देवता’, असे उपदेश करीत असतो. इतकी मार्मिक टिपण्णी निरागस लेकरेच करू जाणोत. कामाला दांडी मारण्यासाठी मुलाकडून मी आजारी आहे असा फोन करविणे, ऑफिसची स्टेशनरी हक्काची असल्यासारखे घरी वापरणे, प्रवासाची खोटी बिले देणे, हे सर्व मुले पाहात असतात. त्यांना संस्कार मात्र खोटे बोलू नये, चोरी करू नये, असे असतात. हा शिकवण आणि वर्तन यातील संभ्रम कोण निर्माण करते? ‘‘काही वेळा खोटे बोलावेच लागते. ते खोटे नसते वेळ मारून नेणे असते.’’ ‘गमतीने थाप मारली’, अशा सबबी खोटय़ाला खरं कधीच करू शकत नाहीत. उशीर झाला म्हणून घरी अथवा ऑफिसात सबबी सांगणे, कोणाला तरी आजारी पाडून खासगी कामे करणे ही आणि अशी उदाहरणे वास्तविक संस्कार मुलांवर करीत असतात आणि मग वर्तनातील बदल कायमस्वरूपी होतात.

एकदा गंमत शाळेत आम्ही नाटक बसवत होतो. मुलांनीच संहिता तयार केली होती. त्यात एका प्रसंगात आई स्वयंपाक करते व वडील काम करून येतात असा प्रसंग होता. कितीही वेळा बालनट बदलले तरी न सांगता ‘बाबा’ झिंगून घरी यायचा, लाथेने ताट ढकलायचा, ‘आई’ला मारायचा. हे कुठून आले? संस्कारच नव्हेत का?

पुस्तकी संस्कार पुस्तकात राहतात. आदर्श हवेत विरतात. त्याचे ओझे डोक्यावर दिले तर ते ओझेच होते. प्रत्यक्ष वर्तणूक मात्र या प्रात्यक्षिकातून झालेल्या संस्कारातून ठरते. मुलांवर संस्कार करण्यासाठी अनेक आदर्श पुढे ठेवले जातात. ते मुलांच्या मनात दृढ व्हावेत म्हणून थोरामोठय़ांची उदाहरणेही दिली जातात. यात दोन घोटाळे होतात. परंपरागत आदर्श व त्यासाठी वापरली जाणारी उदाहरणे कालसापेक्ष असतात. श्यामची आई हे पुस्तक पिढय़ान्पिढय़ा संस्कारांचा मेरुमणी मानले जाते. परंतु त्यातील अनेक गोष्टी कशा कालबाह्य़ आहेत हे नकळतच मुले दाखवून देतात. माझ्या एका मत्रिणीने अशीच श्यामच्या आईची प्रसिद्ध म्हातारीला मोळी उचलून देण्याची गोष्ट आपल्या मुलाला सांगितली. यात त्या काळी अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातील एका म्हातारीला लाकडाची मोळी उचलून दे, असे सांगत आई स्पृश्य-अस्पृश्यापलीकडला माणुसकीचा संदेश देऊ पाहते. ही गोष्ट ऐकल्यावर आजच्या काळातील मत्रिणीच्या मुलाने विचारले, ‘‘श्याम एवढासा, मग आईनेच ती मोळी उचलून द्यायला नको होती का?’’

आदर्श सांगणे आणि प्रत्यक्ष आचरण यातील तफावतीमुळे मुले कशी सरभर होतात याचे आणखी एक उदाहरण. – काही वर्र्षांपूर्वी ‘चाइल्डलाइन’वर मला एक फोन आला होता. एका श्रीमंत बागाईतदाराचा मुलगा बोलत होता. भरपूर उत्पन्न देणारी शेती होती पण हौस म्हणून आई आणि वडील तरीही नोकरी करीत होते. मुलगा एकुलता एक होता. त्याच्या डोक्यावर आई-वडिलांच्या आकांक्षाचे ओझे लहानपणापासून होते. त्याला शेतीत रस होता. त्यातच शिक्षण घेऊन खूप काही करायची इच्छा होती. पण आई-वडिलांना वाटत होते की मुलाने इंजिनीअर व्हावे. मनाविरुद्ध बारावीला त्यानुसार विषय घेऊन मिळालेल्या मार्कानुसार एका कॉलेजात तो प्रवेश घ्यायला गेला. एका ‘शिक्षणमहर्षी’चे ते कॉलेज होते. बारावीचे मार्क न बघता देणगीची रक्कम सांगितली गेली. आई-वडिलांना हे मान्य होते. हसत देणगी द्यायला ते तयार झाले. मुलगा मला म्हणाला, ‘‘ताई विद्या देवी असते ना? मग गुरू ती विकतात आणि पालक ती विकत घेतात हे कसे? माझ्या मेहनतीला काहीच किंमत नाही का? अशा दुतोंडी जगात का जगावे? आणि जर प्रवेश विकत मिळत असेल तर पुढे मेहनत कशाला करू? पदवीही विकत घेता येईल आणि नोकरीसुद्धा. अशा जगात मला जगायचे नाही’’. खूप वेळ त्याच्याशी बोलत होते. त्याने असेही विचारले की, माझ्या जागी तुम्ही काय केले असते. त्याला सांगितले, मी कधीच हे मान्य केले नसते. मात्र प्रवाहाविरुद्ध पोहायचे तर खूप त्रास होतो. वारंवार कपाळमोक्ष होते. कुठेतरी वाटेत नराश्य येऊ शकते. म्हणून हा मार्ग जरी योग्य असला तरी अवघड आहे. त्यामुळे तुझे तू ठरव काय करायचे? त्या क्षणापुरते तरी तो प्रेरित झाल्यासारखे वाटले पण सरस्वतीच्या पूजेची दीक्षा देणारे पालक आणि गुरू कोणत्या मार्गावर/ आचरणावर मुलांना ढकलतात हे या अनुभवांवरून पुन्हा एकदा जाणवले. शिक्षक, पालक, सरकारी कार्यकत्रे/ अधिकारी/ पोलीस अशा अनेक लोकांसाठी प्रशिक्षण घेण्याचा योग येतो तेव्हा एक प्रश्न माझा नेहमी असतो, आधी स्वत:चे वर्तन तपासू या. मग आदर्शाच्या गोष्टी करत, संस्कारांची भलावण करत मुलांना दोष देऊ या. शाळेतसुद्धा अथवा घरात मोह झाला म्हणून मी कधीतरी मित्राच्या कंपासमधील छानशी पेन्सिल किंवा आईला न सांगता डब्यातला लाडू घेतला होता का? मग मी चोराला चोर का म्हणायचे? खोटय़ा आजारपणाचे रजेचे अर्ज देणाऱ्याने खोटे बोलणे वाईट असते हे कशाच्या जिवावर सांगायचे?

आईला मारणारा बाप आणि मुकाटय़ाने मार खाणारी आई यांनी समानतेविषयी संस्कार केले तर पटतील का? थोडक्यात आधीच्या एका लेखात दाखवलेल्या आरशात हे ही आपले प्रतिबिंब तपासून घ्यायला हवे.

– डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on April 21, 2018 12:09 am

Web Title: tips to understand your childs psychology part 8